मोफत योग शिबीर पुढील वर्षभर राबविण्याची कुलगुरूंची घोषणा
कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ, कणेरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या
मोफत योग शिबीराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात सुमारे ३४०० योग साधक सहभागी
झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह आबालवृद्धांचा समावेश
होता.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते
८ या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या योग उपक्रमास दैनंदिन २००हून अधिक साधकांनी लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद
पाहता हे मोफत योग शिबीर पुढील वर्षभरही राबविण्याची घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांनी केली.
यावेळी कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व सेवक उपस्थित होते. प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी सुमारे दीड तास
विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली.
यापुढील काळातही
साधकांनी दररोज सकाळी ६ ते ७.३० या कालावधीत
विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिराचा उत्तम आरोग्यासाठी जरुर
लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे तसेच श्री काडसिध्देश्वर स्वामी यांनी केले.
प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागामार्फत जाणीव जागृती
शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्य विभागामार्फत दुसऱ्या जागतिक योग दिनानिमित्त लोकांमध्ये योगाचे जाणीव जागृती व्हावी, यासाठी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. झेड. पी.
महालक्ष्मी हॉल, टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी ६ ते ८ या वेळेत मोफत ओंकार ध्यान व प्राणायाम शिबीर घेण्यात आले. २०० साधकांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबिरात प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्य विभागाच्या प्र.संचालक व विभागप्रमुख डॉ. सुमन बुवा यांच्यासह सोऽहं योग वर्गाच्या सौ. विणा माल्डीकर व शिक्षक यांनी सहभाग घेतला. प्रीती चव्हाण यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment