Monday 24 December 2018

समाजसेवा करण्याची सर्वाधिक संधी प्रशासकीय सेवेत: विकास खारगे



वन विभागाचे सचिव विकास खारगे


कोल्हापूर, दि. २४ डिसेंबर: समाजसेवा करण्याची मनापासून तळमळ असेल तर ती करण्याची सर्वाधिक संधी शासकीय, प्रशासकीय सेवेत मिळते. त्यासाठी युवकांनी जरुर या सेवांचा विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवेतील संधी या विषयावर श्री. खारगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते, तर शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी रंगनाथ नाईकडे, हणमंत धुमाळ, श्री. भोसले प्रमुख उपस्थित होते.
प्रशासकीय सेवेचे महत्त्व सांगताना श्री. खारगे म्हणाले, या सेवेमध्ये अधिकाऱ्याला जनसेवेची मोठी संधी मिळत असते. किंबहुना, या सेवेसाठीच त्याला विशिष्ट अधिकार प्रदान करण्यात आलेले असतात. त्या अधिकारांचा वापर संबंधित अधिकारी किती जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने करतो, यावर त्याच्या सेवेचे मूल्यमापन अवलंबून असते. महत्त्वाचे म्हणजे जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्याला विविध ठिकाणी सेवा बजावण्याची आणि आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही येथे प्राप्त होत असते. त्यामुळे युवकांनी या सेवेकडे ऐहिक सुखांचा लाभ करवून देणारी सेवा अशा दृष्टीने पाहण्याऐवजी समाजाप्रती आपले कर्तव्य बजावण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.
केवळ प्रशासकीय सेवा हेच केवळ चांगले क्षेत्र आणि इतर क्षेत्रे चुकीची, असे मात्र तरुणांनी मानता कामा नये, असे सांगून श्री. खारगे म्हणाले, सर्वच क्षेत्रे चांगली आहेत. प्रशासकीय सेवेत लाखो उमेदवारांमधून मोजक्या उमेदवारांना संधी मिळत असते. त्यामुळे इथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची निवड होण्याची शक्यता नसते. त्यामुळे ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे, अशा क्षेत्राची वेळीच निवड करून त्या माध्यमातून तरुणांनी देशसेवेची संधी बजावली पाहिजे. कोणतेही क्षेत्र गौण न मानता आपली आवड लक्षात घेऊन तिला मेहनतीची, अभ्यासाची जोड देऊन यशस्वी होण्याची कुवत स्वतःमध्ये निर्माण करावी आणि आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असेही त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सर्वसाधारण तत्त्वे सांगताना श्री. खारगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी निर्मळ मनाने आणि अगदी मनोभावे, आवडीने अभ्यास करावा. मेहनत आणि परिश्रमाला इथे पर्याय नाही. दर्जेदार पुस्तकांचा संदर्भासाठी वापर करावा. ती मुळापासून वाचण्यास प्राधान्य द्यावे. मुद्देसूद टिपणे काढावीत. स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा, अभ्यासण्याचा दृष्टीकोन एकात्म स्वरुपाचा असावा. म्हणजे एकाच वेळी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा सर्वंकष विचार करून त्या तिन्हींचा अभ्यास करण्याची गरज आहे. महाविद्यालयातील विविध उपक्रमांत सहभागी व्हावे, जेणे करून संघटन कौशल्य, नेतृत्वगुण, खिलाडू वृत्ती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सांघिक भावना तुमच्यात निर्माण होईल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा कधीही वाया जाणारा नाही. उलट व्यक्तीमत्त्व विकासासाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. कोणत्याही क्षेत्रात गेलात, तरी त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. न्यूनगंड बाजूला ठेवून इच्छाशक्ती आणि संय या जोरावर स्पर्धा परीक्षांत यशस्वी होणे सहजशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली दशसूत्री विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले, ध्येयप्राप्तीच्या इच्छेला अभ्यासाची जोड द्यावी. आपल्या मर्यादा ओळखून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने अभ्यास करावा. चांगली पुस्तके तसेच माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी वापर करावा. नियमित वृत्तपत्रे व मासिकांचे वाचन करावे. गटचर्चा तसेच लिहीण्याच्या सरावाला प्राधान्य द्यावे. स्पर्धा परीक्षांच्या अधिकृत संकेतस्थळांवरुन ताजा अभ्यासक्रम पाहून त्यानुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे आणि चांगल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख तसेच केंद्र प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक, प्रशासकीय सेवक, वन विभागाचे अधिकारी यांच्यासह स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment