कोल्हापूर, दि.24 जुलै - ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून ग्रंथपालांनी समाजाचे दिग्दर्शन करावे, असे प्रतिपादन गुलबर्गा विद्यापीठाचे प्रभारी ग्रंथपाल डॉ.सुरेश जांगे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र व ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या 55 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून विद्यापीठ ग्रंथालय आणि इन्फ्लीबनेट सेंटर, गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या 'आबालाल रेहमान आर्ट गॅलरी'मध्ये एक आठवडयाचे 'इन्स्टीटयुशनल रिपॉजेटरी डिस्पेस व सोल-ग्रंथालय संगणकीकरण' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ.जांगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यशाळेचे उद्धाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वप्निल पटेल, विजयकुमार श्रीमाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सुरेश जांगे म्हणाले, सध्याच्या काळातील बदलत्या माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर महाविद्यालये व विद्यापीठातील ग्रंथालयांनी उद्याचे चांगले बदल घडविण्यासाठी स्विकारणे आवश्यक आहे. या माध्यमातून वापरकर्त्याला माहिती सेवा देण्यासाठी ग्रंथालयांनी प्रामुख्याने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी ग्रंथालयामध्ये उपलब्ध माहितीचा शिक्षकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा.
गुजरात येथील इन्फ्लीबनेट सेंटर गांधीनगरचे शास्त्रज्ञ-सी (एलएस) एच.जी.होसमनी म्हणाले, ग्रंथालये म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जगभरातील माहिती सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी मंदिरे आहेत. या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळते.
अध्यक्षीय भाषणात
प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी ग्रंथालयाशी निगडित असलेले 'सोल' हे सॉफ्टवेअर हाताळल्यास विद्यापीठ व महाविद्यालयांमधील ग्रंथालयांमध्ये एकसारखेपणा निर्माण होईल. उच्च शिक्षणाशी निगडित असलेल्या प्रत्येकांने ग्रंथालयाशी जोडले गेले पाहिजे.
तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र
विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ.सुमित्रा जाधव, डॉ. एच.एम. वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉरमेशन
सायन्सच्या पहिल्या बॅचचे, श्री.पी.सी.पाटील, श्री.एम.एस.शिरगांवकर, श्रीमती शामला खोतलांडे या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सहाय्यक ग्रंथपाल
डॉ.पी.बी.बिलावर संपादित 'इसेंशियल ऑफ इन्फॉर्मेशन लिटरसी अँड इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन लिटरसी फॉर इन्फॉर्मेशन सिकर' या त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रंथालय विभागप्रमुख डॉ.शालिनी लिहितकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ.नमिता खोत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अलमास
पेंढारी व भाग्यश्री गुरव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.पी.बी.बिलावर यांनी आभार मानले.
या कार्यशाळेत गुजरात, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातून 60 हून अधिकजण सदस्य सहभागी झाले आहेत.
-----
No comments:
Post a Comment