![]() |
शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानात बोलताना राहुल नलावडे |
![]() |
शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानात बोलताना राहुल नलावडे. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे |
कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, विश्वकल्याण हे शब्द प्रत्यक्षात उतरवून समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता ही लोककल्याणकारी तत्त्वे स्वराज्यात रूजविणारे कर्तृत्ववान राजे होय, असे प्रतिपादन शिवचरित्र अभ्यासक राहुल नलावडे (रायबा) यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास
विभाग आणि वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व संशोधक विद्यार्थी यांच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहामध्ये
'शिवजन्मोत्सव सोहळा २०२५'अंतर्गत 'कणखर नेतृत्त्वासाठी शिवनीती' या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये
श्री. नलावडे बोलत होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू
डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
श्री. नलावडे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर स्वराज्यनिर्मितीमागील
छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती समजून घ्यायला हवी. सर्वांच्याच नेतृत्वगुणाला अधिक कणखर
करणारे 'शिवनीती'तील हे सार प्रत्येकासाठी
महत्त्वाचे आहे. जगाचा इतिहास शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे. जगामध्ये हजारो राजे
होऊन गेले. परंतु प्रचंड शौर्य आणि ऊर्जास्रोत धारण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय
कोणाचाही जयजयकार होताना दिसत नाही. महाराज जेवढे समर्थ सेनानी होते, तेवढेच तत्पर
प्रशासक होते. दुर्गकारण, अर्थकारण, समाजकारण,
आरमार या सर्वांवरील कार्यकर्तृत्वाने मोठी छाप त्यांनी पाडली. शिवाजी
महाराजांनी सर्व आक्रमणे आपल्या तळपत्या तलवारीमध्ये अडकवून ठेवली होती. ज्या शस्त्रांनी
क्रांती घडवली, तीच शस्त्रे शांततेसाठी वापरली. चांगले उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी
शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वराज्य सर्व लोकांच्या
कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी आहे, असे राजमुद्रेमध्ये लिहून ठेवलेले आहे.
नलावडे पुढे म्हणाले, महाराजांची युद्धकाळामध्ये
गडांवरील व्यवस्थापनात कोणत्याही प्रकारची ढिलाई होऊ नये म्हणून हुकूमतपनाह रामचंद्रपंत
अमात्य यांची नेमणूक केली होती. रामचंद्रपंत अमात्य हे कोल्हापुरातील बावड्याचे रहिवासी
होते. वयाच्या बावीसाव्या वर्षी रामचंद्रपंत यांचा महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात
समावेश झाला होता. रामचंद्रपंत यांनी अत्यंत जवळून शिवाजी महाराजांचे कार्य, नेतृत्व
आणि प्रशासनावरील पकड पाहिली. त्याचबरोबर, त्यांनी पाच छत्रपतींचा कार्यकाळ पाहिला. असे ते मोठे व्यक्तीमत्व होते. या
अमात्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित 'आज्ञापत्र'
हा ग्रंथ लिहीला. आरमाराच्या बळकटीकरणासह विदेशी व्यापाऱ्यांसोबत व्यापार
करण्यासाठी मुभा दिलेली होती. एक-एक दुर्ग जिंकण्यासाठी शत्रूला एक-एक वर्ष लागेल म्हणून
महाराजांनी अनेक दुर्गांची निर्मिती केली होती. ३६० किल्ले महाराजांकडे होते आणि
हेच किल्ले स्वराज्याचे रक्षणकर्ते ठरले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. शिर्के
यांनी, शिवाजी महाराजांनी दिलेला संदेश खऱ्या अर्थाने समजून घेतल्यास तरुणांच्या आयुष्याला
निश्चित यशस्वी दिशा सापडेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम गिरीगोसावी
यांनी केले. पवन कांबळे यांनी परिचय करून दिला. गजानन सोनवणे यांनी आभार मानले.
कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी
विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, इतिहासप्रेमी, संशोधक, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोवाड्याने भरला
जल्लोष
शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब
सभागृहामध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला युवा शाहीर डॉ. अमोल रणदिवे यांच्या शाहिरी
पोवाड्याचे सादरीकरण झाले. यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच विद्यापीठ
परिसरातील वातावरण शिवमय जल्लोषाने भारून गेले. त्यानंतर मर्दानी खेळांचे सादरीकरण, महाराष्ट्र संस्कृती शिवराज्याभिषेक सोहळ्यासही उपस्थितांचा
उत्साही प्रतिसाद लाभला.
उद्याही विविध
कार्यक्रम
शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यापीठात
उद्या सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. त्यानंतर मर्दानी खेळ तसेच
पारंपरिक ढोल, ताशा, लेझीम आदींचे सादरीकरण होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्यासमोर सुमित्रा कुलकर्णी यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. सायंकाळी
दीपोत्सवाचेही आयोजन केले आहे.
No comments:
Post a Comment