कोल्हापूर, दि.12 डिसेंबर - देशपातळीवरील विविध माध्यमांमधून स्त्रियांचे जे चित्रण होत असते त्यामध्ये माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात, असे प्रतिपादन मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार संध्या नरे पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन केंद्राच्यावतीने 'माध्यमे व स्त्रिया' या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार संध्या नरे पवार बोलत होत्या.मानव्यशास्त्र इमारतीच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.निशा मुडे पवार होत्या.यावेळी डॉ.सुनिता डी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ पत्रकार पवार पुढे म्हणाल्या, सामाजीकरणाच्या प्रक्रीयेत माध्यमांचे प्रभाव अधिक आहे.आपल्या जगणाच्या आणि मनोरंजनाच्या प्रक्रीया ठरविण्यामध्ये माध्यमांचा मोठा वाटा आहे.विविध घटक लिंगभावातील असमानतेचा नकळतपणे अथवा जाणीवपूर्वक वापर करीत असतात.त्यामुळे माध्यमे ही काही वेळेस स्त्री-पुरूषांमधील असमानतेचे बळकटीकरण करतात.माध्यमे ही पितृसत्तेची भूमिका कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळतपणे पार पाडीत असतात.स्त्रीवाद आणि माध्यमे यामध्ये कायम द्वंद्व पहायला मिळते.कोल्हापूर अथवा मुंबईमधील कष्टकरी कामगार स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी माध्यमांना आस्था असतेच, असे नाही.परंतु, अशा प्रकारचा अन्याय जर हॉलीवूड किंवा बॉलीवूडमध्ये होत असेल तर माध्यमे त्याची लगेच दखल घेतात, कारण त्याचे बातमी मूल्य मिळते.माध्यमे संस्कृतीचे भडक प्रकटीकरण करताना पुरूष सत्तावादी विचारांवर अधारलेली असतात.तसेच, भाषेचे राजकारणही माध्यमांच्या माध्यमातून होत असते.स्त्रीच्या जगण्याचा, कर्तुत्वाचा उल्लेख बातमीत असला तरी मुख्य चौकट पुरूष प्रधान संस्कृतीची असते.आजही, महिला पत्रकार मुख्य धारेतील माध्यमांमध्ये उपसंस्कृतीचा भाग बनत आहेत.अशा वेळी समाजातील वंचित घटक परिघाबाहेरच राहतात.प्राथमिक पातळीवरच जगणाऱ्या समुहांच्याकडे दुर्लक्ष होते.कष्टकरी, शेतीकरी स्त्रियांच्या रोजगाराचे अधिकाधिक अवमूल्यन होत आहेे.जो पर्यंत माध्यमांमधील मुख्य बातम्यांमध्ये स्त्रियांना स्थान मिळत नाही तो पर्यंत समान पातळीवर स्त्रिया आलेत, असे वाटणार नाही.
अध्यक्षस्थानावरून बोलताना वृत्तपत्र व संवादशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.निशा मुडे पवार म्हणाल्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर माध्यमे व स्त्रिया हा विषय फार महत्वाचा राहिलेला आहे.उत्तर प्रदेशमध्ये स्त्रिया स्वत:चे वर्तमानपत्र आणि रेडिओ चॅनेल चालवत आहेत.ही पर्यायी व्यवस्था का निर्माण झाली यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.महिलांचे रोजगार, त्यांचे प्रश्न, निर्णय प्रक्रीयेतील त्यांचा सहभाग यावर माध्यमांमध्ये विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे.
अध्यासन केंद्राचे समन्वयक अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला.शितल पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.कविता वड्राळे यांनी आभार मानले.यावेळी दशरथ पारेकर, वसंत भोसले, डॉ.मेघा पानसरे, डॉ.वाळवेकर, डॉ.राजन गवस, डॉ.प्रकाश पवार यांचेसह विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
------
No comments:
Post a Comment