शिवाजी विद्यापीठात आयोजित औषधी व सुगंधी वनस्पतीविषयक शेतकरी प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना डॉ. एस.एस. बर्वे. सोबत (डावीकडून) डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. एस.एस. बर्वे. |
कोल्हापूर, दि. २० डिसेंबर: भारतातील
शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध असून
त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई)
येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस.एस. बर्वे यांनी आज येथे व्यक्त
केले.
शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र अधिविभाग, महाराष्ट्र शासनाचा
कृषी विभाग, ‘आत्मा’चे
प्रकल्प संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘औषधी व
सुगंधी वनस्पती संवर्धन व प्रक्रिया’ या
विषयावर एकदिवसीय जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
विभागीय कृषी सहसंचालक डी.डी. तांबाळे प्रमुख उपस्थित होते तर प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाच्या नीलांबरी सभागृहात हा कार्यक्रम
झाला.
डॉ. बर्वे म्हणाले, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना
प्रचंड मोठ्या संधी आहेत. जगभरातील औषध, सुगंधी द्रव्य आणि सौंदर्यप्रसाधने
निर्माण करणाऱ्या उद्योगांना त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. नैसर्गिक
साधनसंपत्तीने भारत अतिशय समृद्ध आहे, तथापि, जागतिक स्तरावर या क्षेत्रातील भारताचा
वाटा हा अवघा एक टक्का इतका अत्यल्प आहे. तो आणखी किमान दोन टक्क्यांनी तर आपण
सहजरित्या वाढवू शकतो. केवळ पश्चिम घाटावर लक्ष केंद्रित केले तरी बराच पल्ला
गाठता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी लागवडीची मोठी संधी आहे. केवळ जिरॅनियमच्या
लागवडीमधूनही एकरी एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, इतकी त्याची
मागणी आहे.
औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचे फायदे सांगताना डॉ. बर्वे
म्हणाले, या वनस्पतींना सहजासहजी कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. त्यांना
जनावरे तोंड लावत नाहीत किंवा त्यांचा भाजी म्हणूनही वापर होत नाही. त्यामुळे ज्या
हेतूसाठी त्या लावल्या जातात, त्यासाठीच वापरल्या जात असल्याने त्यातून होणारा
फायदा मोठा असतो. तसेच, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या अगर संस्था शेतकऱ्यांना
त्याचे प्रक्रिया तंत्रज्ञान मोफत देऊ करतात आणि तयार माल व तेलखरेदीची हमी असते.
त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल खपविण्यासाठीची अतिरिक्त यातायात करावी लागत
नाही.
डॉ. डी.टी. शिर्के |
यावेळी वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, डॉ.
अकल्पिता अरविंदेकर यांच्यासह वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक, शासकीय अधिकारी
व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी या
उपक्रमाचे आयोजन केले.
No comments:
Post a Comment