Friday 7 December 2018

बहुशाखीय संशोधकांमध्ये विचारमंथनाची गरज: प्रा. ल्यू ख्रिस्तोफर

शिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना कॅनडाचे प्रा. ल्यू ख्रिस्तोफर व शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. राहुल पाटील, नेपाळचे डॉ. सुबेदी, डॉ. जी.जी. चौगुले, आर.वाय. पाटील, डॉ. डी.जी. किल्लेदार, ए.वाय. पाटील, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. आर.के. कामत, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. मानसिंगराज निंबाळकर.


विद्यापीठात दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

प्रा. ल्यू ख्रिस्तोफर
कोल्हापूर, दि. ७ डिसेंबर: आंतरविद्याशाखीय आणि बहुशाखीय संशोधन होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने विज्ञानाच्या सर्वच शाखांमधील संशोधकांनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याची मोठी गरज आज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठातील प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आजपासून मटेरिअल्स व एन्व्हायर्नमेंट सायन्सेस या विषयावरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला. त्याच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषण करताना प्रा. ख्रिस्तोफर बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र अधिविभाग, संगणकशास्त्र अधिविभाग, युसिक विभाग, श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय, सोळांकूर, न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर सोळांकूर महाविद्यालयाचे संस्थापक ए.वाय. पाटील, अध्यक्ष आर.वाय. पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत, वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील, सोळांकूरचे प्राचार्य डॉ. जी.जी. चौगुले, डॉ. आर.बी. पाटील, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. मानसिंगराज निंबाळकर आदी उपस्थित होते.
प्रा. ख्रिस्तोफर बीजभाषणात पुढे म्हणाले, मानवी अस्तित्वासाठी पर्यावरणपूरक संशोधन करणे ही जागतिक संशोधन समुदायासमोरची आद्य प्राथमिकता असायला हवी. जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले तर पर्यावरणाचाच भाग असलेल्या मानवाचेही अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधनावर भर दिला पाहिजे. त्या दृष्टीने यासारख्या परिषदा सातत्याने जगभरात होणे अत्यावश्यक आहे.
डॉ. पी.एस. पाटील
अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांनीही हरित तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भौतिक विज्ञानात मटेरियल्सच्याही पुढे आता एडव्हान्स्ड मटेरिअल्स, नॅनो-स्ट्रक्चर्ड मटेरिअल्स अशा नवसंशोधन शाखा उदयास आल्या आहेत. त्यांनी संशोधनाची दिशाच बदलून टाकली आहे. सोने आणि चांदीचे नॅनो कण, कार्बन नॅनो ट्यूब्ज, ग्राफिन अशा नवीन प्रकारच्या कणांच्या शोधाने क्रांती घडवून आणली आहे. वैद्यकीय क्षेत्रासह मानवी जीवनास आवश्यक अशा अनेक उपयोजित क्षेत्रांमध्ये या कणांचा वापर करण्याच्या अनुषंगाने प्रचंड संशोधन संधी आहेत. आपल्या समस्यांना अल्प खर्चातील, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक उपाय देण्याची क्षमता त्यांच्यात आहेत. बहुशाखीय संशोधकांनी त्या संदर्भातील संशोधन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, संशोधकांनी सुरक्षित, स्वस्त, वापरण्यास सुलभ अशा प्रकारचे तंत्रज्ञान आणि उत्पादने निर्माण करण्याचे धोरण ठरवून त्या दिशेने संशोधन करण्याची आज गरज आहे. विज्ञानाच्या प्रत्येक शाखेच्या पीएचडी संशोधकाने त्याच्या संशोधनाच्या बरोबरीने किमान एक पेटंट मिळविण्याची जिद्द बाळगून संशोधन केल्यास त्या संशोधनाचे महत्त्वही वाढेल. आजघडीला संशोधनाला चांगली आर्थिक मदत मिळते आहे, त्यामुळे संशोधनाची मानसिकता हाच कळीचा मुद्दा आहे. नवतंत्रज्ञानामुळे आणि बहुशाखीय विस्तारामुळे संशोधन क्षेत्रात आमाप संधी निर्माण झाल्या आहेत. संशोधकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य व्ही.एम. पाटील, ए.वाय. पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. डॉ. आर.के. कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आभार मानले.
या परिषदेत कॅनडासह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, तैवान, श्रीलंका, सौदी अरेबिया आदी देशांतील संशोधक सहभागी झाले असून सुमारे ३१० शोधनिबंध प्राप्त झाले आहेत.


No comments:

Post a Comment