कोल्हापूर, दि. १० फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा पॅव्हेलियनमध्ये
दृष्टीदिव्यांग अर्थात अंध विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या खेळाचे धडे देण्यात आले.
विद्यापीठाकडून अंध शाळेसाठी बुद्धिबळाचे ब्रेलमधील १० संचही भेट देण्यात आले.
बुद्धिबळ
हा बुद्धीचा कस पाहणारा खेळ मानला जातो. अंध व्यक्ती, विद्यार्थी यांनाही हा खेळ
खेळता यावा, यासाठी ब्रेलमध्ये बुद्धिबळाचे पट उपलब्ध आहेत. मात्र, अंध
विद्यार्थ्यांना ते खेळावे कसे, याची माहिती नसते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा
क्रीडा अधिविभाग आणि इंग्रजी अधिविभाग यांनी संयुक्तपणे अंध विद्यार्थ्यांसाठी
बुद्धिबळ शिकविण्यासाठी विशेष शिबिराचे नुकतेच (दि. ६) आयोजन केले. यावेळी
कोल्हापुरातील ज्ञान प्रबोधिनी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले
होते. इंग्रजी अधिविभागातील प्राध्यापक डॉ. मनोहर वासवानी यांनी कार्यशाळा समन्वयक
म्हणून जबाबदारी सांभाळली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे धडेही
त्यांनीच दिले.
या
कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी इंग्रजी अधिविभाग प्रमुख
डॉ. प्रभंजन माने, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. चंद्रकांत लंगरे आदी उपस्थित
होते. यावेळी विद्यापीठाकडून शाळेला बुद्धिबळाचे ब्रेलमधील दहा संच भेट देण्यात
आले.
No comments:
Post a Comment