Thursday, 6 February 2025

मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा आदर आवश्यक: डॉ. मेघा पानसरे

विद्यापीठात कार्निव्हल-२०२५ची सांगितिक सांगता

शिवाजी विद्यापीठात 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवात जर्मन सोलोवर भरतनाट्यम सादर करताना निधी सावर्डेकर

शिवाजी विद्यापीठात 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवात विदेशी गीते सादर करताना विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाच्या सांगता समारंभात विदेशी भाषा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मेघा पानसरे

(कार्निव्हल-२०२५ महोत्सवाच्या सांगता समारंभाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ६ फेब्रुवारी: जगामधील विविध मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा माणूस म्हणून प्रत्येकाने आदर केला पाहिजे. विदेशी भाषा आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही खूप महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा अधिविभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा अधिविभागातर्फे विविध देशांच्या कलांचे दर्शन घडविणाऱ्या कार्निव्हल-२०२५या कला-सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारंभामध्ये डॉ. पानसरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात करण्यात आले.

डॉ. पानसरे म्हणाल्या, जगामध्ये स्थलांतर होत असतात, मानवी समूह एकमेकांमध्ये मिसळत असतात. त्यावेळी विदेशी भाषा शिक्षणाचा चांगला उपयोग होतो. शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांना या विदेशी भाषा अवगत असणे खूप महत्त्वाचे असते. विदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाषेचा सातत्याने सराव केल्यास ती जागतिक भाषा आणि त्या देशातील संस्कृती कायम स्मरणात राहते.

कार्यक्रमात विविध विदेशी भाषांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर, निधी सावर्डेकर यांच्या जर्मन सोलोवर आधारित भरतनाट्यमने कार्यक्रमाची सुरूवात झाली. जपान, जर्मनी, रशिया आणि पोर्तुगीज देशांची सोलो गीते, कविता, समूहगीते, कथा-कथन, नाटक अशा बहारदार विविधांगी १९ कार्यक्रमांच्या सादरीकरणातून विदेशी भाषा अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक कला-संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राजवर्धन पाटील आणि निधी सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर ऐश्वर्या चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ.अनिल घुले यांच्यासह ज्योती पाटील, प्रियांका माळकर, गीतांजली शहा, स्नेहल शेटे, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment