Tuesday, 31 July 2018

ज्ञानी व्हा; संधींच्या अवकाशात उंच भरारी घ्या!

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे थेट संवादात विद्यार्थ्यांना आवाहन

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

 
शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. नमिता खोत, डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.एस. पाटील, श्री. महेश काकडे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. पा.टी. गायकवाड.


कोल्हापूर, दि. ३१ जुलै: चांगले मित्र जोडा, नातेसंबंध जोपासा, उत्तम ज्ञान मिळवा आणि संधींच्या अवकाशात उंच भरारी घ्या, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आज सायंकाळी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाला. त्यावेळी या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, मानव्यविद्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, इनक्युबेशन मंडळाचे संचालक डॉ. आर.के. कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड उपस्थित होते.
VC Dr. Devanand Shinde
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे प्रयोजन आणि जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक उदाहरणे, दाखले देत सुमारे दीड तास खिळवून ठेवले. सर्वांशी चांगले वर्तन करीत, सकारात्मक दृष्टीकोनातून वाटचाल करीत असताना दिशेचे भान आणि वडिलकीचा मान राखण्याचा सल्ला देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठातील शिक्षणानंतरच्या कालखंडात आपल्यासमोर आता कोणतेही वळण येणार नाही; तर, एका विशिष्ट दिशेने आता या पुढील वाटचाल करावयाची आहे, हे ध्यानात घेऊन प्रवास आखला पाहिजे. आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे, कितपत शिक्षणाचे इंधन आपल्या गाडीत भरायचे आहे, कौशल्य विकासाचे सर्व्हिंसिंग कधी करावयाचे आहे, आणि आपले डेस्टीनेशन काय आहे, याचा साकल्याने विचार करूनच या साऱ्या प्रवासाची आखणी करायला हवी. चांगला माणूस निर्माण करणे हे शिक्षणाचे प्रयोजन असल्याचे स्वामी विवेकानंद सांगतात. चांगला माणूस म्हणजे सामाजिकदृष्ट्या सजग आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम मानव समाज निर्माण करणे होय. आजघडीला उच्चशिक्षणाच्या प्रवाहात देशपातळीवर १७ ते १८ टक्के विद्यार्थी येत असतात, त्यामध्ये आपला समावेश आहे, ही जाणीव ठेवून कोणत्याही आमिषांना बळी न पडता, पथभ्रष्ट न होता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. नव्या युगात ध्येयाकडे नेणारी साधने बदलली आहेत. संशोधन, व्यवस्थापन, कौशल्य, तंत्रज्ञान ही ती चार साधने होत. त्यांचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांनी करावयास हवा, असे त्यांनी सांगितले.
सकारात्मक दृष्टीकोन, आत्मविश्वास, सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर ही आजच्या जीवनात यशस्वी होण्यासाठीची महत्त्वाची चतुःसूत्री असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे पुढे म्हणाले, जीवनात यशस्वी होणारे लोक कधीही कारणे सांगत नाहीत. परिस्थितीला संधी समजून ते आत्मविश्वासाने वाटचाल करतात आणि यशाला गवसणी घालतात. आत्मविश्वास नसेल, तर मनुष्य म्हणून आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. तथापि, केवळ आत्मविश्वास आहे म्हणून यशस्वी होता येते; असे नाही, मात्र त्यातून संघर्षाची प्रेरणा जरुर मिळते. माणसाच्या आयुष्यात विरोधकाइतकीच स्पर्धकाचीही जरुरी असते कारण विरोधक आपल्याला सतर्क आणि सावधान करतो तर स्पर्धक गतिशील आणि क्रियाशील बनवितो. मात्र स्पर्धा करीत असताना ती प्रामाणिक, निकोप आणि उच्च दर्जाची असेल, याची मनाशी खात्री करा. ज्या क्षेत्रात जाईन तेथे उच्च स्थानीच असेन, असा मनाशी निर्धार करून वाटचाल करा. नवतंत्रज्ञानाचा वापर नवनव्या संधींचा शोध घेण्यासाठी करा आणि नव्या वाटा निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी केले.
Pro-Vice Chancellor Dr. D.T. Shirke
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आपण उच्चशिक्षणासाठी विद्यापीठात दाखल झाला आहात, हे खरे आहे; मात्र, अभ्यासक्रमाच्या पलिकडे वाचन, लेखन अथवा तत्सम इतर उपक्रमांत सहभागी व्हा. अभ्यासक्रमाच्या सीमा भेदून ज्ञानसंपादन करा. विद्यापीठातील आपल्या निवासादरम्यान विविध कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि आपला सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास साधा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. एस.आर. यादव यांना ई.के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांचा देशातील टॉप टेन सर्वोत्कृष्ट संशोधकांत समावेशाबद्दल आणि मराठी अधिविभागाचे नवनाथ गोरे यांच्या फेसाटी कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. नंदकुमार मोरे आणि उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी या मानपत्रांचे लेखन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक व विद्यापीठ अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी मानपत्रांचे वाचन केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचा ई.के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा.डॉ. एस.आर. यादव यांचा मानपत्र देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

देशातील टॉप टेन संशोधकांमध्ये गणना झाल्याबद्दल प्रा.डॉ. पी.एस. पाटील यांचा मानपत्गौर देऊन रव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

श्री. नवनाथ गोरे यांच्या 'फेसाटी' कादंबरीला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा मानपत्र देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


Tuesday, 24 July 2018

ज्ञानकेंद्राच्या माध्यमातून ग्रंथपालांनी समाजाचे दिग्दर्शन करावे - डॉ.सुरेश जांगे



कोल्हापूर, दि.24 जुलै - ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून ग्रंथपालांनी समाजाचे दिग्दर्शन करावे, असे प्रतिपादन गुलबर्गा विद्यापीठाचे प्रभारी ग्रंथपाल डॉ.सुरेश जांगे यांनी आज येथे केले.


            शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या 55 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून विद्यापीठ ग्रंथालय आणि इन्फ्लीबनेट सेंटर, गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या 'आबालाल रेहमान आर्ट गॅलरी'मध्ये एक आठवडयाचे 'इन्स्टीटयुशनल रिपॉजेटरी डिस्पेस सोल-ग्रंथालय संगणकीकरण' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  त्यावेळी डॉ.जांगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  या कार्यशाळेचे उद्धाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते झाले.  यावेळी स्वप्निल पटेल, विजयकुमार श्रीमाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सुरेश जांगे म्हणाले, सध्याच्या काळातील बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर महाविद्यालये विद्यापीठातील ग्रंथालयांनी उद्याचे चांगले बदल घडविण्यासाठी स्विकारणे आवश्यक आहे. या माध्यमातून वापरकर्त्याला माहिती सेवा देण्यासाठी ग्रंथालयांनी प्रामुख्याने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी ग्रंथालयामध्ये उपलब्ध माहितीचा शिक्षकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा.
गुजरात येथील इन्फ्लीबनेट सेंटर गांधीनगरचे शास्त्रज्ञ-सी (एलएस) एच.जी.होसमनी म्हणाले, ग्रंथालये म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जगभरातील माहिती सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी मंदिरे आहेत. या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळते.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी ग्रंथालयाशी निगडित असलेले 'सोल' हे सॉफ्टवेअर हाताळल्यास विद्यापीठ महाविद्यालयांमधील ग्रंथालयांमध्ये एकसारखेपणा निर्माण होईल.  उच्च शिक्षणाशी निगडित असलेल्या प्रत्येकांने ग्रंथालयाशी जोडले गेले पाहिजे. 
तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय माहितीशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ.सुमित्रा जाधव, डॉ. एच.एम. वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला.  तसेच, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्सच्या पहिल्या बॅचचेश्री.पी.सी.पाटील, श्री.एम.एस.शिरगांवकर, श्रीमती शामला खोतलांडे या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सहाय्यक ग्रंथपाल डॉ.पी.बी.बिलावर संपादित 'इसेंशियल ऑफ इन्फॉर्मेशन लिटरसी अँड इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन लिटरसी फॉर इन्फॉर्मेशन सिकर' या त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
ग्रंथालय विभागप्रमुख डॉ.शालिनी लिहितकर यांनी प्रास्ताविक केले.  विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ.नमिता खोत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अलमास पेंढारी व भाग्यश्री गुरव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.पी.बी.बिलावर यांनी आभार मानले.
या कार्यशाळेत गुजरात, कर्नाटक, गोवा महाराष्ट्रातून 60 हून अधिकजण सदस्य सहभागी झाले आहेत.
-----


Friday, 20 July 2018

नवउद्योजकांसाठी क्रीडाक्षेत्रात मोठया संधी - प्रा.हयुॲग यू


कोल्हापूर, दि.20 जुलै - नवउद्योजकांसाठी क्रीडाक्षेत्रात मोठया संधी उपलब्ध आहेत. खेळाकडे फक्त खेळ म्हणून पाहता खेळाडूंना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे लागणारे साहित्य सुविधा पुरविण्याकडे लक्ष केंद्रीत केल्यास या क्षेत्रामध्ये नवउद्योजगांसाठी संधीच्या प्रचंड वाटा निर्माण होणार आहेत,  असे प्रतिपादन तैवानच्या त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे प्रा.हयुॲग यू यांनी केले.



तैवानच्या त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठाच्या शिष्टमंडळाच्या विद्यापीठ भेटीच्या अंतिम तिसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये 'क्रीडा विज्ञान' या विषयावरील आंतरराष्ट्रीय खेळावर आधारीत कार्यशाळेच्या उद्धाटन प्रा.हयुॲग यू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.  यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर उपस्थित होते.

प्रा.हयुॲग यू पुढे म्हणाले, वेगवेगळया शहरांमध्ये आयोजित केलेल्या खेळांमुळे तेथील स्थानिकांना, उद्योजकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.  तैवानच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा 336.2 एकराच्या भव्य परिसरामध्ये नंदा कॅम्पसमध्ये विविध खेळांची मैदाने विस्तारलेली आहेत. या सामंजस्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांच्या खेळाडूंना लाभ होणार आहे. त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठ हे तैवानमधील क्रमांक एकचे विद्यापीठ असून जगामध्ये नावाजलेल्या विद्यापीठांशी 290 शैक्षणिक करार केलेले आहेत. परंतु, शिवाजी विद्यापीठ हे तैवान विद्यापीठाशी क्रीडाविषयक करार करणारे हे पहिले विद्यापीठ आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून आंतरराष्टृीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाने क्रीडा विषयक शिक्षणाच्या उद्योगास प्रोत्साहन दिले जाते.  सातत्याने या विद्यापीठामार्फत राष्टृीय आंतरराष्टृीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या विविध कौशल्यपूर्ण खेळांचा परिणाम म्हणून 2016 मध्ये पहिली महिला बॉक्सरने तैवानमध्ये 'दंगल' घडविली.

क्रीडा विषयातील अध्यापनशास्त्राबद्दल विचार व्यक्त करताना प्रा.सिअँग लियू म्हणाले, शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याकडे प्रशिक्षकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास उत्तम खेळाडू निर्माण होतील.  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यासाठी पारंपारिक क्रीडा कौशल्यांपेक्षा आधुनिक क्रीडा कौशल्ये आत्मसात करण्याकडे प्रशिक्षकांचा ओढा असला पाहिजेे.  खेळाकडे आर्थिक उन्नतीचे साधन म्हणून पाहिल्यास शहरांचा विकास होण्यास सहाय्यभूत ठरतेे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, आंतरराष्टृीयस्तरावर खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी खेळाचे मानसशास्त्र अवगत असणे गरजेचे आहेे. खेळाडू आणि खेळांमध्ये वापरले जाणारे शास्त्र या दोहोंमध्ये समन्वय साधल्यास खेळाचा निश्चित विकास होणे शक्य आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बंध निर्माण होत आहेत.  जागतिक पातळीवर आपल्या खेळाडूंचा निभाव लागण्यासाठी या सामंजस्य करारान्वये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी खेळाचे मानसशास्त्र अवगत असणे गरजेचे आहेे.  खेळाडू हा समाजातील एक महत्वाचा घटक असून खेळाडूंनी खेळांमधील सांघीक भावना जपणे आवश्यक आहे.  विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे हे आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार होणे शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी खेळाडूंमध्ये प्रबळ इच्छा शक्ती, शारीरिक, मानसिक तडफ याबरोबरच विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य असणे आवश्यक आहे.  जागतिकीकरणाच्या काळामध्ये खेळाचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे बनले आहे.

क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.पी.टी.गायकवाड यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  इंग्रजी अधिविभागाच्या डॉ.टी.के.करिकट्टी यांनी सुत्रसंचालन केले.  यावेळी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाचे समन्वयक डॉ.अनिल घुले, विविध महाविद्यालयातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक मोठयासंख्येने उपस्थित होते.


----