Wednesday, 16 July 2025

तर्कतीर्थांच्या विचारांची उत्तरमीमांसा आवश्यक: डॉ. सुनीलकुमार लवटे

शिवाजी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेत विशेष मुलाखत

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारकार्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची विशेष मुलाखत घेताना डॉ. नागोराव कुंभार आणि डॉ. नंदकुमार मोरे.

शिवाजी विद्यापीठात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारकार्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची विशेष मुलाखत घेताना डॉ. नागोराव कुंभार आणि डॉ. नंदकुमार मोरे.


(डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या मुलाखतीची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १६ जुलै: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची समकाळामध्ये उत्तरमीमांसा होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या तर्कतीर्थांच्या विचारकार्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. लवटे यांची मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि विचारशलाकाचे संपादक डॉ. नागोराव कुंभार यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. लवटे म्हणाले, तर्कतीर्थांची त्यांच्या काळामध्ये मीमांसा, समीक्षा झाली, पण म्हणावी तितकी ती झाली नाही. याला त्यांच्याबद्दल असणारा आदरयुक्त दबदबा आणि त्यांचा चोख चिकित्सक प्रतिवाद या दोन बाबी कारण होत्या. मात्र, आजघडीला त्यांच्या विचारकार्याची नव्याने मीमांसक मांडणी होण्याची गरज आहे. नव्या काळात तर्कतीर्थांची विवेकनिष्ठ कठोर चिकित्सा व्हावी. त्यासाठी त्यांच्या चरित्र साधनांचा चिकित्सक अभ्यास व संशोधन करण्यासाठी नवअभ्यासकांनी पुढे यायला हवे.

स्वाध्याय शिक्षणाचे तर्कतीर्थ हे ज्वलंत उदाहरण असून भारतामध्ये स्वाध्यायी शिक्षणव्यवस्था नव्याने विकसित व्हावी, असे सांगताना डॉ. लवटे म्हणाले, लौकिकार्थाने तर्कतीर्थ केवळ दोन इयत्ता शिकले. उर्वरित सर्व शिक्षण त्यांनी स्वयंशिक्षण पद्धतीने आत्मसात केले. अधिक उज्ज्वल, अधिक उन्नत असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ही ज्ञानसाधना तर्कतीर्थांकडून शिकावी. स्वाध्याय शिक्षणातून व्यक्तीमत्त्वाचा किती उन्नत विकास साधता येतो, याचे तर्कतीर्थ मोठे उदाहरण आहेत. त्यांनी कोणतीही ज्ञानशाखा अस्पर्शित ठेवली नाही. हे करीत असताना परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम मेळ त्यांनी घातला. प्राचीन विचारविश्वाला आधुनिकतेची जोड देऊन त्यांना वैश्विक बनविले. सर्व ज्ञानशाखांमध्ये सुसंगती साधत सर्वांचा उद्देश मानवतावाद आहे, हे तर्कतीर्थांनी आपल्या विचारकार्यातून स्पष्ट केले. तर्कतीर्थांचे मराठी भाषेसाठीचे योगदान जाणून घ्यावयाचे असल्यास त्यांचा केवळ स्थापत्य-शिल्पकोष जाणकांरांनी अभ्यासला तरी पुरेसे होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

निःशस्त्र परिवर्तनानेच माणसाचे हृदयपरिवर्तन शक्य आहे. या हृदयपरिवर्तनातूनच भारत एक होईल. यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन डॉ. लवटे यांनी यावेळी केले.

दरम्यान, दुपारच्या सत्रात मराठी विश्वकोषातील नोंदींचा अन्वय या विषयावरील परिसंवादात विश्वकोष निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप करंबेळकर आणि प्रा. राजा दीक्षित यांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. त्यानंतरच्या सत्रात तर्कतीर्थांचा साहित्य व संस्कृतीविषयक दृष्टीकोन या विषयावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, भाषा, संस्कृती आणि साहित्य या विषयावर ज्येष्ठ संशोधक सर्फराज अहमद आणि तर्कतीर्थांचा सांस्कृतिक दृष्टीकोन या विषयावर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी आपले विचार मांडले.


No comments:

Post a Comment