Monday, 26 May 2014

विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत यश



कोल्हापूर, दि. २३ मे: केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धे शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या तीन विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. आदर्श नागरे, महेश देशपांडे आणि राजश्री सलामवाडे अशी त्यांची नावे आहेत. गतवर्षीही या अधिविभागाच्या विद्यार्थ्याने या स्पर्धेत द्वितिय क्रमांक प्राप्त केला होता, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. डी.टी. शिर्के यांनी दिली.
या तिन्ही विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार असून नवी दिल्ली येथे विशेष समारंभात ही पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. नवी दिल्ली येथील निवास व्यवस्था आणि रेल्वेच्या एसी-थ्री टिअरने जाण्या-येण्याचा प्रवास खर्चही दिला जाणार आहे.
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मध्यवर्ती सांख्यिकी कार्यालयातर्फे सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धा-२०१४ चे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १९ जानेवारी रोजी ही स्पर्धा संपूर्ण देशभरात एकाच वेळी घेण्यात आली. ऐनवेळी देण्यात आलेल्या विषयावर तीन तासांच्या अवधीत सुमारे ५००० शब्दांचा निबंध लिहीण्याची आव्हानात्मक अशी ही स्पर्धा होती. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रु. १५,०००/- चे एक, द्वितिय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. १२,०००/- ची दोन, तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. १०,०००/- ची तीन आणि प्रत्येकी रु. ५,०००/- ची उत्तेजनार्थ पाच अशी पारितोषिके होती. तृतीय क्रमांकाची तीनही पारितोषिके शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाच्या किरण निहलानी या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.

Thursday, 22 May 2014

विद्यापीठ प्रवेश परीक्षांचा दुसरा टप्पा २५ मे रोजी; परीक्षा केंद्रांतील बदलाची नोंद घेण्याचे आवाहन



 कोल्हापूर, दि. २१ मे: शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा दुसरा टप्पा येत्या २५ मे रोजी पार पडणार असून त्या परीक्षांसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आलेला आहे, याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी केले आहे.
दि. २५ मे रोजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑफलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहेत. त्यासाठी यापूर्वी जाहीर केलेली परीक्षा केंद्रे किमान आवश्यक विद्यार्थी संख्येअभावी रद्द करण्यात आली असून आता या परीक्षा पुढीलप्रमाणे जिल्हावार केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सायबर, कोल्हापूर,
सांगली जिल्हा: श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स ॲन्ड सायन्स, सांगली
सातारा जिल्हा: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड.
     उपरोक्त प्रवेश परीक्षांना बसलेल्या संबंधित विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक व परीक्षा केंद्रांबाबतची माहिती विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, याची नोंद घेण्याचे आवाहनही कुलसचिव डॉ. मुळे यांनी केले आहे.
ग्रिव्हन्स फॉर्मची तरतूद
     ज्या परीक्षार्थींनी दोन विषयांच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरला असेल आणि २५ मे रोजी त्या परीक्षा एकाच वेळी होणार असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या दोहोंपैकी एक परीक्षा त्यावेळी द्यावी. त्यानंतर वरिष्ठ पर्यवेक्षकांकडे उपलब्ध करून देण्यात आलेले ग्रिव्हन्स फॉर्म भरून द्यावेत. त्यानुसार त्या परीक्षार्थींच्या उर्वरित विषयाची प्रवेश परीक्षा दि. १ जून २०१४ रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे घेण्यात येईल, असेही कुलसचिव डॉ. मुळे यांनी कळविले आहे.

दरम्यान, २५ मे रोजी होणाऱ्या ऑफलाइन प्रवेश परीक्षा व त्यांची वेळ पुढीलप्रमाणे:

प्रवेश परीक्षेचे नाव
वेळ
एम.सी.ए. (सायन्स)
स. ९.०० ते १०.३०
एम.सी.ए. (कॉमर्स)
एम.एस्सी. केमिस्ट्री (इंडस्ट्रीयल/ ॲप्लाइड/ इनऑरगॅनिक/ ऑरगॅनिक/ फिजिकल/ ॲनालिटीकल)
एम.एस्सी. (बॉटनी)
एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स)



स. ११.०० ते १२.३०
एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)
दु. १.०० ते २.३०
एम.ए./ एम.एस्सी. (भूगोल)
एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी)
एम.एस्सी. (फिजिक्स)
एम.एस्सी. (जिऑलॉजी)
एम.लिब. ॲन्ड इन्फॉ. सायन्स



दु. ३.०० ते ४.३०
एम.एस्सी. (मॅथेमॅटिक्स)
बी.लिब. ॲन्ड इन्फॉ. सायन्स
एम.एस्सी. (स्टॅटिस्टीक्स, ॲप्लाइड स्टॅटिस्टीक्स ॲन्ड इन्फॉर्मेटिक्स)


सायं. ५.०० ते ६.३०

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी विद्यापीठाचा सामंजस्य करार



अभिनव संशोधन प्रकल्पांना लाभणार प्रोत्साहन

कोल्हापूर, दि. २० मे: विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिनव व नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी शिवाजी विद्यापीठाने नुकताच सामंजस्य करार केला. या अंतर्गत सन २०१३-१४ साठीचा सुमारे ५० लाख रुपयांचा निधी लवकरच विद्यापीठाला प्राप्त होईल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी दिली.
मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे १३ मे रोजी आयोगाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर आयोगाच्या वतीने सदस्य सचिव डॉ. ए.व्ही. सप्रे यांनी तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी स्वाक्षरी केली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. मुळे यांनी सांगितले की, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राजीव गांधी आयोगातर्फे विद्यापीठाला ठराविक निधी देण्यात येणार आहे. सरधोपट संशोधन प्रकल्पांपेक्षा अभिनव व नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांनाच विशेषत्वाने प्राधान्य देण्याचे आयोगाचे धोरण आहे. विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय संस्था, तंत्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना विद्यापीठाच्या माध्यमातून विकेंद्रित पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सदर सामंजस्य करारात विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करणे, त्यांचे परीक्षण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर समिती गठित करणे आदींसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक मुद्द्यांचा समावेश आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वेगळ्या व दर्जेदार संशोधनाला निश्चितपणे चालना मिळेल, असा विश्वास डॉ. मुळे यांनी व्यक्त केला.

Friday, 9 May 2014

कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन




कोल्हापूर, दि. ९ मे: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५५व्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पुण्य स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांच्या हस्ते आज सकाळी साडेआठ वाजता मानव्यविद्या इमारतीसमोरील उद्यानातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून कर्मवीर पाटील यांच्याप्रती आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आदी उपस्थित होते.