कोल्हापूर, दि. १० जुलै: शिवाजी
विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्ष कार्यालयाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
रसायनशास्त्र
अधिविभागाच्या जागेमधून या कक्षाचे कामकाज चालत असे. या कक्षाचे राष्ट्रीय सेवा
योजनेच्या कार्यालयासमोरील बी-४ बंगल्यामध्ये स्थलांतर करण्यात आले असून आज या
कार्यालयाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात
आले. या निमित्ताने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
करण्यात आले. यावेळी नूतन कार्यालयातील मांडणी पाहून कुलगुरूंसह सर्व अधिकाऱ्यांनी
समाधान व्यक्त केले.
मध्यवर्ती रोजगार कक्षाचे
समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी मान्यवरांचे स्वागत करून गेल्या वर्षभरात कक्षाने
केलेल्या कामकाजाचा अहवाल सादर केला. नव्या जागेमधून कक्षाने अधिक गतिमानतेने
कामकाज करावे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठात सन
२००६ पासून मध्यवर्ती रोजगार कक्ष कार्यान्वित आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह
संलग्नित महाविद्यालये तसेच परिक्षेत्रातील युवा वर्गाला रोजगार संधी मिळवून
देण्यासाठी कक्ष सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. गेल्या वर्षभरात विविध ७४
प्रशिक्षण कार्यक्रमांतून ३२०० विद्यार्थ्यांना कुशल व प्रशिक्षित केले. परिणामी या
कालावधीत ५१४ विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या. यामध्ये
प्रामुख्याने इन्फोसिस, एनपीसीआय, सीएमएस, टॅको, पीएचएन, ॲक्सिस बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स अशा नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. वर्षभरात १२८ कंपन्यांनी त्यांचे कॅम्पस ड्राईव्ह विद्यापीठात आयोजित केले. त्यामुळेच विद्यापीठातील
बहुतांशी विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त झाल्या.
कार्यक्रमास डॉ. प्रकाश
राऊत, डॉ. विजय ककडे, पर्यावरण शास्त्र अधिविभागाच्या
प्रमुख डॉ. आसावरी जाधव, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. गणेश पाटील, डॉ. चेतन आवटी, अमर डुम, शामल पवार आदी उपस्थित
होते.


No comments:
Post a Comment