Saturday, 15 December 2018

संस्कृतीचा अभ्यास करणे हे युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे - पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख



कोल्हापूर, दि.15 डिसेंबर - देशातील विविध प्रांतातील संस्कृतीचा एकत्रितपणे अभ्यास करणे हे युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, युवा आणि खेल मंत्रालय, भारत सरकार शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या 'राष्ट्रीय एकात्मता शिबीर - 2018' च्या उद्धाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.  यावेळी राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथील विभागीय संचालक डी.कार्तिकेयन, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, रा.से.यो.चे संचालक डॉ.डी.के.गायकवाड, आर.सईदानायक, अजय शिंदे यांची उपस्थिती होती.
     
 पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख पुढे बोलताना म्हणाले, भारत सरकारच्या रा.से.यो.चे उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात.विविध उपक्रमांमधून देशातील युवकांसाठी शिस्तीचे, नियमांचे जबाबदारीचे पालन करण्यासाठीचे मौलीक शिकवण दिले जाते.यामुळे या विद्यार्थ्यांनी देशामध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त केलेले आहे.  देशातील महाराष्ट्रातील सांस्कृतिक ठेवा जपणारे कोल्हापूर हे फार मोठे एेतिहासिक शहर आहे.लोकांमध्ये मिसळून विविध ठिकाणची संस्कृती अभ्यासण्याची संधी या मध्यामातून देशातील युवकांना प्राप्त होते.देशातील बोलीभाषा मौलोगणीक बदलत जाते, तरीही आपली संस्कृती एकजूट, अखंड ठेवण्यामध्ये लोकशाहीचे फार मोठे योगदान आहे.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथील विभागीय संचालक डी.कार्तिकेयन आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, रा.से.यो.च्या माध्यमातून देशपातळीवर युवा शक्तीला संघटीतपणे मार्गदर्शन करण्याचे कार्य केले जाते.या शिबिरांमधून युवकांच्या अंगभूत कला गुणांना वाव मिळतो. भारत सरकारची रा.से.यो.ही देशपातळीवरील फार मोठे कुटुंब आहे.आज, या कुटुंबामध्ये चाळीस लाखांहून अधिक युवाशक्तीचे मूठ बांधण्याचे कार्य झालेले आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, भारता देश हे विशाल सांस्कृतिक ठेवा जपणारे केंद्र आहे.  राष्टृीय एकतेमुळेच आपली एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.  भारतासारख्या विशाल राष्टृाची अखंडता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी युवकांवर आहे.धार्मिक, सांस्कृृतिक विचारधारा भिन्न असूनही आपणांस एकसंध राहण्यासाठी रा.से.यो.चे विविध उपक्रम बळकटी प्राप्त करून देतात.
विद्यापीठामध्ये निघालेल्या राष्ट्रीय एकात्मता फेरी मधून देशातील विविध भागांच्या संस्कृतीचे दर्शन घडले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, पदुच्चेरी, केरळ, राजस्थान, आसाम, गोवा आदी राज्यातील विद्यापीठांचे संघ, शिबिरार्थी, संघव्यवस्थापक यांचेसह कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, विभागीय संचालक डी.कार्तिकेयन, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, रा.से.यो.चे संचालक डॉ.डी.के.गायकवाड, आर.सईदानायक, अजय शिंदे सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ.चांगदेव बंडगर प्रविण साळोखे लिखित राष्ट्रीय सेवा योजना-संकल्पना युवक विकास या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
तद्नंतर, राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी तयार करण्यात आलेल्या डायरीचे प्रकाशन झाले.
रा.से.यो.चे संचालक डॉ.डी.के.गायकवाड यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला, समन्वयक डॉ.डी.जी.चिघळीकर यांनी आभार मानले.  यावेळी विविध राज्यातील रा.से.यो.विद्यार्थी, संघ व्यवस्थापक मोठया संख्येने उपस्थित होते.
-----

No comments:

Post a Comment