Friday, 9 October 2026

महाराष्ट्राच्या समावेशक आर्थिक प्रगतीसाठी विकेंद्रित औद्योगीकरण प्रभावी: डॉ. अभय टिळक

शिवाजी विद्यापीठात प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक. मंचावर पल्लवी कोरगांवकर आणि तन्मय कोरगांवकर.


कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: महाराष्ट्राचे अर्थकारण आज ते कुंठित शेती आणि असंतुलित नागरीकरण अशा दुहेरी कोंडीत सापडले आहे. यावर मात करण्यासाठी विकेंद्रित औद्योगीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. अभय टिळक यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील कॉ. दत्ता देशमुख अध्यासनाच्या वतीने आयोजित 'प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत ते 'महाराष्ट्राचे अर्थकारण : प्रवाह आणि आव्हाने' या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरगावकर ट्रस्टच्या विश्वस्त पल्लवी कोरगावकर होत्या.

डॉ. टिळक म्हणाले, महाराष्ट्राचा भूगोल वैशिष्ट्यपूर्ण असून येथील शेतीचे अर्थकारण प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अर्थकारणात बदल होत असताना त्याची सुरुवात आणि शेवट शेतीतूनच होतो. कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा संतुलित विकास साधण्याची दृष्टी महाराष्ट्रात १९६० पासून दिसून येते. तथापि, महाराष्ट्राच्या अर्थकारणातील चढउतारांमुळे जटिल समस्या निर्माण झाल्या असून सहकार क्षेत्राची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. अशा स्थितीत विकेंद्रित औद्योगीकरणाचा पर्याय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे विकासाची केंद्रे केवळ काही ठिकाणांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण, निमशहरी प्रदेशांपर्यंत त्याची व्याप्ती वाढेल आणि अधिक समावेश विकास साधण्याची शक्यता निर्माण होईल.

अध्यक्षीय मनोगतात पल्लवी कोरगावकर  म्हणाल्या, दातृत्वाची भाषा वेगळी असून ती समजून घेतली पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, त्याचे आपण देणे लागतो; त्यामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व काय आहे, याचा विचार करून प्रत्यक्षात कृती करायला हवी. त्यांनी यावेळी प्रभाकर ट्रस्टच्या कार्याची सविस्तर ओळख करून दिली आणि विशेषतः प्रयोगशील शेती क्षेत्रातील वाटचालीमुळे निर्माण झालेल्या रोजगारनिर्मितीमधील ट्रस्टच्या योगदानावर प्रकाश टाकला.

डॉ. नेहा वाडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले.

यावेळी भरत शास्त्री, तन्मय कोरगावकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोविंदराव टेंबे यांचे संगीतसमीक्षा आणि साहित्य क्षेत्रालाही मोलाचे योगदान: केशवचैतन्य कुंटे


 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ संगीतज्ज्ञ कैशवचैतन्य कुंटे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ संगीतज्ज्ञ कैशवचैतन्य कुंटे. मंचावर (डावीकडून) डॉ. विनोद ठाकूरदेसाई, पं. सुधीर पोटे आणि डॉ. रणधीर शिंदे.




(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: ज्येष्ठ संगीतकार गोविंदराव टेंबे यांनी संगीतक्षेत्राबरोबरच साहित्य आणि संगीतसमीक्षेतही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या लेखनातून संगीतकलेचे सूक्ष्म आकलन, नाट्यप्रयोगांची जाण आणि तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण दिसून येते. त्यामुळे टेंबे यांच्या साहित्याचा अभ्यासकांनी अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत पुणे येथील संगीतशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक केशवचैतन्य कुंटे यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आज ज्येष्ठ संगीतकार व रंगकर्मी गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. कुंटे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीताचार्य पं. सुधीर पोटे उपस्थित होते.

कुंटे म्हणाले, टेंबे यांच्या लेखनातील रसास्वादक समीक्षा हा विशेष उल्लेखनीय पैलू आहे. त्यांच्या समीक्षेचा पुढील पिढ्यांतील लेखक आणि संगीताभ्यासकांवर प्रभाव पडला. वामनराव देशपांडे, अरविंद मंगळूरकर आणि पु. ल. देशपांडे यांसारख्या व्यक्तींनी संगीतविषयक लेखनातून या परंपरेला पुढे नेले. टेंबे यांच्या लेखनात कलाकृतीचा आस्वाद घेताना तिचे तांत्रिक आणि भावनिक पैलू उलगडण्याची क्षमता दिसून येते. उस्ताद अल्लादिया खाँ यांच्यावरील टेंबे यांचे चरित्र संगीतसाहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. व्यक्तिचित्रणासोबतच त्या काळातील संगीतविश्व आणि त्याचे वातावरण वाचकांसमोर उभे करण्याचे कसब त्यांच्या लेखनात दिसते. त्यांच्या गद्यशैलीत सूक्ष्म विनोद, सहजता आणि आशयघनता यांचा सुंदर मेळ आहे. नाट्यक्षेत्रातील अनुभवामुळे त्यांच्या नाट्यविषयक लेखनात प्रयोगशीलतेची आणि रंगमंचीय सादरीकरणाची जाणही प्रत्ययास येते.

टेंबे यांच्या साहित्याचा आवाका लक्षात घेता, त्यांच्या विविध लेखनप्रकारांचा स्वतंत्रपणे अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यांच्या साहित्यकृती, संगीतसमीक्षा आणि चरित्रलेखन यांवर संशोधन प्रकल्प तसेच विद्यापीठीय प्रबंध हाती घेतल्यास त्यांच्या योगदानाचे अधिक व्यापक आकलन होऊ शकेल, असेही कुंटे यांनी नमूद केले.

यावेळी पं. सुधीर पोटे यांनी गोविंदराव टेंबे यांच्या संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले, मराठीतील पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ यामध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षी नायकाची भूमिका साकारण्याचा मान टेंबे यांना मिळाला. ‘मानापमान’ नाटकाला त्यांनी दिलेले संगीत क्रांतिकारी ठरले. नाटकातील प्रसंग, गाण्याची वेळ आणि गायकाच्या आवाजाचा विचार करून संगीत रचण्याची त्यांची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती. हार्मोनियम वादनातील त्यांची स्वतंत्र शैली, रागदारीतील व्यासंग आणि संगीतासाठी पहाटेपर्यंत सराव करण्याची चिकाटी त्यांच्या कलेप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देते, असे पोटे यांनी सांगितले.

पं. सुधीर पोटे


    पोटे म्हणाले, टेंबे यांची नाट्यकलेविषयीची भूमिका आजही मार्गदर्शक आहे. नाट्यकला हा केवळ धनोत्पादनाचा व्यवसाय नसून ती मानवी अंतःकरणाला स्पर्श करणारी
, बुद्धीला चालना देणारी आणि जीवनाला सौंदर्य देणारी कला आहे, असा विचार त्यांनी मांडला होता. संगीत आणि कलाक्षेत्राबरोबरच क्रिकेट, वकिली आणि सर्कस व्यवस्थापन अशा क्षेत्रांतही त्यांनी काम केले. त्यांच्या ‘जीवनविहार’ आणि ‘माझा संगीत व्यासंग’ या आत्मचरित्रांतून त्यांच्या अनुभवांचा आणि कलासाधनेचा परिचय होतो. कोल्हापुरातील नव्या पिढीला गोविंदराव टेंबे यांच्या कार्याची पुरेशी माहिती व्हावी, तसेच त्यांच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वातून चिकाटी आणि समर्पणाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पोटे यांनी केले.

यावेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूर देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.विशाखा जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रुती खोचीकर यांनी आभार मानले. गुणीदास फौंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी, डॉ. भाग्यश्री मुळ्ये, मिलिंद गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Wednesday, 7 October 2026

समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना अभिनेते डॉ. मिलींद शिंदे.




कोल्हापूर, दि. ७ ऑक्टोबर: समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्यासह दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या जगण्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी कलावंताची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, कवी, लेखक डॉ. मिलिंद शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते आज ‘वंचित घटक आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा’ या विषयावर बोलत होते.

वंचितांच्या वेदना, संघर्ष आणि जीवनानुभव कलांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले जातात, तेव्हाच समाज अधिक संवेदनशील आणि समतोल बनतो, असे सांगताना डॉ. शिंदे म्हणाले, कलावंत हा केवळ मनोरंजन करणारा व्यक्ती नसून तो समाजजाणिवा जागृत करणारा, प्रबोधन करणारा आणि सांस्कृतिक आरोग्य सांभाळणारा घटक आहे. सिनेमा, साहित्य, नाटक आणि कविता या माध्यमांतून दुर्लक्षितांचे प्रश्न मांडले गेले, तेव्हा समाजात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली.

डॉ. शिंदे यांनी भारतीय समाजातील वंचित घटकांच्या संघर्षाचा, विशेषतः महिलांच्या सामाजिक स्थितीचा आणि त्यांच्या आवाजाचा इतिहास उलगडून दाखवला. वंचित समाजाला अनेकदा उपेक्षा, अन्याय आणि मौन यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी कलावंतच त्यांच्या कथा, वेदना आणि मागण्या समाजापर्यंत पोहोचवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या महामानवांसह आचार्य अत्रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, मीरा नायर, दीपा मेहता, शबाना आजमी, स्मिता पाटील, नंदिता दास आदी कलावंतांच्या योगदानामुळे वंचितांच्या वेदनांना व्यापक वाचा फुटली. स्त्रियांना शिक्षण, मतदान, स्वातंत्र्य आणि आत्मभान मिळवून देण्यात समाजसुधारकांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे सिनेमानेही वंचितांच्या जगण्याला दृष्यमान केले आणि समाजातील दडपल्या गेलेल्या आवाजांना वाचा दिली, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, आज दिवसभरात पुणे येथील चित्रशारदाच्या व्यवस्थापकीय संपादक अश्विनी धायगुडे-कोळेकर यांनी ‘सिनेमातील लिंगाधारित पूर्वग्रह’ या विषयावर आणि चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी ‘वंचितांच्या चित्रपटांचे भवितव्य आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले.  

कार्यशाळेला विद्यार्थी, चित्रपट अभ्यासक, माध्यम क्षेत्रातील व्यक्ती आणि चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिविभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव यांनी संयोजन केले. समन्वयक अनुप जत्राटकर यांनी आभार मानले.

Tuesday, 6 October 2026

वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसले

शिवाजी विद्यापीठात ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ विषयावरील कार्यशाळेला सुरुवात

 

शिवाजी विद्यापीठात ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ या विषयावर मार्गदर्शन करताना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले.


कोल्हापूर: वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकांचे सिनेमातील स्थान या विषयावर दि.6 आणि 7 या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मास कम्युनिकेशन विभागात करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

राजेभोसले म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरातून झाली. कोल्हापूर ही चित्रपटाची पंढरी आणि केंद्रबिंदू असलेले शहर आहे. या शहरातून वंचित घटकाचे सिनेमातील स्थान हा विषय घेऊन कार्यशाळा होत असल्याचे समाधान आहे. या घटकांचे सिनेमातील स्थान हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असून त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास होणे गरजेचे आहे. वंचित घटकांकडे दुर्लक्ष न करता त्यांना चित्रपटांमध्ये योग्य स्थान दिले पाहिजे. सर्व घटकांना सिनेमात योग्य प्रतिनिधित्व मिळाले, तरच समाजाभिमुख चित्रपटांची निर्मिती होईल. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करून ते स्वतःमध्ये रुजवले पाहिजे. त्याचा भविष्यात निश्चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना भविष्यात आवश्यक असलेली कोणतीही मदत उपलब्ध करून देण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, कोल्हापुरात अत्याधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी आम्ही महामंडळातर्फे प्रयत्नशील आहोत. यासाठी शिवाजी विद्यापीठाने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले,मास कम्युनिकेशन विभाग सातत्याने नवनवीन विषय घेऊन विद्यार्थी आणि समाजासमोर येत असतो. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी धडपडणाऱ्या या विभागाकडून मिळणाऱ्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. समाजामध्ये सिनेमाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दृक्-श्राव्य माध्यमाची छाप मोठी असून सिनेमा हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विवेकदृष्टी ठेवून काम केले पाहिजे.समाजातील सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तर ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव मोठे केले, तर त्यातून विद्यापीठासह कोल्हापूरचेही नाव उंचावेल, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमास नाईट कॉलेज मराठी विभागाचे प्रमुख प्रा. अरुण शिंदे, ज्येष्ठ संपादक डॉ. विजय चोरमारे, चित्रशारदा मासिकाच्या व्यवस्थापकीय संपादक अश्विनी धायगुडे-कोळेकर, चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया, पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, चित्रपट महामंडळाचे कार्यवाह रवी सूर्यवंशी, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रीती भिसे व अभिजीत घागरे यांनी करून दिली, सूत्रसंचालन सायली गणेशकर हिने तर आभार साक्षी वाघमोडे यांनी मानले.

सहकाराचा अभ्यास करा, संस्थांचे सभासद व्हा: संजय पाचपोर

शिवाजी विद्यापीठात संजय पाचपोर यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत (डावीकडून) डॉ. सुभाष कोंबडे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि डॉ. केदार मारुलकर.


कोल्हापूर, दि. ६ ऑक्टोबर: सहकाराचा अभ्यास करून प्रत्येकाने किमान एका सहकारी संस्थेचा सभासद व्हावे. बदलत्या काळात सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले.

गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र, अर्थशास्त्र विभाग, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि एमबीए विभागातर्फे ‘सहकाराद्वारे सर्वसमावेशक शाश्वत विकास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते काल (दि. ५) बोलत होते. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, अधिसभा सदस्य संजय परमणे तसेच विविध सहकारी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाचपोर म्हणाले, सहकारामध्ये प्रचंड ताकद असून त्यातून गावाचा विकास, रोजगारनिर्मिती आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती साधता येते. सहकाराच्या माध्यमातून आत्मनिर्भरता निर्माण होऊ शकते. सहकाराचे स्वरूप आणि कार्यपद्धती समजून घेतल्यास माणसाचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधता येतो. सहकारी संस्था चालविणाऱ्या संचालक मंडळाला कोणतेही मानधन मिळत नाही. त्याग आणि सेवाभावातून सहकाराची चळवळ पुढे जाते. गोकुळ, अमूल आणि इफ्को यांसारख्या संस्था शाश्वत विकासाची उत्तम उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरू  डॉ. राजनीश कामत यांनी सहकार क्षेत्र हे सर्वसमावेशक विकासाचे एक सिद्ध झालेले मॉडेल असलेचे नमूद केले. त्यांनी यशस्वी सहकारी व्यवस्था ही संस्कार व मानवी मूल्यावर आधारित आहे, या लक्ष्मणराव इनामदार यांच्या विचाराची आठवण करून दिली.  ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची शक्ती सहकारामध्ये असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारामध्ये नवीन संस्था उद्यास येत असून त्याद्वारे कार्यक्षमता वाढत असलेचे मतही व्यक्त केले.

केंद्राचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शामल पवार यांनी आभार मानले.

महिलांमधील उपजत व्यवस्थापन कौशल्याच्या विकासासाठी योग्य प्रशिक्षण आवश्यक: डॉ. आलोक जत्राटकर

शिवाजी विद्यापीठात महिलांसाठी आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) रविंद्र खैरे, डॉ. रामचंद्र पवार, प्रफुल्ल रंगारी आणि संदीप माने.


कोल्हापूर, दि. ६ ऑक्टोबर: महिलांमध्ये उपजतच असणारे सामाजिक व आर्थिक व्यवस्थापन कौशल्य विकसित होण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र व इंडोकाऊंट फाऊंडेशन अंतर्गत महालक्ष्मी कौशल्य विकास केंद्र, गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ महिलांसाठी मार्केटिंग आणि विक्री कौशल्य” या दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल (दि. ५) बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार होते, तर इंडोकाऊंटचे सल्लागार प्रफुल्ल रंगारी प्रमुख पाहुणे होते.

डॉ. जत्राटकर म्हणाले, महिलांमध्ये कुटुंबाचे अर्थकारण सांभाळण्याची, उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन करण्याची आणि मर्यादित साधनांतून घर चालविण्याची नैसर्गिक क्षमता असते. हीच क्षमता योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून उद्योजकीय क्षेत्रात प्रभावीपणे वापरता येऊ शकते. विक्री आणि मार्केटिंगचे मूळ संवादात आहे. ग्राहकांशी योग्य संवाद साधता आला, तर उत्पादनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि विश्वासाचे नाते तयार होते. महिलांनी केवळ उत्पादननिर्मितीपुरते मर्यादित न राहता बाजारपेठ, ग्राहकसंपर्क, ब्रँडिंग आणि उत्पादन विविधीकरण यांचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. जत्राटकर यांनी स्थानिक बाजारपेठेतील संधी अधोरेखित करताना सांगितले की, बचत गटांनी आपल्या परिसरातील ग्राहकांशी थेट संपर्क वाढवावा. सण-उत्सव, स्थानिक विक्रीकेंद्रे, लहान दुकाने आणि घरगुती पुरवठा व्यवस्था यांचा योग्य उपयोग करून महिलांना आपले उत्पादन अधिक प्रभावीपणे पोहोचविता येते. छोट्या गटांनाही योग्य नियोजन, दर्जेदार उत्पादन आणि ग्राहकांशी सुसंवाद यामुळे मोठे स्थान निश्चितपणे निर्माण करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी विद्यापीठ समाजातील सर्व घटकांसाठी कौशल्यविकास उपक्रम राबवत असून समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्वांना सन्मानाने स्थान मिळावे, ही विद्यापीठाची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रफुल्ल रंगारी म्हणाले, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने इंडोकाऊंट समूह सातत्याने प्रयत्नशील आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला मोठे पाठबळ लाभले आहे. हे सहकार्य अधिक वृद्धिंगत करून अधिकाधिक महिलांचे यामध्ये समावेशन व्हावे, या दृष्टीने पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. रामचंद्र पवार म्हणाले, महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार करण्याबरोबरच त्यांचे प्रभावी ब्रँडिंग, मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. उत्पादनाची गुणवत्ता जितकी महत्त्वाची आहे, तितकेच योग्य बाजारपेठ शोधणे, ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचविणे आणि विक्री विपणन या बाबीही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंचावर ग्रामोद्योग अधिकारी संदीप माने, व्यवसाय मार्गदर्शक रविंद्र खैरे उपस्थित होते. स्मिता जाधव व दिशा अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये श्री. खैरे यांनी मार्केटिंग, विक्री कौशल्य, ग्राहकांशी संवाद, उत्पादनाचे सादरीकरण आणि व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक विविध बाबींवर मार्गदर्शन केले. महिला बचत गटांच्या सदस्यांचा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक प्रमोद कांबळे यांनी केले. कौशल्य विकास अधिकारी ईश्वर पुजारी यांनी आभार मानले.

Monday, 5 October 2026

"लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी..."

शिवाजी विद्यापीठात अभिजात मराठीचे गौरवगान; प्रेक्षकांचा जल्लोषी प्रतिसाद

 














कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मायमराठीचे जतन, संवर्धन आणि प्रचार, प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रतिबद्ध आहे. त्यासाठी राज्यभरात अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनीही मराठीच्या संवर्धनासाठी आपला वाटा उचलण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात आज सायंकाळी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह -२०२६ या उपक्रमांतर्गत आयोजित 'अभिजात मराठी, अभिमान मराठी' या सांगितिक - सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देवरे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

अभिजात मराठी भाषेचे गौरवगान करणाऱ्या या कार्यक्रमास प्रेक्षक, श्रोत्यांचा प्रचंड जल्लोषी प्रतिसाद लाभला.

उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, मराठी भाषेच्या अनेक बोलींमध्ये कोल्हापूरची मराठी ही केवळ देशातच नव्हे, तर जगात वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय आहे. या भाषेचा आपण नेहमी अभिमान मिरवला पाहिजे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल राज्यभरातील विद्यापीठांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठालाही या गोष्टीचा मोठा अभिमान असल्याने हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. येथून पुढेही असे मराठी भाषेच्या गौरवपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सुरवातीला मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कोल्हापूरच्या सुपुत्रांनी गाजविला कार्यक्रम

कोल्हापूरचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध गायक बंधू डॉ. अभिजीत कोसंबी आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी आपल्या गायनवैविध्याने अभिजात मराठीचा हा कार्यक्रम गाजविला. भक्तीगीतांपासून वासुदेव गीतांपर्यंत आणि आदिवासी गीतांपासून चित्रपट गीतांपर्यंत अशी अनेकविध गीते गाऊन त्यांनी कार्यक्रमात मोठी रंगत आणली. त्यांना गायिका सपना हेमण यांची साथ लाभली. दिगंबर नाईक यांचे नेटके संयोजन लाभलेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेचे वैविध्य आणि वैभव दर्शविणाऱ्या गीतांबरोबरच मंगळागौर, लावणी, आदिवासी, गोविंदा, कोळीनृत्य इत्यादी नृत्यप्रकारांचेही सादरीकरण करण्यात आले. प्रेक्षकांचा त्यांना जल्लोषी प्रतिसाद लाभला.