कोल्हापूर, दि. २७ जून: महाराष्ट्र शासनातर्फे
येत्या १ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या वन महोत्सवांतर्गत मोठ्या प्रमाणात
वृक्ष लागवड करून हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार आज शिवाजी विद्यापीठात
झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक कार्यक्रम पत्रिका निश्चितीच्या बैठकीत
करण्यात आला. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
दि. १ जुलै रोजी विद्यापीठ परिक्षेत्रात
त्रिस्तरीय कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठात
करावयाच्या सुमारे १० हजार वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी विद्यापीठासह शहरांतील महाविद्यालयांतील
सुमारे एक हजार स्वयंसेवक उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाने शासनाच्या
उद्दिष्टाला पूरक अशा प्रकारे स्वतःचा वृक्षारोपण कार्यक्रम निश्चित करावा. तथापि,
प्रत्येक महाविद्यालयाने १ जुलै रोजी किमान ५० रोपे लावणे अपेक्षित आहे. वन
विभागामार्फत वृक्षारोपणासाठी जी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, त्या ठिकाणी महाविद्यालयांनी
वृक्षारोपणासाठी त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आवश्यकतेनुसार वेळोवेळी
उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहनही महाविद्यालयांना करण्यात आले आहे.
या बैठकीला विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव
डॉ.व्ही.एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, विभागीय
वनसंरक्षक एम.व्ही. राव, भारत पाटील, संपतराव पाटील, सह-समन्वयक सुरेश शिखरे आदी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment