Friday, 20 July 2018

नवउद्योजकांसाठी क्रीडाक्षेत्रात मोठया संधी - प्रा.हयुॲग यू


कोल्हापूर, दि.20 जुलै - नवउद्योजकांसाठी क्रीडाक्षेत्रात मोठया संधी उपलब्ध आहेत. खेळाकडे फक्त खेळ म्हणून पाहता खेळाडूंना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे लागणारे साहित्य सुविधा पुरविण्याकडे लक्ष केंद्रीत केल्यास या क्षेत्रामध्ये नवउद्योजगांसाठी संधीच्या प्रचंड वाटा निर्माण होणार आहेत,  असे प्रतिपादन तैवानच्या त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे प्रा.हयुॲग यू यांनी केले.



तैवानच्या त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठाच्या शिष्टमंडळाच्या विद्यापीठ भेटीच्या अंतिम तिसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये 'क्रीडा विज्ञान' या विषयावरील आंतरराष्ट्रीय खेळावर आधारीत कार्यशाळेच्या उद्धाटन प्रा.हयुॲग यू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.  यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर उपस्थित होते.

प्रा.हयुॲग यू पुढे म्हणाले, वेगवेगळया शहरांमध्ये आयोजित केलेल्या खेळांमुळे तेथील स्थानिकांना, उद्योजकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.  तैवानच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा 336.2 एकराच्या भव्य परिसरामध्ये नंदा कॅम्पसमध्ये विविध खेळांची मैदाने विस्तारलेली आहेत. या सामंजस्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांच्या खेळाडूंना लाभ होणार आहे. त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठ हे तैवानमधील क्रमांक एकचे विद्यापीठ असून जगामध्ये नावाजलेल्या विद्यापीठांशी 290 शैक्षणिक करार केलेले आहेत. परंतु, शिवाजी विद्यापीठ हे तैवान विद्यापीठाशी क्रीडाविषयक करार करणारे हे पहिले विद्यापीठ आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून आंतरराष्टृीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाने क्रीडा विषयक शिक्षणाच्या उद्योगास प्रोत्साहन दिले जाते.  सातत्याने या विद्यापीठामार्फत राष्टृीय आंतरराष्टृीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या विविध कौशल्यपूर्ण खेळांचा परिणाम म्हणून 2016 मध्ये पहिली महिला बॉक्सरने तैवानमध्ये 'दंगल' घडविली.

क्रीडा विषयातील अध्यापनशास्त्राबद्दल विचार व्यक्त करताना प्रा.सिअँग लियू म्हणाले, शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याकडे प्रशिक्षकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास उत्तम खेळाडू निर्माण होतील.  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यासाठी पारंपारिक क्रीडा कौशल्यांपेक्षा आधुनिक क्रीडा कौशल्ये आत्मसात करण्याकडे प्रशिक्षकांचा ओढा असला पाहिजेे.  खेळाकडे आर्थिक उन्नतीचे साधन म्हणून पाहिल्यास शहरांचा विकास होण्यास सहाय्यभूत ठरतेे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, आंतरराष्टृीयस्तरावर खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी खेळाचे मानसशास्त्र अवगत असणे गरजेचे आहेे. खेळाडू आणि खेळांमध्ये वापरले जाणारे शास्त्र या दोहोंमध्ये समन्वय साधल्यास खेळाचा निश्चित विकास होणे शक्य आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बंध निर्माण होत आहेत.  जागतिक पातळीवर आपल्या खेळाडूंचा निभाव लागण्यासाठी या सामंजस्य करारान्वये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी खेळाचे मानसशास्त्र अवगत असणे गरजेचे आहेे.  खेळाडू हा समाजातील एक महत्वाचा घटक असून खेळाडूंनी खेळांमधील सांघीक भावना जपणे आवश्यक आहे.  विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे हे आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार होणे शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी खेळाडूंमध्ये प्रबळ इच्छा शक्ती, शारीरिक, मानसिक तडफ याबरोबरच विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य असणे आवश्यक आहे.  जागतिकीकरणाच्या काळामध्ये खेळाचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे बनले आहे.

क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.पी.टी.गायकवाड यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  इंग्रजी अधिविभागाच्या डॉ.टी.के.करिकट्टी यांनी सुत्रसंचालन केले.  यावेळी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाचे समन्वयक डॉ.अनिल घुले, विविध महाविद्यालयातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक मोठयासंख्येने उपस्थित होते.


----

No comments:

Post a Comment