Wednesday, 5 February 2025

शिवाजी विद्यापीठात ‘कार्निव्हल-२०२५’ला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. मेघा पानसरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अनिल घुले आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत मांडलेल्या प्रदर्शनाची सहभागी विद्यार्थ्यांकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. 

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत मांडलेल्या प्रदर्शनाची सहभागी विद्यार्थ्यांकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. मेघा पानसरे, डॉ. नंदकुमार मोरे.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली पुस्तके आणि वस्तू. 

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली घरे व मंदिरांची मॉडेल्स. 

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या आकर्षक विदेशी वस्तू. 

(कार्निव्हल-२०२५ महोत्सवाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्निव्हल-२०२५या कला-सांस्कृतिक महोत्सवाला आज विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. रशिया, जपान, पोर्तुगाल आणि जर्मनी या देशांच्या कला-संस्कृतीचा परिचय करून घेण्याची संधी या निमित्ताने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लाभली.

महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आज सकाळी वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये झाले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, विदेशी भाषा, कला आणि संस्कृतीचा परिचय करून देणारा हा उत्सव म्हणजे विविध जागतिक संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा उपक्रम असून विद्यार्थ्यांनी आपल्या कारकीर्दीसाठी या विदेशी भाषा शिक्षणाचा उत्तम उपयोग करून घ्यावा. पुढील वर्षापासून विद्यापीठाच्या ग्रंथालयासमोरील उद्यानात हा कार्निव्हल भरविण्यात यावा, जेणे करून सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा आनंद घेता येईल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. उद्घाटनानंतर कुलगुरूंनी सर्व प्रदर्शनाची फिरून पाहणी केली आणि विद्यार्थ्यांकडून संबंधित माहितीही घेतली.

कार्निव्हलमध्ये रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज भाषेच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या त्या-त्या देशांतील पारंपरिक कला वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. रशियन विद्यार्थ्यांनी समवार, मत्र्योश्का बाहुली, स्त्रियांचे पारंपरिक रंगीबेरंगी स्कार्फ, इकोना चित्रे, त्सार टोपी, पारंपरिक लाकडी व काचेच्या वस्तू आणि रशियन रंगचित्रे यांची मांडणी केली. जपानी विषयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक जपानी चित्रे, ‘ओरीगामीचे विविध प्रकार, 'साकुरा' फुले आणि माउंट फुजीच्या कलाकृती, जपानी घरे आणि मंदिरे यांच्या प्रतिकृती, जपानी राहणीमानाची माहिती देणारे फलक तसेच शिबोरी प्रकारातील पर्यावरणस्नेही वस्तूंचे सुंदर प्रदर्शन मांडले. जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांनी बी.एम.डब्ल्यू, फोक्सवॅगन कंपन्यांच्या मोटारींचे मॉडेल्स, फुटबॉल स्टेडियम, हॅम्बुर्ग आणि बर्लिन शहरे यांची माहिती, तेथील खानपानाच्या सवयी आणि त्यांची वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली. पोर्तुगीज विद्यार्थ्यांनी पोर्तुगालमधील सिरॅमिक प्लेट्स, पोर्सिलीन वस्तू, की चेन, फ्रिज मॅग्नेट, स्कार्फ, पारंपरिक अॅप्रन, आदिवासींनी जंगलातील बियांपासून बनवलेली टोपी, शिकारीची शस्त्रे, पिंग, गालीन्या, काफे, परफ्युम यांसह अन्य वस्तूंचे प्रदर्शन मांडले. रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज या सर्व भाषांतील प्रसिद्ध लेखक, त्या संस्कृतींचा परिचय करून देणारी पुस्तके, शब्दकोश आणि बालसाहित्य देखील प्रदर्शित करण्यात आले.

कोल्हापुरातील डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी यांच्या सहकार्याने कार्निव्हलमध्ये विदेशी उपाहाराचे स्टॉल लावण्यात आले. येथील वेगवेगळ्या देशांतील लोकप्रिय खाद्यपदार्थांचा आस्वादही उपस्थितांना घेता आला.

सुरवातीला रशियन भाषेच्या विद्यार्थिनींनी रशियनमधून स्वागतगीत सादर केले. यावेळी विदेशी भाषा अधिविभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अनिल घुले यांच्यासह कार्निव्हलच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्नेहल शेट्ये, प्रियांका माळकर, ज्योती पाटील, गीतांजली शहा, स्नेहा वझे आणि ऐश्वर्या चव्हाण यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवात उद्या सांस्कृतिक कार्यक्रम

विदेशी भाषा कार्निव्हलअंतर्गत उद्या (दि. ६) सायंकाळी ४ वाजता वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात विविध देशांच्या कलांचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा रसिकांनी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पानसरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment