Tuesday, 31 July 2018

ज्ञानी व्हा; संधींच्या अवकाशात उंच भरारी घ्या!

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे थेट संवादात विद्यार्थ्यांना आवाहन

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

 
शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वागत समारंभात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. नमिता खोत, डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.एस. पाटील, श्री. महेश काकडे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. पा.टी. गायकवाड.


कोल्हापूर, दि. ३१ जुलै: चांगले मित्र जोडा, नातेसंबंध जोपासा, उत्तम ज्ञान मिळवा आणि संधींच्या अवकाशात उंच भरारी घ्या, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आज सायंकाळी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाला. त्यावेळी या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, मानव्यविद्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, इनक्युबेशन मंडळाचे संचालक डॉ. आर.के. कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड उपस्थित होते.
VC Dr. Devanand Shinde
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे प्रयोजन आणि जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक उदाहरणे, दाखले देत सुमारे दीड तास खिळवून ठेवले. सर्वांशी चांगले वर्तन करीत, सकारात्मक दृष्टीकोनातून वाटचाल करीत असताना दिशेचे भान आणि वडिलकीचा मान राखण्याचा सल्ला देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठातील शिक्षणानंतरच्या कालखंडात आपल्यासमोर आता कोणतेही वळण येणार नाही; तर, एका विशिष्ट दिशेने आता या पुढील वाटचाल करावयाची आहे, हे ध्यानात घेऊन प्रवास आखला पाहिजे. आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे, कितपत शिक्षणाचे इंधन आपल्या गाडीत भरायचे आहे, कौशल्य विकासाचे सर्व्हिंसिंग कधी करावयाचे आहे, आणि आपले डेस्टीनेशन काय आहे, याचा साकल्याने विचार करूनच या साऱ्या प्रवासाची आखणी करायला हवी. चांगला माणूस निर्माण करणे हे शिक्षणाचे प्रयोजन असल्याचे स्वामी विवेकानंद सांगतात. चांगला माणूस म्हणजे सामाजिकदृष्ट्या सजग आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम मानव समाज निर्माण करणे होय. आजघडीला उच्चशिक्षणाच्या प्रवाहात देशपातळीवर १७ ते १८ टक्के विद्यार्थी येत असतात, त्यामध्ये आपला समावेश आहे, ही जाणीव ठेवून कोणत्याही आमिषांना बळी न पडता, पथभ्रष्ट न होता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. नव्या युगात ध्येयाकडे नेणारी साधने बदलली आहेत. संशोधन, व्यवस्थापन, कौशल्य, तंत्रज्ञान ही ती चार साधने होत. त्यांचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांनी करावयास हवा, असे त्यांनी सांगितले.
सकारात्मक दृष्टीकोन, आत्मविश्वास, सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर ही आजच्या जीवनात यशस्वी होण्यासाठीची महत्त्वाची चतुःसूत्री असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे पुढे म्हणाले, जीवनात यशस्वी होणारे लोक कधीही कारणे सांगत नाहीत. परिस्थितीला संधी समजून ते आत्मविश्वासाने वाटचाल करतात आणि यशाला गवसणी घालतात. आत्मविश्वास नसेल, तर मनुष्य म्हणून आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. तथापि, केवळ आत्मविश्वास आहे म्हणून यशस्वी होता येते; असे नाही, मात्र त्यातून संघर्षाची प्रेरणा जरुर मिळते. माणसाच्या आयुष्यात विरोधकाइतकीच स्पर्धकाचीही जरुरी असते कारण विरोधक आपल्याला सतर्क आणि सावधान करतो तर स्पर्धक गतिशील आणि क्रियाशील बनवितो. मात्र स्पर्धा करीत असताना ती प्रामाणिक, निकोप आणि उच्च दर्जाची असेल, याची मनाशी खात्री करा. ज्या क्षेत्रात जाईन तेथे उच्च स्थानीच असेन, असा मनाशी निर्धार करून वाटचाल करा. नवतंत्रज्ञानाचा वापर नवनव्या संधींचा शोध घेण्यासाठी करा आणि नव्या वाटा निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी केले.
Pro-Vice Chancellor Dr. D.T. Shirke
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आपण उच्चशिक्षणासाठी विद्यापीठात दाखल झाला आहात, हे खरे आहे; मात्र, अभ्यासक्रमाच्या पलिकडे वाचन, लेखन अथवा तत्सम इतर उपक्रमांत सहभागी व्हा. अभ्यासक्रमाच्या सीमा भेदून ज्ञानसंपादन करा. विद्यापीठातील आपल्या निवासादरम्यान विविध कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि आपला सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास साधा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. एस.आर. यादव यांना ई.के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांचा देशातील टॉप टेन सर्वोत्कृष्ट संशोधकांत समावेशाबद्दल आणि मराठी अधिविभागाचे नवनाथ गोरे यांच्या फेसाटी कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. नंदकुमार मोरे आणि उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी या मानपत्रांचे लेखन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक व विद्यापीठ अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी मानपत्रांचे वाचन केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचा ई.के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा.डॉ. एस.आर. यादव यांचा मानपत्र देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

देशातील टॉप टेन संशोधकांमध्ये गणना झाल्याबद्दल प्रा.डॉ. पी.एस. पाटील यांचा मानपत्गौर देऊन रव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

श्री. नवनाथ गोरे यांच्या 'फेसाटी' कादंबरीला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा मानपत्र देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


No comments:

Post a Comment