Tuesday, 29 July 2025

वारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के

डॉ. दिगंबर शिर्के


कोल्हापूर, दि. २९ जुलै: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश आज विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाला.

प्राप्त आदेशान्वये, डॉ. दिगंबर शिर्के यांची कुलगुरू पदावरील नियुक्ती, ते विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरू पदाचा पदभार ज्या दिनांकाला स्वीकारतील, त्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ११ मधील तरतुदींन्वये नियुक्त केलेले कुलगुरू आपले पदग्रहण करेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत करण्यात आली आहे.

डॉ. शिर्के हे शिवाजी विद्यापीठातील त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पदाची कर्तव्ये सांभाळून वारणा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार धारण करतील आणि त्यानंतर ते वारणा विद्यापीठाचे पूर्णवेळ प्रथम कुलगुरू होतील, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यापूर्वी सातारा येथे नव्याने स्थापित कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.

मातृसंस्थेसाठी काम करण्याची संधी: कुलगुरू डॉ. शिर्के

वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. याचे कारण म्हणजे माझे पदवी स्तरावरील प्रथम वर्षाचे शिक्षण हे याच संस्थेमध्ये झाले आहे. तेथून पुढे मी कोल्हापूर येथे शिक्षणासाठी दाखल झालो आणि पुढील समग्र कारकीर्द शिवाजी विद्यापीठात साकार झाली. आता शिवाजी विद्यापीठासारख्या मातृसंस्थेतील सेवा समाधानपूर्वक पूर्ण करीत असतानाच ही नवी संधी प्राप्त झाल्याने या मातृसंस्थेसाठीही काम करता येणार आहे, याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Monday, 28 July 2025

संख्याशास्त्र अधिविभागात डेटा विश्लेषणाबाबत व्यवस्थापन विकास कार्यक्रम

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात आयोजित व्यवस्थापन विकास कार्यक्रमात बोलताना डॉ. राजन पडवळ. मंचावर (डावीकडून) अनिल नागराळे, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सचिन पाटील आणि डॉ. सोमनाथ पवार.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात आयोजित व्यवस्थापन विकास कार्यक्रमात बोलताना डॉ. महादेव देशमुख. समोर उपस्थित बँक अधिकारी व कर्मचारी 

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात आयोजित व्यवस्थापन विकास कार्यक्रमास उपस्थित मार्गदर्शक, अधिकारी व कर्मचारी






 

कोल्हापूर, दि. २८ जुलै: शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकारी प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्या सहकार्याने पी.एम.-उषा प्रायोजित "डेटा विश्लेषण व बँकिंग नियामक अनुपालनासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर" या विषयावर एक दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रम शनिवारी (दि. २६) रामानुजन सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते.

सहकारी बँकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक्सेल वापरून प्रभावी पद्धतीने डेटा व्यवस्थापन, विश्लेषण, असेट लायबलिटी मॅनेजमेंट व नियामक अनुपालन यासंदर्भातील व्यावहारिक प्रशिक्षण प्रदान करणे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. कार्यक्रमात एक्सेलमधील मूलभूत टूल्स व फंक्शन्स, बँकिंग नियामक निकषांनुसार अहवाल तयार करणे तसेच प्रत्यक्ष बँकिंग डेटावर आधारित प्रात्यक्षिक सत्र यांचा समावेश करण्यात आला.

पहिल्या सत्रात डॉ. सोमनाथ पवार यांनी एक्सेलच्या वापराची मूलभूत माहिती, महत्त्वाची साधने व बँकिंगसाठी उपयुक्त फंक्शन्स यांचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात रमेश लोणार (वित्त व्यवस्थापक, आरबीएल बँक) यांनी असेट लायबलिटी मॅनेजमेंट व नियामक अनुपालन या विषयांवर सखोल विवेचन केले. दुपारच्या सत्रात एस. व्ही. राजगुरू यांनी प्रत्यक्ष डेटावर आधारित विश्लेषणाचे प्रशिक्षण दिले. अंतिम सत्रात श्री. लोणार यांनी एक्सेल वापरून नियामक अनुपालनासाठी आवश्यक असणाऱ्या अहवालांचा प्रत्यक्ष सराव करून घेतला.

कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांमधील ६० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागींसाठी विशेष अभ्यास साहित्य व प्रात्यक्षिक फाईल्स पुरवण्यात आल्या.

डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत केले. अनिल नागराळे आणि डॉ. शशीभूषण महाडिक यांनी प्रस्तावना केली. डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. शशीभूषण महाडिक (विभागप्रमुख, संख्याशास्त्र अधिविभाग), डॉ. राजन पडवळ (समन्वयक, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकारी प्रशिक्षण केंद्र), अनिल नागराळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड), डॉ. सोमनाथ पवार (सहाय्यक प्राध्यापक, संख्याशास्त्र अधिविभाग व कार्यक्रम समन्वयक), एस. व्ही. राजगुरू आणि डॉ. सचिन पाटील, (सहाय्यक प्राध्यापक, संख्याशास्त्र अधिविभाग) यांनी योगदान दिले.

Saturday, 19 July 2025

शिवाजी विद्यापीठाचा डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेसमवेत महत्त्वपूर्ण करार

शैक्षणिक व आरोग्य संशोधन आणि सेवांविषयक आदानप्रदान होणार

शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, डॉ. शिंम्पा शर्मा यांच्यासह मान्यवर अधिकारी.



(सामंजस्य कराराची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. १९ जुलै: शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्था यांच्यादरम्यान आज शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रांतील संशोधन आणि सेवा यांचे आदानप्रदान करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील रिसर्च सेंटर व हॉस्पिटल यांच्या दरम्यान पाच वर्षांपूर्वी आरोग्य सेवांचे आदानप्रदानविषयक सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराची यशस्विता पाहून आता त्याची व्याप्ती वाढवित डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेसमवेत पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. आज या करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या.

यावेळी कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्था या दोहोंची शैक्षणिक व संशोधकीय प्रगती एकसारख्या गतीने सुरू आहे. पूर्वीच्या सामंजस्य कराराचा दोन्ही बाजूंना अतिशय चांगला लाभ झाला आहे. कराराची व्याप्ती वाढल्यामुळे येथून पुढील काळात वैद्यकीय सेवांच्या पलिकडे इतरही विविध विभागांमध्ये सहकार्यवृद्धी करता येणे शक्य होईल. विद्यार्थ्यांचे आदानप्रदानही सुलभ होईल. परस्पर सहकार्यातून आपण एकत्रित वृद्धिंगत होऊ, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या सामंजस्य कराराची व्याप्ती आता व्यक्तींकडून संस्थांकडे सरकली आहे. शिवाजी विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र, मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटपासून ते सामाजिक कार्यापर्यंत असे अनेक अभ्यासक्रम आहेत, जे वैद्यकीय क्षेत्राला पूरक आणि उपयुक्त आहेत. त्यामधील संशोधकांमध्ये विचारांची आणि संशोधनकार्याची देवाणघेवाण तसेच सहकार्य निर्माण व्हायला हवे. दोन्ही संस्थांतील विविध विषयतज्ज्ञांमध्ये संवाद प्रस्थापित झाला पाहिजे. त्या दृष्टीने दोन्ही संस्थांतील अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञ यांच्या संयुक्त कार्यशाळांचे आयोजन वेळोवेळी व्हायला हवे. त्याद्वारे विशेषतः सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या अनुषंगाने संयुक्त सहकार्य प्रकल्प साकार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे यांनी मागील पाच वर्षांतील सामंजस्य कराराच्या फलश्रुतीविषयी सविस्तर माहिती दिली. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्वाक्षरी केल्या. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संचालक डॉ. शिंम्पा शर्मा, संशोधन संचालक डॉ. सी.डी. लोखंडे, अधिष्ठाता डॉ. राजेश कल्लाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव डॉ. संजय जाधव, विश्वजीत खोत, विनोद पंडित आदी उपस्थित होते.

Friday, 18 July 2025

शिवाजी विद्यापीठाचे रशियन भाषेचे विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी रशियात दाखल

 

शिवाजी विद्यापीठाच्या रशियन भाषेचे चार विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी मॉस्को येथील रशियन पीपल्स फ्रेन्डशीप युनिव्हर्सिटी (RUDN) येथे दाखल झाले आहेत. छायाचित्रात राधा जाधव, प्रेरणा नलावडे, सारा नायकवडी आणि मयूर दादवणे दिसत आहेत.


कोल्हापूर, ता. १८: शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेच्या चार विद्यार्थ्यांना थेट रशियालाच शैक्षणिक भेट देण्याची संधी लाभली आहे. मॉस्को येथील नामवंत रशियन पीपल्स फ्रेन्डशिप युनिव्हर्सिटी (RUDN) येथे आयोजित समर स्कूलसाठी विभागातील राधा जाधव, प्रेरणा नलावडे, सारा नायकवडी आणि मयूर दादरणे हे चौघे रशियन भाषा आणि संस्कृतीच्या सखोल अभ्यासासाठी रशियात दाखल झाले आहेत.

विदेशी भाषा विभागाने गेल्या काही वर्षांत रशियन भाषा अध्यापनात विशेष प्रगती साधली आहे. परिणामी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रशियन पीपल्स फ्रेन्डशिप युनिव्हर्सिटी या संस्थांच्या शैक्षणिक सहकार्याने रशियातील समर स्कूलमध्ये सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. १४ जुलै ते २८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना रशियन भाषेच्या प्रशिक्षणासह तेथील आधुनिक जीवनशैली, साहित्य आणि समाजव्यवस्था यांचाही अनुभव घेता येणार आहे. अभ्यासक्रमाचा संपूर्ण खर्च आयोजक संस्थेने उचलला असून विद्यार्थ्यांना निवास आणि शैक्षणिक सुविधा मोफत मिळणार आहेत.

विद्यार्थ्यांनी या संधीबाबत समाधान व्यक्त केले. रशियन भाषेच्या माध्यमातून आम्हाला रशिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आहे. हा अनुभव रोमांचक आहे. आम्ही मॉस्कोतील सर्व प्रमुख ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना देखील भेटी देणार असल्याचे राधा जाधव या विद्यार्थिनीने सांगितले.

परदेशी भाषेतील अभिव्यक्तीचा आत्मविश्वास

या उपक्रमाविषयी विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी सांगितले की, हे यश आमच्यासह विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. अशा संधी विद्यार्थ्यांचे जागतिक व्यक्तिमत्त्व घडवतात आणि परदेशी भाषेतील अभिव्यक्तीचा आत्मविश्वासही देतात.

कितीही स्थित्यंतरे आली तरी चित्रपटाचे ‘स्टोरीटेलिंग’ कायमच: डॉ. जब्बार पटेल

 

शिवाजी विद्यापीठात बी.ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांसमवेत मुक्तसंवाद साधताना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल. सोबत (डावीकडून) डॉ. शिवाजी जाधव, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. सुनीलकुमार लवटे.


शिवाजी विद्यापीठात बी.ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांसमवेत मुक्तसंवाद साधताना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल.

(जब्बार पटेल यांचा विद्यार्थ्यांसमवेत मुक्तसंवाद कार्यक्रमाचा व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. १८ जुलै: चित्रपट ही अत्यंत सर्जनशील बाब आहे. या क्षेत्रात आज तंत्रज्ञानात्मक बदल गतीने होत आहेत. ही स्थित्यंतरे होत राहणार, आव्हाने बदलणार; मात्र गोष्ट सांगणे हा त्याचा मूळ गाभा मात्र कायम राहणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात बी.ए. (फिल्म मेकिंग) च्या विद्यार्थ्यांसह संगीत व नाट्यशास्त्र तसेच अन्य विभागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रसिक नागरिकांसमवेत आज डॉ. जब्बार पटेल यांच्या मुक्तसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. पटेल यांनी उपस्थितांना त्यांच्या अभ्यासू आणि अनुभवी वाणीने खिळवून ठेवले. त्यांचा हा मुक्तसंवाद सुमारे दोन तासांहून अधिक काळ रंगला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पटेल म्हणाले, आज चित्रपटसृष्टीसमोर तंत्रज्ञानासह मोबाईल, ओटीटी अशी अनेक आव्हाने उभी आहेत. हे होतच राहणार. मात्र, चित्रपटाच्या क्षेत्रात स्टोरीटेलिंगला सर्वाधिक महत्त्व आहे. या माध्यमाद्वारे चांगली गोष्ट सांगितली गेल्यास ती आवर्जून पाहणारे प्रेक्षकही लाभतात. हे स्टोरीटेलिंग एक तर साहित्यातून येते अगर अनुभवातून येते. त्यासाठी सकस वाचन आणि सातत्यपूर्ण काम करीत राहणे आवश्यक आहे. त्याखालोखाल दिग्दर्शकाचे महत्त्व असते. तो गोष्ट कशी मांडतो, हेही महत्त्वाचे ठरते. आजघडीला ग्रामीण कलाकारांच्या हाती साधने आल्यामुळे ते त्यांच्या गोष्टी सांगताहेत. त्यापासून बहुसंख्य शहरी वर्ग अनभिज्ञ आहे. त्यामुळे शहरी कलाकारांची या क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात येते आहे. सिनेमाच्या फ्रेममध्ये जीवन बदलून टाकण्याची ताकद आहे. ती फ्रेम पूर्णांशाने समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे.

मला औपचारिक शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे ते नव्या पिढीला मिळावे ही तळमळ माझ्या मनी असते. अशा शिकलेल्या मुलांकडून माझ्या अपेक्षाही मोठ्या आहेत. तथापि, शिक्षणामुळे अहंकार न येता नवे ज्ञान मिळविण्याची आस बाळगून त्यांनी या क्षेत्रात काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाने जगभरातील अभिजात चित्रपटांचे संकलन करून ते विद्यार्थ्यांना पाहण्यास उपलब्ध करावेत, त्याचप्रमाणे चित्रपटविषयक ग्रंथांचा संग्रहही निर्माण करावा, असे आवाहन पटेल यांनी केले.

‘‘कोल्हापूर स्कूलचे पुनरुज्जीवन व्हावे

भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत आणि विकासात कोल्हापूरच्या कलाकारांचे महान योगदान आहे. त्यांच्या शैलीने काम करणाऱ्या येथील कलाकारांना कोल्हापूर स्कूल म्हणून ओळखले जाते. इथली कार्यशैली, मापदंड, तंत्रज्ञान चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या कोल्हापूर स्कूलचे पुनरुज्जीवन व्हावे आणि येथील कलाकारांनी जागतिक स्तरावर ठसा उमटवावा. शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमामुळे कोल्हापूर स्कूलला निश्चितपणे ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, चित्रपटसृष्टीत चांगली कारकीर्द घडवू पाहणाऱ्या क्षमतावान विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट व्हावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डॉ. पटेल यांच्या सूचनेनुसार ग्रंथ आणि चित्रपट यांचे संकलनही करण्यात येईल, याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, प्रवीण पांढरे यांनी परिचय करून दिला तर साक्षी वाघमोडे यांनी आभार मानले.

 

Thursday, 17 July 2025

तर्कतीर्थ हे संवेदनशील बुद्धीवादी: डॉ. सदानंद मोरे

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेची यशस्वी सांगता

शिवाजी विद्यापीठात 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विचार व कार्य' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे. मंचावर डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रकाश पवार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. जब्बार पटेल आणि डॉ. सुनीलकुमार लवटे.


शिवाजी विद्यापीठात 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विचार व कार्य' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे. 

शिवाजी विद्यापीठात 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विचार व कार्य' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल. मंचावर डॉ. प्रकाश पवार, डॉ. सदानंद मोरे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व डॉ. सुनीलकुमार लवटे.

शिवाजी विद्यापीठात 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विचार व कार्य' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल. 

(आंतरराष्ट्रीय परिषद समारोप समारंभाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १७ जुलै: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ज्या संवेदनशील वैचारिक भूमिकेतून आयुष्यात विविध स्थित्यंतरे स्वीकारली, ती पाहता ते एक संवेदनशील बुद्धीवादी असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणसास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार व कार्यया विषयावरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते; तर, ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, वाईसारख्या कर्मठ ठिकाणी तर्कतीर्थांनी केलेले काम ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. वैदिक, मार्क्सवाद, गांधीवाद, काँग्रेस आणि आधुनिक नवविचार अशी वैचारिक स्थित्यंतरे तर्कतीर्थांनी वेळोवेळी अत्यंत जाणीवपूर्वक स्वीकारली. राजकीय सत्तेचा मोह टाळून विश्वकोश निर्मितीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी या कार्याला वाहून घेतले, ही बाबही आजच्या काळासाठी आदर्शवत स्वरुपाची आहे. अनेक प्रसंगी सत्यशोधक, ब्राह्मणेतरांच्या प्रागतिक विचारांशी ते एकरुप झाल्याचीही उदाहरणे आहेत. ज्या काळात जो प्रश्न सामोरा आलेला आहे, त्या काळात तो सोडविण्यासाठी शक्य ते सर्व करण्याची तर्कतीर्थांची भूमिका यामागे दिसून येते. शिवाजी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तर्कतीर्थांविषयी ऐतिहासिक दस्तावेजाची निर्मिती झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

‘...तर्कतीर्थांचे तर्क मात्र तेच राहतील

ज्येष्ठ निर्माते-दग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी तर्कतीर्थ जोशी यांच्यावर माहितीपट काढला. तर्कतीर्थांची मुलाखत त्यामध्ये समाविष्ट आहे. या माहितीपटाच्या अनुषंगाने तर्कतीर्थांच्या विविध स्वभावपैलूंचे त्यांनी अतिशय नर्मविनोदी शैलीत निवेदन केले. ते म्हणाले, तर्कतीर्थ हे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ होते, हे माहिती होते; पण, त्याच बरोबरीने त्यांनी विनोदबुद्धीही जपली होती, हे या निमित्ताने अनुभवास आले. या मिश्कील स्वभावाबरोबरच शास्त्रीजींमध्ये एक उत्तम नटही दडलेला होता. तो या चित्रपटाच्या निमित्ताने मला दर्शकांसमोर आणता आला, याचे समाधान वाटते. या चित्रीकरणाचा संपूर्ण अनुभव अत्यंत अविस्मरणीय होता, असे त्यांनी सांगितले.

अशा स्वरुपाची परिषद दहा वर्षांनी पुन्हा भरवावी, अशी सूचना करताना पटेल म्हणाले, त्यावेळी तर्कतीर्थांवर बोलणारे वक्ते बदललेले असतील, त्यांची मांडणी बदललेली असेल, समोर बसलेले तरुण श्रोते बदललेले असतील. पिढ्या बदलतील, मात्र तर्कतीर्थांचे तर्क तेच राहतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, तर्कतीर्थांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी ही परिषद म्हणजे एक ज्ञानरुपी तीर्थयात्रा ठरली आहे. या परिषदेने त्यांच्या जीवनकार्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन प्रदान केला आहे. तर्कतीर्थांचा एकेक पैलू समजून घेण्यास आजच्या पिढीने प्राधान्य दिले पाहिजे, याची जाणीव या निमित्ताने करून दिलेली आहे. जब्बार पटेल यांनी ज्या व्यक्तीकेंद्री चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्यांचा महोत्सव शिवाजी विद्यापीठात लवकरात लवकर भरविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थांविषयी साकार केलेल्या महाप्रकल्पाचीही त्यांनी यावेळी प्रशंसा केली.

कार्यक्रमात डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यासह किशोर बेडकीहाळ, डॉ. राजा दीक्षित, डॉ. संजय ठिगळे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. नामदेव माळी, डॉ. अविनाश सप्रे, डॉ. जी.पी. माळी, डॉ. विश्वास सुतार, डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह अभ्यासक, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, परिषदेत दिवसभरात विविध सत्रांमध्ये साधनाचे संपादक विनोद शिरसाट, गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वास पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ अभ्यासक श्रीनिवास हेमाडे, ज्येष्ठ विचारवंत सरोजा भाटे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी, प्रख्यात विचारवंत अशोक राणा आणि नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर या विद्वतजनांनी तर्कतीर्थांच्या विविध पैलूंचा वेध घेत परिषदेच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब केले.

Wednesday, 16 July 2025

तर्कतीर्थांच्या विचारांची उत्तरमीमांसा आवश्यक: डॉ. सुनीलकुमार लवटे

शिवाजी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेत विशेष मुलाखत

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारकार्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची विशेष मुलाखत घेताना डॉ. नागोराव कुंभार आणि डॉ. नंदकुमार मोरे.

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारकार्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची विशेष मुलाखत घेताना डॉ. नागोराव कुंभार आणि डॉ. नंदकुमार मोरे.


(डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या मुलाखतीची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १६ जुलै: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची समकाळामध्ये उत्तरमीमांसा होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या तर्कतीर्थांच्या विचारकार्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. लवटे यांची मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि विचारशलाकाचे संपादक डॉ. नागोराव कुंभार यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. लवटे म्हणाले, तर्कतीर्थांची त्यांच्या काळामध्ये मीमांसा, समीक्षा झाली, पण म्हणावी तितकी ती झाली नाही. याला त्यांच्याबद्दल असणारा आदरयुक्त दबदबा आणि त्यांचा चोख चिकित्सक प्रतिवाद या दोन बाबी कारण होत्या. मात्र, आजघडीला त्यांच्या विचारकार्याची नव्याने मीमांसक मांडणी होण्याची गरज आहे. नव्या काळात तर्कतीर्थांची विवेकनिष्ठ कठोर चिकित्सा व्हावी. त्यासाठी त्यांच्या चरित्र साधनांचा चिकित्सक अभ्यास व संशोधन करण्यासाठी नवअभ्यासकांनी पुढे यायला हवे.

स्वाध्याय शिक्षणाचे तर्कतीर्थ हे ज्वलंत उदाहरण असून भारतामध्ये स्वाध्यायी शिक्षणव्यवस्था नव्याने विकसित व्हावी, असे सांगताना डॉ. लवटे म्हणाले, लौकिकार्थाने तर्कतीर्थ केवळ दोन इयत्ता शिकले. उर्वरित सर्व शिक्षण त्यांनी स्वयंशिक्षण पद्धतीने आत्मसात केले. अधिक उज्ज्वल, अधिक उन्नत असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ही ज्ञानसाधना तर्कतीर्थांकडून शिकावी. स्वाध्याय शिक्षणातून व्यक्तीमत्त्वाचा किती उन्नत विकास साधता येतो, याचे तर्कतीर्थ मोठे उदाहरण आहेत. त्यांनी कोणतीही ज्ञानशाखा अस्पर्शित ठेवली नाही. हे करीत असताना परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम मेळ त्यांनी घातला. प्राचीन विचारविश्वाला आधुनिकतेची जोड देऊन त्यांना वैश्विक बनविले. सर्व ज्ञानशाखांमध्ये सुसंगती साधत सर्वांचा उद्देश मानवतावाद आहे, हे तर्कतीर्थांनी आपल्या विचारकार्यातून स्पष्ट केले. तर्कतीर्थांचे मराठी भाषेसाठीचे योगदान जाणून घ्यावयाचे असल्यास त्यांचा केवळ स्थापत्य-शिल्पकोष जाणकांरांनी अभ्यासला तरी पुरेसे होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

निःशस्त्र परिवर्तनानेच माणसाचे हृदयपरिवर्तन शक्य आहे. या हृदयपरिवर्तनातूनच भारत एक होईल. यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन डॉ. लवटे यांनी यावेळी केले.

दरम्यान, दुपारच्या सत्रात मराठी विश्वकोषातील नोंदींचा अन्वय या विषयावरील परिसंवादात विश्वकोष निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप करंबेळकर आणि प्रा. राजा दीक्षित यांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. त्यानंतरच्या सत्रात तर्कतीर्थांचा साहित्य व संस्कृतीविषयक दृष्टीकोन या विषयावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, भाषा, संस्कृती आणि साहित्य या विषयावर ज्येष्ठ संशोधक सर्फराज अहमद आणि तर्कतीर्थांचा सांस्कृतिक दृष्टीकोन या विषयावर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी आपले विचार मांडले.


तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे विसाव्या शतकातील महत्त्वाचे प्रबोधनपुरूष: किशोर बेडकीहाळ

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करताना किशोर बेडकीहाळ. सोबत (डावीकडून) डॉ. अशोक जोशी आणि डॉ. अशोक खंडकर.

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना तर्कतीर्थांचे पुतणे तथा अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी.

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना तर्कतीर्थांचे नातू तथा अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक खंडकर.

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत विशेष पुस्तिकांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. अशोक जोशी, डॉ. अशोक खंडकर, किशोर बेडकीहाळ व डॉ. पंडित टापरे.

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा विशेष गौरव करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार, डॉ. अशोक जोशी, डॉ. अशोक खंडकर, किशोर बेडकीहाळ व डॉ. पंडित टापरे.

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) सागर बगाडे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. अशोक खंडकर, डॉ. अशोक जोशी, किशोर बेडकीहाळ, डॉ. प्रकाश पवार आदी.
शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित विशेष प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. अशोक जोशी, डॉ. अशोक खंडकर, सागर बगाडे आदी.


                                         
                                (तर्कतीर्थांविषयी आंतरराष्ट्रीय परिषद उद्घाटन समारंभ- लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. १६ जुलै: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अखिल मानवमात्राच्या कल्याणासाठी ज्ञाननिर्मिती करणारे आणि त्याचा वापरही करणारे विसाव्या शतकातील महत्त्वाचे प्रबोधनपुरूष होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणसास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार व कार्य या विषयावरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. तर, तर्कतीर्थांचे पुतणे व अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी आणि नातू डॉ. अशोक खंडकर हे प्रमुख उपस्थित होते.

श्री. बेडकीहाळ म्हणाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांशी जैविक अर्थाने जोडलेले व्यक्तीमत्त्व होते. एकोणिसाव्या शतकातील फुले, रानडे, आगरकर, शिंदे, टिळक यांचा प्रबोधनाचा वारसा विसाव्या शतकामध्ये प्रवाहित करून नवमहाराष्ट्राचा विचार देशाला प्रदान करणाऱ्या पिढीचे शास्त्रीजी सच्चे वारसदार ठरले. आधुनिक प्रबोधनपर्वात कूस बदलणाऱ्या महाराष्ट्राचे साक्षीदार आणि त्या बदलांचे भागीदार बनणाऱ्या शास्त्रीजींनी हा कालखंड अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने मौलिक योगदान दिले. मराठी समाजाला जागतिक समुदायाशी जोडत असताना या समाजामध्ये वैश्विक जाणीवांची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. स्वतःच्या बौद्धिक स्वातंत्र्याबद्दल अत्यंत जागरूक असणाऱ्या शास्त्रीजींनी सर्व प्रकारचे ज्ञानग्रहण करून नव्या काळाला अनुकूल असे त्या ज्ञानाचे उपयोजन करण्यास प्राधान्य दिले. त्यांच्या या कार्याचे आकलन आणि अनुसरण करण्याची आजघडीला मोठी गरज निर्माण झाली आहे.

तर्कतीर्थ जोशी यांचे पुतणे डॉ. अशोक जोशी म्हणाले, तर्कतीर्थ यांच्याकडे मी नेहमीच एक विचारमहर्षी म्हणून पाहिले. त्यांनी नेहमी आम्हा कुटुंबियांना बुद्धाचा सुखाचा मंत्र सांगितला. आपल्या डोक्यात नेहमी अमर विचार आले पाहिजेत, असे ते सांगत. अखिल मानवजातीच्या कल्याणाचा आणि कोणाविषयीही कोणताही भेदभावविरहित विचार हा अमर विचार असतो. या त्यांच्या सांगण्याचे आम्ही पालन करीत आहोत. त्यांनी आम्हाला आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच आंतरराष्ट्रीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. आम्ही आणि आमच्या मुलामुलींनीही सर्व प्रकारच्या भेदांना तिलांजली देत त्याचे अनुसरण केले आहे.

तर्कतीर्थांचे नातू डॉ. अशोक खंडकर म्हणाले, आजोबांचा मी सर्वात थोरला आणि त्यांच्याशी मैत्री असणारा मी नातू आहे. आमच्या वाईतील घरी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती तत्कालीन अस्पृश्य समाजातील असत आणि त्यांना समतेची आणि ममतेची वागणूक मिळे. सर्व प्रकारच्या धर्मशास्त्रांचा अभ्यास करून शास्त्रीजींनी आपले ज्ञान सर्व प्रकारच्या सनातन रुढींना विरोध करण्यासाठी वापरले. सर्व प्रकारचे भेद संपुष्टात येऊन समता प्रस्थापनेसाठी ते आग्रही राहिले. व्यक्तीगत जीवनात त्यांनी ते अंगिकारले. भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक विकासात योगदान देत असताना येथील सामाजिक-आर्थिक विषमतेची दरी कमी व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर्कतीर्थांच्या ज्ञानाचा, ज्ञानसाधनेचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी आजच्या अभ्यासक, संशोधकांनी उचलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरू डॉ. शिर्के आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, तर्कतीर्थांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अगदी एखादा पैलू जरी आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केला, तरी त्यांचे आयुष्यभराचे कल्याण होऊन जाईल. इंग्रजी भाषेचे ज्ञान संपादन करण्यासाठी बडोद्याला वेषांतर करून पलायन करणारा, अवघ्या तीन महिन्यांत ते आत्मसात करून परतणारा आणि पुढे हयातभर त्या भाषेतील ज्ञान एतद्देशीयांना देण्यासाठी झटापट करणारा महान अभ्यासक म्हणजे तर्कतीर्थ होत. हा एक पैलू झाला. याखेरीज संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी निर्माण केलेले ज्ञानसंचित अफाट आहे. त्यातील काही कण तरी विद्यार्थ्यांनी अंगावर पाडून घ्यावेत. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थांच्या विचारकार्याचे एकहाती संपादित केलेले १८ खंड ही भारतीय साहित्य-संस्कृती क्षेत्राला फार मोठी देणगी आहे. त्यांचे कार्य हे मानपत्रात न सामावणारे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा शाल, ग्रंथ आणि मानपत्र भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे मराठी विश्वकोष आणि साहित्य आणि संस्कृती या दोन पुस्तिकांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत केले. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रास्ताविक केले. अक्षय जहागीरदार यांनी मानपत्राचे वाचन केले. सुखदेव एकल व प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले.

यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणसास्त्री जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित टापरे यांच्यासह अनिल मेहता, डॉ. श्रीराम पवार, डॉ. दिलीप करंबेळकर, राजा दीक्षित, कौतिकराव ठाले-पाटील, अनुराधा पाटील, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. जी.पी. माळी, विश्वास सुतार, प्रवीण बांदेकर यांच्यासह अनेक मान्यवर अभ्यासक, संशोधक, शिक्षक, अधिविभागांचे प्रमुख आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शन मांडणीचा वस्तुपाठ

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या बहुआयामी कार्याचे दर्शन घडविणाऱ्या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. एखाद्या प्रदर्शनाची नेमकी आणि आकर्षक मांडणी कशी असावी, याचा हे प्रदर्शन म्हणजे वस्तुपाठ असल्याचे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी काढले. तर्कतीर्थांनी लिहीलेले ग्रंथ, संपादित केलेले ग्रंथ, विश्वकोषाचे सर्व खंड, त्यांच्याविषयीचे लेखन, चरित्रग्रंथ यांबरोबरच डॉ. लवटे यांनी संपादित केलेले १८ खंड त्याचप्रमाणे तर्कतीर्थांचे जीवनदर्शन घडविणारी विविध छायाचित्रे, लेख आदींची या प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे. विद्यापीठातील अधिविभागांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांनी आवर्जून हे प्रदर्शन पाहायला हवे, असे आवाहनही कुलगुरूंनी या प्रसंगी केले. यावेळी त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तर्कतीर्थांचे पुतणे डॉ. अशोक जोशी, नातू डॉ. अशोक खंडकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.