Sunday, 23 February 2025

शिवाजी विद्यापीठात ‘शिवस्पंदन’ला शोभायात्रेने जल्लोषी प्रारंभ

राजमाता जिजाऊंसह छत्रपती शिवराय, शाहू महाराज, लता मंगेशकर, बाबूराव पेंटर अवतरले

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे नटराजाच्या मूर्तीस पुष्प वाहून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. नितीन कांबळे आदी


शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. नितीन कांबळे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. तानाजी चौगुले आणि डॉ. मीना पोतदार.

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवाच्या शोभायात्रेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रकाश गायकवाड यांच्यासह डॉ. नितीन कांबळे, शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी, डॉ. मीना पोतदार आणि संयोजन समितीचे सदस्य.




फोटोओळ (उपरोक्त तीन फोटोंसाठी)- शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ऐतिहासिक तसेच प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवात गुजराती नृत्य सादर करताना विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवात महाराष्ट्रातील फुगडीसह पारंपरिक नृत्य सादर करताना विद्यार्थिनी




फोटोओळ (उपरोक्त तीन फोटोंसाठी)- शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवात स्थळचित्रण काढताना विद्यार्थी.

(शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन व शोभायात्रा- व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला आज सकाळी शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग दर्शविला आहे. या शोभायात्रेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह लता मंगेशकर, आशा भोसले, पंडित भीमसेन जोशी, तबलानवाज झाकीर हुसैन, बालगंधर्व, चित्रमहर्षी बाबूराव पेंटर, फाल्गुनी पाठक, राधाकृष्ण, वासुदेव, मीरा अशा व्यक्तीरेखाही पारंपरिक वेशभूषेद्वारे विद्यापीठात अवतरल्या.

आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले.  मुख्य इमारतीपासून पुतळ्यास प्रदक्षिणा घालून प्राणीशास्त्र अधिविभागातील कार्यक्रम स्थळापर्यंत हलगी व ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य इमारतीसमोर सहभागी संघांनी आपापल्या विषयाच्या अनुषंगाने सादरीकरणही केले.

विविध अधिविभागांच्या संघांनी अतिशय कल्पकतेने प्रबोधनपर विषयांचे सादरीकरण शोभायात्रेद्वारे केले. यामध्ये संविधान एक है; सब के लिए सेफ है, ग्रामीण व कृषीसंस्कृतीचे दर्शन, चित्रपटाचे चित्रीकरण, बालमजुरी निर्मूलन, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कर्करोग, योग-प्राणायामाचे महत्त्व, सामाजिक सलोखा, स्त्री भ्रूण हत्या निर्मूलन अशा अनेक विषयांवरील सादरीकरण शोभायात्रेदरम्यान करण्यात आले. राजस्थानी, बंगाली, जराती, पंजाबी वेशभूषेतील विद्यार्थिनींनी त्या त्या राज्यांतील पारंपरिक नृत्यांची झलक सादर केली. जोतिबाची सासनकाठीही नाचवण्यात आली. विविध गायक कलाकारांच्या वेशभूषेतील कलाकारांनी त्यांच्या गायन कलेचेही दर्शन घडविले. राम गणेश गडकऱ्यांच्या एकच प्यालामधील तळीरामही शोभायात्रेत अवतरला.

विद्यार्थ्यांनी कलागुणांबरोबरच संवादसंपन्न व्हावे: कुलगुरू डॉ. शिर्के

शोभायात्रेनंतर प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात शिवस्पंदन महोत्सवाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या विकासाबरोबरच संवादकौशल्याच्या वृद्धीकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. जे विद्यार्थी कलागुणसंपन्न असतात, ते सादरीकरण करतातच; पण, अंगी कला असूनही सादरीकरणाबाबत संभ्रमित असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आत्मविश्वास देऊन सामावून घेणे, हे शिवस्पंदनचे खरे प्रयोजन आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, दर शंभर मैलांवर संस्कृती बदलते, पण मानवी जीवनमूल्ये मात्र कायम राहतात. ही मूल्ये टिकवून ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. विज्ञान आणि संस्कृती यांच्या मिलाफातून ही जीवनमूल्ये वृद्धिंगत करण्याविषयी कुतूहल असणे गरजेचे आहे. त्यातूनच नवनिर्मितीची शक्यता असते. भारताचे विविधतेतून एकतेचे मूल्य शिवस्पंदनसारख्या उपक्रमांतून अधोरेखित केले जाते.

यावेळी महोत्सवाचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मीना पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शाहीरविशारद आझाद नायकवडी, मनिषा नायकवडी, डॉ. मदनलाल शर्मा, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. के.डी. कुचे, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. एस.एम. भोसले, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. कविता वड्राळे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. सुमेधा साळुंखे, संग्राम भालकर, दीपक बीडकर, विजय टिपुगडे, बबन माने, सुरेखा अडके आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

उद्घाटन समारंभानंतर प्राणीशास्त्र सभागृहात दिवसभर सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन आणि समूहगीत स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे रांगोळी आणि स्थळचित्रण स्पर्धा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात पार पडल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

महोत्सवात उद्या...

उद्या, सोमवारी (दि. २४) सकाळी ७.३० वाजता वाद्यमहोत्सव साजरा करण्यात येईल. मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत वाद्यमहोत्सवास प्रारंभ होईल. त्याखेरीज क्रांतीवन परिसर (गेट क्र. ८ जवळ), संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलाव परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यासमोरील उद्यान या ठिकाणीही देशभरातील विविध लोकवाद्यांच्या वादनाचा रसिकांना आनंद घेता येईल. या दिवशी मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका या स्पर्धा प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात होतील.

 


No comments:

Post a Comment