Wednesday, 29 June 2016

राष्ट्र इतिहासाची निर्मिती अभिलेखांच्या माध्यमातूनच: डॉ. भास्कर धाटावकर




Dr. Bhaskar Dhatavkar

'तत्त्वबोध' मालिकेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर, दि. २९ जून: राष्ट्राच्या इतिहासाची निर्मिती ही अभिलेखांच्या माध्यमातूनच होत असते. त्यामुळे अभिलेखांचे जतन ही इतिहासाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागाराचे संचालक डॉ. भास्कर धाटावकर यांनी आज येथे केले. कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनाचे केंद्र बनते आहे, याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय संचलित व नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रीप्ट संलग्नित मॅन्युस्क्रीप्ट रिसोर्स सेंटर यांच्या वतीने 'तत्त्वबोध' मालिकेअंतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत 'राष्ट्रीय इतिहासामध्ये अभिलेखाचे महत्त्व' या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. धाटावकर म्हणाले, इतिहास हा सोयीचा, आपल्याला आवडेल असा किंवा आपल्याला हवा तसा लिहीणे चुकीचे आहे. तो वस्तुनिष्ठच असला पाहिजे. इतिहास ही राष्ट्राची स्मृती आहे. इतिहास घडविण्यासाठी इतिहासाची जाणीव असणे आवश्यक आहे. त्यासाठी अभिलेख पाहण्याची संशोधकांची मानसिकता असली पाहिजे. ऐतिहासिक दस्तावेजांशी, अभिलेखांशी संशोधकाने अक्षरशः बोलले पाहिजे, इतकी जवळीक निर्माण झाली, तरच त्यातून वस्तुनिष्ठ इतिहासाच्या मांडणीला पूरक पुरावे संशोधक निर्माण करू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्या राष्ट्रात अभिलेख असत नाहीत, त्या राष्ट्राला इतिहास असूच शकत नाही, असेही ते म्हणाले.
भविष्यात ज्या नोंदी पुरावा ठरू शकतात, त्यांना अभिलेख मानले जाते, असे सांगून अभिलेखाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. धाटावकर यांनी सम्राट अशोक, राजर्षी शाहू यांचा जन्मदिनांक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिनांक यांच्या निश्चितीची उदाहरणे दिली. ते म्हणाले, सम्राट अशोकाविषयी सन १८३२ पर्यंत आपल्याला माहिती नव्हती. एका ब्रिटीश अभ्यासकामुळे तत्कालीन सिलोनमध्ये सम्राट अशोकाविषयी माहिती मिळू शकली. एका बौद्ध भिक्खूच्या मदतीने त्याने पाली भाषेतील व ब्राह्मी लिपीतील 'महावंश' या ग्रंथाचा अभ्यास केला, त्यातून आपल्याला महान अशोकाविषयी प्राथमिक माहिती होऊ शकली. हे अभिलेखाचे महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू यांच्या वाढदिवसानिमित्त 'मूकनायक'चा विशेषांक प्रसिद्ध करण्याविषयी राजर्षींना लिहीलेल्या पोस्टकार्डाने २६ जून ही राजर्षींची जन्मतारीख निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित करण्यामध्ये बिकानेर पुराभिलेखागारामधील अभिलेखांनी कळीची भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे  यांनी अध्यक्षीय भाषणात मॅन्युस्क्रीप्ट रिसोर्स सेंटरच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, दहा हजारांहून अधिक मोडी हस्तलिखितांचा ठेवा जतन करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तत्त्वाचा शोध आणि बोध घेण्यासाठी मॅन्युस्क्रीप्ट रिसोर्स सेंटर हे महत्त्वाचे साधन आहे. राज्यात अशा प्रकारची केवळ पाच सेंटर आहेत. इतिहास संशोधकांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यायला हवा. त्यातून नवसंशोधनासाठीचे अनेक नवे संदर्भही सामोरे येण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांनी परिचय करून दिला. कॉन्झर्वेशनिस्ट शफीक देसाई यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, डॉ. आर.के. कामत, डॉ. अरुण भोसले, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर यांच्यासह विविध शासकीय ग्रंथालये व महाविद्यालयांचे ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--००--

Monday, 27 June 2016

वन-महोत्सव मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याचा विद्यापीठाचा निर्धार




कोल्हापूर, दि. २७ जून: महाराष्ट्र शासनातर्फे येत्या १ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या वन महोत्सवांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक कार्यक्रम पत्रिका निश्चितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
दि. १ जुलै रोजी विद्यापीठ परिक्षेत्रात त्रिस्तरीय कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठात करावयाच्या सुमारे १० हजार वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी विद्यापीठासह शहरांतील महाविद्यालयांतील सुमारे एक हजार स्वयंसेवक उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाने शासनाच्या उद्दिष्टाला पूरक अशा प्रकारे स्वतःचा वृक्षारोपण कार्यक्रम निश्चित करावा. तथापि, प्रत्येक महाविद्यालयाने १ जुलै रोजी किमान ५० रोपे लावणे अपेक्षित आहे. वन विभागामार्फत वृक्षारोपणासाठी जी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, त्या ठिकाणी महाविद्यालयांनी वृक्षारोपणासाठी त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आवश्यकतेनुसार वेळोवेळी उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहनही महाविद्यालयांना करण्यात आले आहे.
या बैठकीला विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, विभागीय वनसंरक्षक एम.व्ही. राव, भारत पाटील, संपतराव पाटील, सह-समन्वयक सुरेश शिखरे आदी उपस्थित होते.

Sunday, 26 June 2016

शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास व्हर्च्युअल क्लासरुम तंत्रज्ञान उपयुक्त: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



'एनआयआरएफ' रँकिंगबद्दल शिवाजी विद्यापीठाचा केला गौरव; वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग इमारत, म्युझियम कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन उत्साहात
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या इमारतीचे कोनशीला अनावरण करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे डिजीटल कोनशीला अनावरण करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमातमार्गदर्शन करतानामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

शिवाजी विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन केल्यानंतर दिव्यचक्षू विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध सुविधेचीमाहिती घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री विनोद तावडे व मंत्री चंद्रकांतदादा पाटील.


कोल्हापूर, दि. २६ जून: व्हर्च्युअल क्लासरुम हे ज्ञानाचे आधुनिक भांडार आहे. शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास निश्चितपणे हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेली ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग इमारत व राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारत यांचे भूमीपूजन, राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियान (रुसा)अंतर्गत विकसित केलेल्या व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात २८व्या तर राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान प्राप्त केल्याबद्दल गौरव अशा संयुक्त समारंभात संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, 'रुसा'च्या महाराष्ट्र प्रकल्प संचालक श्रीमती मनिषा वर्मा, खासदार संभाजीराजे छत्रपती व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पूर्वी शैक्षणिक अथवा आरोग्यविषयक सुविधा शहरापासून गावांपर्यंत नेण्यासाठी रस्ते महत्त्वाची भूमिका बजावत. पण, आजच्या युगात 'कम्युनिकेशन हायवे'च्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ व्हर्च्युअल मार्गांनी गावांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे. डिजीटल अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण-शहरी दरी कमी होण्यास मदत होते आहे. ज्ञानाची व्याप्तीही यामुळे वाढली. जगातील सर्व ज्ञान तंत्रज्ञानामुळे आपल्याला उपलब्ध झाले आहे. ते खुले करून त्याचे लाभ सर्वदूर पोहोचविणे गरजेचे आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या विविध आघाड्यांवरील कामगिरीचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे, ते विद्यापीठ शैक्षणिक बाबत आघाडीवर असायलाच हवे. त्याप्रमाणे आपण एनआयआरएफ क्रमवारीत राज्यात आघाडीवर आहात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. भविष्यात देशातल्या विद्यापीठांत आघाडीवर येण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करील.
वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागासाठी नवी इमारत उभी करत असताना या ठिकाणी आजच्या काळाची नवी आव्हाने पेलण्यास सुसज् असे पत्रकार घडवावेत. त्यासाठी नवीन, कालसुसंगत अभ्यासक्रम निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, 'रुसा'मुळे राज्यात खऱ्या अर्थाने विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याला गती मिळाली आहे. या अभियानातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठांनी करून घेणे आवश्यक आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या इमारतीचे कोनशीला अनावरण करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे डिजीटल कोनशीला अनावरण करण्यात आले.
तत्पूर्वी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामध्ये 'रुसा'अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गत वर्षभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर केला. 
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, प्राचार्य, अधिविभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये देशात २८वे, तर राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान प्राप्त केल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना विशेष पत्र प्रदान करून विद्यापीठाचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

'एनआयआरएफ' रँकिंगबद्दल मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
शिवाजी विद्यापीठाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठात प्राप्त केलेले अग्रस्थान ही प्रशंसनीय बाब आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना या बाबतीत गौरव करणारे प्रशस्तीपत्र आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रदान केले. राज्यातील शैक्षणिक क्षेत्राच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. राज्यात होऊ घातलेल्या आयआयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ यांसारख्या संस्थांमुळे स्पर्धाक्षम शिक्षणाची कवाडे मोठ्या प्रमाणावर खुली होतील. विद्यापीठीय शिक्षणाचे स्वरुप अधिकाधिक उपयोजित आणि संशोधनात्मक करण्याबरोबरच कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ निश्चितच अग्रक्रमाने प्रयत्नशील राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शिवाजी विद्यापीठात शाहू जयंती उत्साहात




कोल्हापूर, दि. २६ जून: शिवाजी विद्यापीठात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. डी.व्ही. मुळे, डॉ. आर.के. कामत, डॉ. वासंती रासम, डॉ.एस.एस. महाजन, देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.