Thursday, 10 July 2025

यशाचे रंग उधळत चला, देशाचे नाव उज्ज्वल करा

कलर पुरस्कार समारंभातत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे क्रीडापटूंना आवाहन

शिवाजी विद्यापीठाच्या कलर पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंसमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे. 

शिवाजी विद्यापीठाच्या कलर पुरस्कार वितरण समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि  वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील.



(कलर पुरस्कार प्रदान कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १० जुलै: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचे रंग उधळत चला, स्वतःबरोबरच विद्यापीठाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागातर्फे आयोजित कलर पुरस्कार प्रदान समारंभ २०२३-२४ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे क्रीडापटू दरवर्षी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदके जिंकून चमकदार कामगिरी बजावतात. अशा क्रीडापटूंचा विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक तसेच सन्मानाचे ब्लेझर देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो. आजच्या कार्यक्रमात अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांत विविध पदके प्राप्त करणारे ८३ क्रीडापटू, खेलो इंडिया स्पर्धेत पदक मिळविणारे २९ क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या ११ क्रीडापटूंनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त केले, ही विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब आहे. विद्यापीठाने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यांच्या स्पर्धा परीक्षा काळात असल्या तर कारकीर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून स्वतंत्र परीक्षा घेण्याचे धोरण विद्यापीठाने अवलंबले. आता तर बी.ए. स्पोर्ट्स हा स्वतंत्र पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू करून क्रीडा हाच अभ्यास ठेवून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधीची कवाडे खुली केली आहेत. भव्य कुस्ती संकुल उभारले असून क्रीडा वसतिगृह उभारणीचे काम गतीने सुरू आहे. विद्यार्थी क्रीडापटूंसाठी अभिनव योजना आखण्यासाठी विद्यापीठाचे क्रीडा मंडळही उत्साही आणि आग्रही आहे, ही जमेची बाजू आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्याचे विद्यापीठीय क्रीडा धोरण तयार करण्याची जबाबदारीही कुलपती महोदयांनी शिवाजी विद्यापीठाकडे सोपविली आहे, ही सुद्धा आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने नेहमीच आपल्या परिक्षेत्रात क्रीडाविषयक परिसंस्था विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचे फलित म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारे क्रीडापटू येथे तयार झाले आहेत. आपल्या खेळाडूंतील क्रीडानैपुण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वदूर ओळखले जावे, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रीय स्पर्धांतील यसावर समाधानी न राहता पुढे जागतिक स्तरावर जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा. प्रखर जिद्द आणि लढाऊ वृत्तीने आपले संपूर्ण क्रीडाकौशल्य पणाला लावून जागतिक दर्जाचे यश मिळविण्यासाठी स्पर्धेत उतरा, असे आवाहन केले.

यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू कल्याणी पाटील, श्रुती भोसले, पृथ्वीराज पाटील, साक्षी बनसोडे, दीपाली गुरसाळे, धनंजय जाधव, श्रीधर निगडे, गिरीष जकाते यांचा उपस्थितीत तर आदिती स्वामी, ऐश्वर्या पुरी यांचा त्यांच्या अनुपस्थितीत गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहन कांबळे यांचाही यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. डॉ. नीलेश पाटील, डॉ. आय.एच. मुल्ला, आर.टी. पाटील, डॉ. विक्रमसिंह नांगरे, डॉ. प्रताप जाधव, टी.आर. साबळे, बी.ए. समलेवाले, दीपक पाटील, डॉ. सुनील खराडे, शिवाजी दाभाडे, डॉ. एन.डी. पाटील या संघ प्रशिक्षक व व्यवस्थापकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांच्या वतीने डॉ. खराडे यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले.

यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. मंचावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, प्राचार्य डॉ. रमेश कुंभार, डॉ. राजेंद्र रायकर, विकास जाधव यांच्यासह क्रीडापटू, त्यांचे पालक आणि प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment