Wednesday, 17 June 2020

विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरू, अधिष्ठाता यांना निरोप; समारंभात २९०० जणांचा ऑनलाईन सहभाग

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यकाळ चिरस्मरणीय: डॉ. देवानंद शिंदे यांची कृतज्ञता



शिवाजी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा सत्कार करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. शेजारी श्रीमती नागरबाई शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

मावळते प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचा सत्कार करताना वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील. शेजारी सौ. सुनिता शिर्के व  कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


कोल्हापूर, दि. १७ जून: शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू पदाचा माझा कार्यकाळ अत्यंत आनंददायी व चिरस्मरणीय झाला. या कालखंडात माझे विद्यापीठ परिक्षेत्रात अनेक ऋणानुबंध निर्माण झाले, त्याचबरोबर विविध पदांच्या जबाबदाऱ्यांनी अनुभवसंपन्न केले, अशी कृतज्ञतेची भावना शिवाजी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांना आज विद्यापीठातर्फे औपचारिक निरोप देण्यात आला. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर समारंभ टाळून मोजके पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा निरोप समारंभ फेसबुक लाइव्ह थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुमारे २९०० जणांनी पाहिला. या सर्वांशी कार्यपूर्ती संवाद साधताना कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्या मातोश्री नागरबाई शिंदे, पत्नी सौ. अनिता आणि मुलगी कैरवी प्रमुख उपस्थित होते. कुलगुरूंच्या बरोबरीने प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचाही कार्यकाळ आज समाप्त झाला. त्यांनाही यावेळी निरोप देण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ. सुनिता शिर्के यावेळी उपस्थित होत्या.
डॉ. शिंदे म्हणाले, एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू, अशी काहीशी मानसिक अवस्था झाली आहे. पाहता पाहता पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. आपणा सर्वांच्या साथीने हा पाच वर्षांचा प्रवास अत्यंत आनंददायी आणि चिरस्मरणीय झाला आहे. गेली पाच वर्षे आपण सारे अत्यंत एकदिलाने या विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी काम करीत आहोत. मी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून येथे आलो, तेव्हा येथे माझे कोणीच नव्हते; आणि आज मात्र शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांत माझे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीकडून राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्मभूमीकडे झालेल्या माझ्या या प्रवासाने आशीर्वादाचा आणि सदिच्छांचा माझ्यावर इतका वर्षाव केला, की त्या प्रेमाने मी सदगदित झालो आहे.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या तीन विद्यापीठांचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची अभूतपूर्व संधी मला लाभली, याचे सारे श्रेय शिवाजी विद्यापीठ परिवाराला आहे. डॉ.आंबेडकर, राजर्षी शाहू यांच्यानंतर महात्मा फुले, लोकहितवादी आणि पुन्हा डॉ. आंबेडकर यांच्या कर्मभूमीकडे झालेला हा प्रवास मला व्यक्तीशः अत्यंत अनुभवसमृद्ध करणारा ठरला. शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरु झाल्यामुळेच फुले-शाहु-आंबेडकर या विचारधारेचा पाईक म्हणून माझी एका अर्थाने एक शैक्षणिक परिक्रमा पूर्ण झाली. या कार्यकाळात माझ्या परीने विद्यार्थीकेंद्री व विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, असे ते म्हणाले.
कोल्हापूरकरांच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य
कोल्हापुरातील प्रत्येक समाजघटकाने मला इतके प्रेम दिले की त्यातून उतराई होणे अशक्य असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या कोल्हापूरनगरीबद्दल एका वाक्यात सांगायचे झाल्यास इतर शहरे तुम्हाला राहायचं कसे ते शिकवतात, परंतु कोल्हापूर तुम्हाला जगायचे कसे हे सांगते, शिकवते. या कोल्हापूरने मला जे शिकवलं, ते आता अखेरच्या श्वासापर्यंत त्या पद्धतीनंच जगत राहीन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या कारकीर्दीत राबविलेल्या विविध योजना, उपक्रम यांचा आढावा घेतला.
प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनीही विद्यापीठातील सर्व घटकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठ ही माझी मातृसंस्था आहे. तिला विविध भूमिकांतून योगदान देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासारख्या संवेदनशील मनाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाला योगदान देता आले, याचा मोठा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्यांच्या गडकोटांवर अतिशय प्रेम करणारे, प्रत्येक गोष्टीतील बारकावे पाहणारे, सामाजिक बांधिलकी सांभाळणारे असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व लाभलेले डॉ. शिंदे हे विलोभनीय व्यक्तीमत्त्व आहे. कामामध्ये परफेक्शनचा आग्रह, विद्यापीठाचे ब्रँडिंग आणि डॉक्युमेंटेशन या बाबतीत त्यांनी शिवाजी विद्यापीठाला मोठेच योगदान दिले आहे. या गोष्टी विद्यापीठाने पुढे निरंतर चालू राखल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता यांचाही कार्यकाळ संपुष्टात आला. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, मानव्यविद्या विद्याशाखेच्या डॉ. भारती पाटील आणि आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत यांनीही त्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्राचार्य डॉ. नितीन सोनजे, डॉ. पी.एन. वासंबेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रंथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन निरोप देण्यात आला. सर्व अधिष्ठाता यांनाही ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे श्रीमती नागरबाई शिंदे, सौ. अनिता शिंदे व कैरवी शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी आभार मानले.


डॉ. नितीन करमळकर यांनी स्वीकारली प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे



शिवाजी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर. शेजारी मावळते प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


कोल्हापूर, दि. १७ जून: पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून स्वीकारली.
आज दुपारी डॉ. करमळकर यांचे शिवाजी विद्यापीठात आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केल्यानंतर डॉ. करमाळकर यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला. कुलगुरू कार्यालयात मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून त्यांनी प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी डॉ. करमळकर यांचे बंधू व पुतणी यांच्यासह श्रीमती नागरबाई शिंदे, सौ. अनिता शिंदे, कैरवी शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
हाडाचा शिक्षक, तळागाळात फिरून अभ्यास करणारा संशोधक, नेतृत्वगुण असलेला सक्षम प्रशासक आणि विद्यापीठाची खडा न् खडा माहिती असणारे प्राध्यापक अशी ओळख असणारे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. डॉ. करमळकर मूळचे कणकवलीचे आहेत. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९६२ रोजी झाला. त्यांचे हायस्कूलसह पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले आहे. शिवाजी विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात बीएस्सी केल्यानंतर त्यांनी एमएस्सीसाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे पेट्रोग्राफी जिओकेमेस्ट्री ऑफ अल्ट्रामफाइट्स फ्रॉम पार्टस ऑफ लडाख हिमालाय (विथ रेफ्रन्स टू क्रोमॅटिक मिनरलायझेशन)या विषयात पीएचडी प्राप्त केली. याच विषयाशी निगडीत बाबींवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनीत तसेच जर्मनीत संशोधन केले. करमळकर यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन, तसेच संशोधनाचा मोठा अनुभव आहे. पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्याचे संशोधनाचे विषय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. परदेशातील काही संस्थांबरोबर संशोधन प्रकल्पही सुरू आहेत. दगड हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध प्रकारच्या अधिवासात आढळणाऱ्या दगडांवर त्यांचे संशोधन सुरू आहे. त्यांच्या कामाचा विविध संस्थांकडून आजवर गौरव करण्यात आला. पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना ते इंटर्नल क्वालिटी अॅशुरन्स सेलचे (आयक्यूएसी) संचालक, मनुष्यबळ विकास खात्याच्या रूसायोजनेचे समन्वयक, पर्यावरण विभागाच्या अभ्यास मंडळ आणि परीक्षा समितीचे अध्यक्ष, भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक आणि शैक्षणिक मंडळाचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे बजावल्या आहेत. विद्यापीठीय प्रशासन व्यवस्थेची सविस्तर माहिती आणि उच्च शिक्षणाची व्यापक जाण या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

मातृसंस्थेसाठी योगदान देण्याची संधी: डॉ. करमळकर
शिवाजी विद्यापीठ ही माझी मातृसंस्था आहे. प्रभारी कुलगुरू पदाच्या जबाबदारीमुळे काही काळ मला या मातृसंस्थेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन मिळालेल्या अल्प कालावधीत अनुभवाचा फायदा करून देण्याबरोबरच विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्व संबंधित घटकांना सोबत घेऊन काम करण्यास प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या वेळी व्यक्त केली.

Tuesday, 16 June 2020

वृत्तपत्रविद्या विभागाच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिका ग्रंथाचे प्रकाशन

पत्रकारितेतील बदलांना पूरक अभ्यासक्रमांचा वेध घ्या: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिका ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह (डावीकडून) डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. शिवाजी जाधव, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. निशा मुडे-पवार आणि वसंत भोसले. 


कोल्हापूर, दि. १६ जून: कोविड-१९ साथीमुळे जीवनाचे संदर्भ बदलताहेत, त्याचप्रमाणे शिक्षणाचेही संदर्भ बदलताहेत. या बदलांना पत्रकारितेचे क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. पत्रकारितेतील या बदलांना पूरक अशा अभ्यासक्रमांचा शोध व वेध घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या पत्रकारिता विभागाची गौरवशाली वाटचाल या स्मरणिका ग्रंथाचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार-संपादक वसंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, पत्रकारिता विभागाच्या स्मरणिका प्रकाशनाचा कार्यक्रम हा माझा अखेरचा आहे. एखाद्या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमाने कारकीर्दीची सांगता व्हावी, यापेक्षा एखाद्या शिक्षकाचा अन्य मोठा सन्मान होणे शक्य नाही. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागाने गेल्या ५० वर्षांत अनेक दिग्गज पत्रकार दिलेले आहेत. यापुढील काळातही नवनवीन कालसुसंगत उपक्रम राबवून पत्रकारितेच्या क्षेत्राला दिशा देण्याचे कार्य या विभागाने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार-संपादक व स्मरणिका ग्रंथाच्या संपादकीय मंडळाचे सदस्य वसंत भोसले यांनी वृत्तपत्रविद्या विभागाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा थोडक्यात वेध घेतला. ते म्हणाले, आपण अधिक सजगतेने व बारकाईने भोवतालाकडे पाह्यला हवे, इतिहासाकडेही तशाच चिकित्सक नजरेने पाह्यला हवे. आपण वर्तमानात नोंदी ठेवायला कमी पडतो, म्हणून आपला इतिहास अपूर्ण राहतो. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रविद्या विभागाने सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिका ग्रंथ निर्माण करून एक महत्त्वाचा दस्तावेज निर्माण केला आहे. येथून पुढेही इतिहासासंदर्भात अधिक तपशील प्राप्त करीत असताना वर्तमानातील नोंदी ठेवण्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. भोसले पुढे म्हणाले, संवाद तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठे बदल झालेले आहेत. त्या बदलांकडे, त्यातून निर्माण झालेल्या आव्हानांकडे आपण कसे पाहतो, हे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाने आपल्या हाती अत्याधुनिक साधने दिली आहेत, तथापि, त्या साधनांपलिकडे मानवी मेंदू, दर्जेदार कन्टेन्ट यांची गरज कायमच राहणार आहे. त्यामुळे आशय विश्लेषण आणि मांडणी यांच्यासाठी आग्रही राहात असतानाच आपण काळानुरुप अद्ययावत होत राहणेही खूप महत्त्वाचे आहे.
प्रारंभी अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे-घाटगे, सुधाकर बरगे उपस्थित होते.


श्री अंबाबाईसह शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या दर्शनाने

कुलगुरूंनी घेतला करवीर नगरीचा भावनिक निरोप








कोल्हापूर, दि. १६ जून: करवीरचे आराध्य दैवत आई श्री अंबाबाईसह महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा देणाऱ्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे भर पावसात दर्शन घेऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज शिवाजी विद्यापीठातील कारकीर्दीच्या अंतिम दिवसाच्या पूर्वसंध्येला करवीर नगरीचा भावनिक निरोप घेतला.

कोविड-१९च्या साथीमुळे श्री अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आज महाद्वारात उभे राहून आई अंबाबाईचे मुखदर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. बिंदू चौकामध्ये महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसह शहीद स्मृतीस्तंभास अभिवादन केले. दसरा चौक येथे जाऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासही त्यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. स्वामी विवेकानंद संस्थेच्या कार्यस्थळावरील डॉ. बापूजी साळुंखे आणि राजीव गांधी चौकातील लोकनेते बाळासाहेब देसाई आणि करवीर संस्थापक छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यांचेही दर्शन घेऊन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे त्यांच्यासमवेत होते.


Monday, 15 June 2020

शिवाजी विद्यापीठाचा डी.वाय. पाटील विद्यापीठासमवेत महत्त्वपूर्ण करार

संशोधन-विकासाच्या नव्या संधी;

विद्यार्थी-कर्मचाऱ्यांना होणार आरोग्य सुविधांचा लाभ


शिवाजी विद्यापीठ व डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व डीवायपी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुद्गल यांचेसमवेत (डावीकडून) डॉ. विनिता रानडे, डॉ. व्ही.व्ही. भोसले, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. संजय जाधव आदी.


कोल्हापूर, दि. १५ जून: शिवाजी विद्यापीठाने आज येथील डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या अभिमत विद्यापीठासमवेत शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण पंचवार्षिक सामंजस्य करार केला. या करारामुळे सार्वजनिक आरोग्य, औषधनिर्माण तसेच आरोग्यविषयक समाजशास्त्र आदी अनेक विषयांतील संशोधन विकास व अभ्यासाच्या संधी या करारान्वये उपलब्ध होणार आहेत. तसेच, या कराराचा विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी मोठा लाभ होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुद्गल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

डी.वाय पाटील विद्यापीठाचे डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे सुमारे ८०० बेडचे मल्टीस्पेशालिटी शैक्षणिक रुग्णालय आहे. रुग्णांसाठी येथे अत्यावश्यक सुविधा २४ तास उपलब्ध आहेत. या रुग्णालयासमवेत शिवाजी विद्यापीठाने आज केलेल्या सामंजस्य करारान्वये विद्यापीठाचे विद्यार्थी, कर्मचारी आणि त्यांचे प्राथमिक नातेवाईक यांना २० टक्के सवलतीच्या दरात अंतर्गत सुविधा उपलब्ध होतील. प्रयोगशाळा व रेडिओलॉजी सेवा १० टक्के सवलतीच्या दरात दिल्या जातील. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांमध्ये वेळोवेळी होणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यासाठी तसेच एकूणच वैद्यकीय शिक्षण व विविध विकार संशोधन या क्षेत्रांतील अद्यावत माहिती घेण्यासाठी मुक्त प्रवेश राहील. शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या सहकार्याने विविध संशोधन प्रकल्प हाती घेता येऊ शकतील, इतकेच नव्हे, तर तेथील संशोधन मार्गदर्शकही त्यांना उपलब्ध होतील. रुग्णालयाच्या समुपदेशन केंद्राच्या सेवा येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध होतील. शिवाजी विद्यापीठ परिसरातून डी.वाय. पाटील रुग्णालयापर्यंत रूग्णास नेण्यासाठी अँम्बुलन्स सेवा मोफत दिली जाईल. त्वचाविकार व मानसोपचार या संदर्भातील विशेष बाह्यरुग्ण सेवा विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रासाठी गरजेनुसार व मागणीनुसार उपलब्ध करुन दिल्या जातील. शिवाजी विद्यापीठात वेळोवेळी आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातील. विद्यापीठात होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्य कार्यक्रम इत्यादी प्रसंगी अँम्बुलन्स तसेच अन्य आरोग्यविषयक सुविधा दोहो बाजूंनी ठरविलेल्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे वेळोवेळी आरोग्यविषयक व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येईल.

या सामंजस्य करारावर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुद्गल, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी

डी.वाय.पी. विद्यापीठाचे उपकुलसचिव तसेच शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय जाधव, अधीक्षक विनोद पंडित, शिवाजी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. व्ही.व्ही. गायकवाड आदी उपस्थित होते.

 

सामंजस्य करार दूरगामी महत्त्वाचा: कुलगुरू डॉ. शिंदे

या करारासंदर्भात बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठासमवेत करण्यात आलेला सामंजस्य करार हा आरोग्य, औषधनिर्माण तसेच आरोग्यविषयक अन्य पूरक सेवा यांच्याशी संबंधित संशोधन विकासाच्या अनुषंगाने दूरगामी महत्त्वाचा आहे. शिवाजी विद्यापीठात सध्या वैद्यकीय माहितीशास्त्राचा आंतरराष्ट्रीय एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरू आहे. या विद्यार्थ्यांसाठी तर तो महत्त्वाचा आहेच, शिवाय अन्य विज्ञान तसेच समाजविज्ञान शाखांच्या संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे सध्या कोविड-१९सारख्या साथींमुळे समाजाच्या आरोग्यविषयक जाणीवा तीव्र झाल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सुविधा सवलतीच्या दरात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाल्या, तर उत्तमच आहे. त्या दृष्टीने त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.


Friday, 12 June 2020

सर्वाधिक संलग्नित महाविद्यालयांना भेट देणारे कुलगुरू

डॉ. देवानंद शिंदे यांच्या पाच वर्षांत ११६ महाविद्यालयांना भेटी; बहुतांशी सरप्राईज व्हिजिटचा समावेश


 

पूरबाधित संलग्नित महाविद्यालयातील नुकसानीची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

संलग्नित महाविद्यालयातील पूरबाधित ग्रंथसंपदेची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

कोल्हापूर, दि. १२ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वाधिक संलग्नित महाविद्यालयांना भेटी देणारे कुलगुरू ठरले आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुमारे ११६ महाविद्यालयांना नियोजित कार्यक्रमांसह सदिच्छा भेटी किंवा सरप्राईज व्हिजिट दिल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठाशी २९७ महाविद्यालये संलग्नित आहेत. त्यापैकी ११६ म्हणजे एक तृतिअंशांहून अधिक महाविद्यालयांना कुलगुरूंनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत भेटी दिल्या. यातील अनेक महाविद्यालयांना भेट देणारे ते पहिलेच कुलगुरू ठरले.

कुलगुरू डॉ. शिंदे शिवाजी विद्यापीठात रुजू झाल्यानंतर विविध महाविद्यालयांसह इतर संस्थांकडूनही त्यांना विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जात असे. संबंधित कार्यक्रमांसाठी जात असताना त्या मार्गावर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये असत. मात्र, आधी त्यांची नेमकी माहिती नसे. त्यामुळे जाताना किंवा येताना क्वचित एखाद्या महाविद्यालयास कुलगुरू अचानकपणे, कोणतीही पूर्वसूचना न देता भेट देत असत. पुढे संगणकशास्त्र अधिविभागाचे प्रा. आर.के. कामत आणि भूगोल अधिविभागाचे डॉ. सचिन पन्हाळकर यांच्याशी चर्चा करून कुलगुरूंनी एक विशेष मॅप अॅप्लीकेशन तयार करून घेतले, ज्याद्वारे त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर असणारी संलग्नित महाविद्यालये आणि त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग ही सारी माहिती दिसत असे. त्यामुळे कुलगुरूंना अधिक सुनियोजितरित्या महाविद्यालयांना भेटी देता आल्या. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयात जाणे, महाविद्यालयाच्या कँटीनमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांसमवेत गप्पा मारत चहापान करणे, एखाद्या वर्गात अचानकपणे जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यानंतर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून अन्य स्टाफशी संवाद साधणे आणि सर्वात शेवटी प्राचार्यांची भेट घेणे अशी सर्वसाधारण कुलगुरूंची सरप्राईज व्हिजिट असे. कोणताही औपचारिक सत्कार वगैरे न स्वीकारता थेट विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधणारे कुलगुरू म्हणून डॉ. देवानंद शिंदे यांची ओळख विद्यापीठ परिक्षेत्रात राहील. त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील ३२, सांगली जिल्ह्यातील ३८ आणि सातारा जिल्ह्यातील ४६ अशा एकूण ११६ संलग्नित महाविद्यालयांना भेटी दिल्या. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने विद्यापीठ परिक्षेत्राबाहेरील अनेक महाविद्यालयांनाही कुलगुरूंनी भेटी दिलेल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या कारकीर्दीत...

मध्यंतरीच्या काळात मुंबई विद्यापीठाचा प्रभारी कार्यभारही कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे होता. मुंबईतल्या चर्चगेटपासून ते सिंधुदुर्गातल्या बांद्यापर्यंत ७६२ संलग्नित महाविद्यालये असा मुंबई विद्यापीठाचा विस्तार. कुलगुरूंनी ठरविले तरी, या संलग्नित महाविद्यालयांना भेटी देणे शक्य होत नाही. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी मात्र उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकन सुविधेची पाहणी करण्याकरिता आणि निकाल गतीने लावण्यासाठी प्राध्यापकांना प्रेरित करण्याकरिता कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांचा झंझावाती दौरा करून ११ महाविद्यालयांना भेटी दिल्या. महाड, दापोली, चिपळूण, खेड, तळेरे, वैभववाडी, फणसगाव इत्यादी ठिकाणच्या महाविद्यालयांना त्यांनी सरप्राईज भेटी दिल्या. यातील काही महाविद्यालयांना भेट देणारे मुंबई विद्यापीठाचे ते पहिलेच कुलगुरू ठरले. याखेरीज मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील पन्नासेक महाविद्यालयांना त्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या, त्या वेगळ्याच!

 

महापूर काळात...

गतवर्षी महापूर ओसरल्यानंतर कुलगुरूंनी पूरबाधित महाविद्यालयांच्या पाहणीसाठी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा केलेला दौरा हा अत्यंत हृद्य ठरला. महाविद्यालयांची, विशेषतः तेथील ग्रंथालयांतील पुस्तके, प्रयोगशाळा आणि फर्निचर पुराने झालेली दुरवस्था पाहून त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्यामधील भावनाप्रधान माणसाचे दर्शन यावेळी सर्वांनाच झाले. प्राचार्यांसह सर्व संबंधित घटकांच्या खांद्यावर हात ठेवून ते दिलासा देत. संबंधित जिल्हा प्रशासनांकडे त्यांनी शासन स्तरावरुन बाधित महाविद्यालयांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली. त्यापुढे जाऊन विद्यापीठ स्तरावरुन पूरबाधित महाविद्यालयांना दुरुस्ती, पुस्तक खरेदी इत्यादी बाबींसाठी आर्थिक मदत जाहीर केली. सर्व जिल्ह्यांतील एनसीसी व एनएसएस युनिटच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविल्या. स्वतःसुद्धा स्वच्छतेच्या कामी सक्रिय सहभाग घेतला.

या सर्व माध्यमांतून विद्यार्थ्यांत, माणसांत मिसळून जाणारा, एकरुप होणारा माणूस अशी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची ओळख निश्चितपणे राहील.

 

पदामुळे निर्माण होणारी दरी सांधण्यासाठीच भेटी

संलग्नित महाविद्यालयांना सरप्राईज (अचानक) भेटी देऊन तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनींशी थेट संवाद साधण्यामागील भूमिका स्पष्ट करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, पदाच्या दबावामुळे कुलगुरू आणि संलग्नित महाविद्यालये अगर सर्व संबंधित घटक यांच्यामध्ये एक प्रकारची अप्रत्यक्ष दरी निर्माण होते. ती दरी संवादाच्या माध्यमातून सांधली जावी, जास्तीत जास्त घटकांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात, अशी या सरप्राईज व्हिजिटमागे माझी भूमिका असे. विद्यापीठामार्फत संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध संशोधन प्रोत्साहन योजना असोत अगर विद्यार्थिनींसाठी बस पास योजना आणि स्वच्छतागृह योजना असोत; या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चेतूनच साकार झालेल्या बाबी आहेत. माझ्या भेटींमधून प्राप्त झालेले हे फलित आहे, अशी माझी भावना आहे.


Wednesday, 10 June 2020

ग.गो. जाधव अध्यासनाच्या पुस्तकांच्या प्रकाशनामुळे आश्वासनपूर्तीचा आनंद

- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे


शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने डॉ. शिवाजी जाधव आणि डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी (डावीकडून) अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. रत्नाकर पंडित, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.



शिवाजी विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षातर्फे निर्माण करण्यात आलेल्या 'शिव-वार्ता: माध्यमांच्या नजरेतून विद्यापीठ (सन २०१९-२०२०)' या पुस्तिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह (डावीकडून) डॉ. शिवाजी जाधव, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. रत्नाकर पंडित, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

कोल्हापूर, दि. १० जून: शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करीत असताना महत्त्वपूर्ण आश्वासनपूर्ती केल्याचा आनंद होतो आहे, असे उद्गार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.

विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने डॉ. शिवाजी जाधव लिखित पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव यांची पत्रकारिता आणि डॉ. आलोक जत्राटकर संपादित ‘‘पुढारीकार पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला संग्रह (सन १९८८-२०१९) या दोन पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकांचे आणि विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाच्या वतीने निर्मित शिव-वार्ता: माध्यमांच्या नजरेतून विद्यापीठ (सन २०१९-२०२०) या वार्तासंकलन पुस्तिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुलगुरू कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. शिवाजी जाधव यांनी पद्मश्री. डॉ. ग.गो. जाधव यांच्या पत्रकारितेविषयी पीएच.डी. संशोधन केले. या संशोधनावर आधारित ग्रंथातून डॉ. ग.गो. जाधव यांच्या पत्रकारितेचे अनेक पैलू समोर येतात.  त्यांनी त्या काळात हाताळलेले विविध मुद्दे, स्थानिक विकासाचे प्रश्न, शेती, शेतकरी, कष्टकरी, महिला तसेच उपेक्षित घटकांच्या संदर्भात केलेली पत्रकारिता आणि विविध चळवळींच्या संदर्भात त्यांची भूमिका, असे अनेक विषय या ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांसमोर येत आहे. पत्रकारितेशी निगडित सर्व घटकांबरोबरच अभ्यासक, संशोधक व प्राध्यापक यांच्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढारीकार पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला संग्रहाविषयी बोलताना कुलगुरू डॉ. शिंदे पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ. जाधव स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रमात, या मालेअंतर्गत झालेल्या व्याख्यानांचा संपादित ग्रंथ प्रकाशित करण्याची घोषणा केली होती. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासन यांनी त्या आश्वासनपूर्तीसाठी परिश्रम घेऊन हा व्याख्यानमाला संग्रह निर्माण केला आणि आश्वासनपूर्तीचा आनंद मला मिळवून दिला, याचा अभिमान वाटतो. त्यासाठी डॉ. जत्राटकर यांच्यासह अध्यासनाचे माजी चेअर प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित आणि समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

'शिव-वार्ता'चेही प्रकाशन

कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते यावेळी जनसंपर्क कक्षाचा उपक्रम असलेल्या शिव-वार्ता: माध्यमांच्या नजरेतून विद्यापीठ (सन २०१९-२०२०) या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षातर्फे विविध प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या विद्यापीठविषयक वार्ता संकलित स्वरुपात शिव-वार्तामध्ये दरवर्षी प्रकाशित करण्यात येतात. या वर्षी सुद्धा त्याचे प्रकाशन होते आहे, ही आनंदाची बाब आहे. सर्व माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक बातमीला यात जागेअभावी स्थान देता येत नसले तरी त्या त्या कालखंडात विद्यापीठात झालेल्या घडामोडी आणि त्यांचे माध्यमांतील प्रतिबिंब यांची माहिती होण्याच्या दृष्टीने शिव-वार्ता हा उपक्रम महत्त्वाचा आहे. त्याचे प्रकाशन करतानाही मोठे समाधान वाटते आहे.

या प्रसंगी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, माजी चेअर प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.