Wednesday, 18 July 2018

तैवान शिष्टमंडळ भेट: दिवस पहिला

त्सिंगहुआ विद्यापीठाशी क्रीडाविषयक करार करणारे शिवाजी विद्यापीठ देशातील पहिलेच: प्रा. ह्युअँग यू यांची माहिती



तैवानच्या राष्ट्रीय त्सिगहुआ विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष प्रा. ह्युअँग यू यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

तैवानच्या राष्ट्रीय त्सिगहुआ विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या अॅल्युमनी सर्व्हिस विभागाचे प्रमुख प्रा. सिअँग लियू यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात बोलताना तैवानचे प्रा. यू.

तैवानच्या शिष्टमंडळाच्या स्वागत बैठकीत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह (डावीकडून) डॉ. अनिल घुले, डॉ. पी.टी. गायकवाड, प्रा. सिअँग लियू, प्रा. ह्युअँग यू, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. डी.आर. मोरे.
कोल्हापूर, दि. १८ जुलै: तैवानच्या त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील सत्तरहून अधिक विद्यापीठे आणि आघाडीच्या शैक्षणिक संस्थांशी विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, ज्ञानविस्तार आदी क्षेत्रांतील आदान-प्रदानासंदर्भात सामंजस्य करार झालेले आहेत. तथापि, आमच्याशी क्रीडाविषयक सामंजस्य करार करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे, असे गौरवोद्गार तैवान येथील त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे अध्यक्ष प्रा. ह्युअँग यू यांनी आज येथे काढले.
तैवानच्या विद्यापीठाचे द्विसदस्यीय शिष्टमंडळ शिवाजी विद्यापीठासह परिसरातील क्रीडाविषयक सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी तीन दिवसांच्या भेटीवर आले आहे. या शिष्टमंडळाचे स्वागत आज सकाळी विद्यापीठात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रा. यू म्हणाले, गेल्या महिन्यात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी तैवान भेटीदरम्यान त्सिंगहुआ विद्यापीठासही भेट दिली होती. तेथेच त्यांनी विद्यापीठाशी क्रीडाविषयक आदान-प्रदान करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला. स्पोर्ट्स सायकॉलॉजी, कोचिंग लीडरशीप डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स अन्ड लीजर बिझनेस, टीम कन्सल्टेशन, स्पोर्ट्स फंडिंग जनरेशन आदी बाबींबरोबर क्रीडा सुविधा विकासाच्या अनुषंगानेही आम्ही शिवाजी विद्यापीठास सहकार्य करू. त्याचप्रमाणे योगा, कबड्डी आणि कुस्तीसारख्या स्थानिक खेळांची शास्त्रशुद्ध माहिती व प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य घेण्यास आम्ही उत्सुक आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, या सामंजस्य कराराचा उभय विद्यापीठांतील क्रीडा विभाग अधिक सशक्त होण्यास निश्चितपणे मदत मिळणार आहे. या दोन्ही विद्यापीठांतील क्रीडा विभागांदरम्यान सुसंवाद प्रस्थापित होऊन त्याचा विद्यापीठातील शिक्षक, प्रशिक्षक आणि खेळाडू या सर्वांनाच मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्रा. यू आणि प्रा. सिअँग लियू यांना विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनीही परतभेटीदाखल त्सिंगहुआ विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह कुलगुरू डॉ. शिंदे यांना प्रदान केले.
यावेळी विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षामार्फत तयार करण्यात आलेला विद्यापीठाचा माहितीपट शिष्टमंडळास दाखविण्यात आला. क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांनी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वाटचालीविषयी पाहुण्यांना अवगत केले. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाचे समन्वयक डॉ. अनिल घुले यांनी प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. अभिजीत वणिरे यांच्यासह शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते.

प्रदर्शनीय कबड्डी सामन्याने पाहुणे प्रभावित

स्वागत समारंभानंतर तैवानच्या शिष्टमंडळासाठी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात महिला व पुरूष गटाच्या प्रदर्शनीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनीय सामन्यात सहभागी चारही संघांच्या खेळाडूंना त्यांनी सुरवातीला शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धकांची गती, तडफ आणि जिगरबाज खेळी पाहून दोघेही पाहुणे अत्यंत प्रभावित झाले. व्यासपीठावरील आसने सोडून खाली मैदानाजवळ जाऊन त्यांनी या खेळाडूंचे आपल्या मोबाईलवर चित्रीकरणही केले. एखादी चाल अगर पकड झाल्यानंतर त्याविषयी तसेच गुणांकनाविषयी वेळोवेळी डॉ. गायकवाड आणि डॉ. घुले यांच्याकडून त्याविषयी अधिक जाणूनही घेत होते. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंनी दोन्ही बाजूंना उभे राहून पाहुण्यांना मानवंदना दिली.


त्यानंतर शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या क्रीडा संकुलास भेट देऊन तेथील सोयीसुविधांची, विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकची पाहणी केली.
दुपारच्या सत्रात मोरेवाडी येथील शांतिनिकेतन शाळा येथील क्रीडा सुविधा आणि शाहू महाविद्यालयाच्या जलतरण तलावाचीही पाहणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment