Friday, 9 January 2026

‘शिवस्पंदन’मध्ये संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग सलग चौथ्यांदा विजेता

शिवाजी विद्यापीठाच्या 'शिवस्पंदन' सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेमध्ये सलग चौथ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करणाऱ्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या चमूला विजेतेपदाचा चषक प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. विनोद ठाकूरदेसाई आदी.



(शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार प्रदान व अंतिम दिवसाच्या सादरीकरणाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ९ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सलग चौथ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळवित संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. काल (दि. ८) रात्री प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते शिवस्पंदन महोत्सवाचे पारितोषिक वितरण मोठ्या जल्लोषी वातावरणात करण्यात आले.

गेले तीन दिवस शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा कळसाध्याय काल रात्री गाठला गेला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेसह सुगम गायन, स्थळचित्रण, एकल नृत्य, भारतीय समूहगीत, मूकनाट्य आणि लघुपट या प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवित सर्वसाधारण विजेतेपदावर सलग चौथ्यांदा आपले नाव कोरले.

महोत्सवात काल अखेरच्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल नृत्य आणि समूहनृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांतील सादरीकरणांना तसेच पारितोषिक वितरण समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत उत्साही प्रतिसाद लाभला. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठा जल्लोषी प्रतिसाद लाभला.

या स्पर्धांनंतर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, महोत्सव समन्वयक डॉ. प्रल्हाद माने, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. कविता वड्राळे, डॉ. प्रमोद कसबे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मीना पोतदार यांनी विजेत्यांची नावे घोषित केली. विद्यार्थी विकास मंडळाच्या डॉ. सुरेखा आडके, विजय इंगवले, विशाल म्हातुगडे, अभिषेक केंबळीकर, प्रियांका पांडव, अंकिता चव्हाण, माँटी मिसाळ यांनी यशस्वी संयोजन केले. यावेळी के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदार जागृतीविषयक पथनाट्यालाही विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी यावेळी मतदान करणेबाबत सामूहिक शपथही घेतली.

स्पर्धेचा सविस्तर अंतिम निकाल अनुक्रमे असा-

शोभायात्रा: संगीत व नाट्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, गणित, एम.बी.ए युनिट (वाणिज्य व व्यवस्थापन).

एकल लोकवाद्य वादन: जाधव प्रतिक सुनिल (संगणकशास्त्र), पठाण रेहान इकबाल (संगीत व नाट्यशास्त्र), ढोले गुरुनाथ गजानन (संगीत व नाटयशास्त्र), सुतार सोहन नारायण (वनस्पतीशास्त्र), गुरव सुप्रिया किशोर (समाजशास्त्र).

सुगम गायन: पाटील प्रथमेश सचिन (संगीत व नाटयशास्त्र), कोकळे सप्निल रमेश (संगीत व नाट्यशास्त्र), पांचाळ मृण्मयी सदाशिव (मराठी), माळी वैभव हनुमंत (रसायनशास्त्र), कुंभार विशाल चंद्रकांत (पर्यावरणशास्त्र).

नकला: पवेकर प्रेम विठ्ठल (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुलर डेव्हलपमेंट), सुतार सोहन नारायण (वनस्पतीशास्त्र), लोहार आसावरी पांडुरंग (संगीत व नाटयशास्त्र), मायने अंजली राजेंद्र (स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी), जांभळे ऋतुजा सचिन (स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी).

रांगोळी: पांचाळ मृण्मयी सदाशिव (मराठी), जठार कुलदिप विजयकुमार (संगीत व नाट्यशास्त्र), खडकीकर सोनल विनायक (संगीत व नाटयशास्त्र), नलवडे मोनिका संतोष (एम.बी.ए युनिट), घोडके अंकिता बाबुराव (गणित).

स्थळचित्र: ढवळे धोंडी नारायण (संगीत व नाट्यशास्त्र), चराटकर श्रध्दा देवदत्त (संगीत व नाटयशास्त्र), मुल्ला रमजान दस्तगिर (हिंदी), कुलकर्णी अजित धनंजय (एम.बी.ए युनिट), सुर्वे विराज सरदार (एम.बी.ए. युनिट).

एकल नृत्य: शुक्ला श्रद्धा शशिकुमार (संगीत व नाटयशास्त्र), कांबळे अनुराधा राजाराम (संगणकशास्त्र), शिंदे नेहा रघुनाथ (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुलर डेव्हलपमेंट), सावर्डेकर निधी नितिन (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), पाटील प्रणय (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट).

भारतीय समूहगीत: संगीत व नाटयशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणित, राज्यशास्त्र.

लघुनाटिका: गणित, पर्यावरणशास्त्र, एम.बी.ए. युनिट, अर्थशास्त्र, संगीत व नाटयशास्त्र.

मूकनाट्य: संगीत व नाट्यशास्त्र, भूगोल.

लघुपट: संगीत व नाटयशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, हिंदी.

समूहनृत्य: संगीत व नाटयशास्त्र, शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन, भूगोल

कथा लेखन स्पर्धा (मराठी): विमल दादासाहेब मोरे (मराठी), अनिकेत मच्छिंद्र कांबळे (इंग्रजी), उज्ज्वला चंद्रकांत कांबळे (वाणिज्य व व्यवस्थापन), निरंजन संजय घुगे (रसायनशास्त्र), सौरभ रामचंद्र कापसे (समाजशास्त्र).

कथा लेखन स्पर्धा (हिंदी): आदित्य रविंद्रनाथ सोनावणे (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), अविनाश दिलीप कांबळे (हिंदी), प्रतीक्षा शामराव पाटील (संगीत व नाट्यशास्त्र), गुलामगौस फिरोज तांबोळी (हिंदी), उज्ज्वला चंद्रकांत कांबळे (वाणिज्य व व्यवस्थापन).

कथा लेखन स्पर्धा (इंग्रजी): विश्वजीत राजेंद्र पाटील (संगणकशास्त्र), प्रतीक्षा शामराव पाटील (संगीत व नाटयशास्त्र), प्रेम विठ्ठल पवेकर (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट), आदित्य रविंद्रनाथ सोनावणे (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), श्रीधर शिवाजी निंबाळकर (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी).

कविता लेखन स्पर्धा (मराठी): अनिकेत मच्छिंद्र कांबळे (इंग्रजी), यश कृष्णात कवडे (राज्यशास्त्र), निरंजन संजय घुगे (रसायनशास्त्र), मोसिम राजअहमद पठाण (राज्यशास्त्र) प्रिया शुकराज हळदणकर (समाजशास्त्र).

कविता लेखन स्पर्धा (हिंदी): विनय चंद्रकांत जंगम (हिंदी), गुलामगौस फिरोज तांबोळी (हिंदी), अविनाश दिलीप कांबळे (हिंदी), श्रद्धा लोंढे (हिंदी). उज्ज्वला चंद्रकांत कांबळे (वाणिज्य व व्यवस्थापन).

कविता लेखन स्पर्धा (इंग्रजी): अनिकेत मच्छिंद्र कांबळे (इंग्रजी), नेहा रघुनाथ शिंदे (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट), प्रतीक्षा शामराव पाटील (संगीत व नाटयशास्त्र), श्रीधर शिवाजी निंबाळकर (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), साक्षी शिवाजी इंजर (राज्यशास्त्र).

नाटय लेखन स्पर्धा (मराठी): ऋतुजा आरती बडवे (संगीत व नाटयशास्त्र), श्रीधर शिवाजी निंबाळकर (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), साक्षी शिवाजी इंजर (राज्यशास्त्र), आदित्य रविंद्रनाथ सोनावणे (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), आनंद गोपाळराव निळे (संगीत व नाट्यशास्त्र).

नाटय लेखन स्पर्धा (हिंदी): अविनाश दिलीप कांबळे (हिंदी), स्वप्नाली महादेव धुलुगडे (हिंदी), श्रीधर शिवाजी निंबाळकर (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), आदित्य रविंद्रनाथ सोनावणे (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी), गुलामगौस फिरोज तांबोळी (हिंदी).

नाटय लेखन स्पर्धा (इंग्रजी): नेहा रघुनाथ शिंदे (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट), सत्यम मार्तंड देवकुळे (इंग्रजी), ओंकार राजकुमार भोसले (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट), प्रेम विठ्ठल पवेकर (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट), श्रीधर शिवाजी निंबाळकर (स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी).


Thursday, 8 January 2026

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रचनात्मक दृष्टी आणि कार्य प्रेरणादायी: डॉ. सुशील धसकटे

शिवाजी विद्यापीठात 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचे पैलू' या पुस्तकाचे प्रकाशन करताना माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, राहुल पवार, डॉ. प्रकाश पवार, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सुशील धसकटे आणि डॉ. नंदकुमार मोरे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. सुशील धसकटे

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




 

कोल्हापूर, दि. ८ जानेवारी: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सामाजिक परिवर्तनाची मांडणी केवळ संघर्षापुरती मर्यादित न ठेवता रचनात्मक दृष्टी आणि रचनात्मक कार्य उभारणीतून केली. शिक्षण, सामाजिक समता आणि बहिष्कृत समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पुण्याचे प्रसिद्ध लेखक-प्रकाशक डॉ. सुशील धसकटे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. प्रकाश पवार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचे पैलूया प्रा. गो.मा. पवार लिखित-संपादित पुस्तकाचे डॉ. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

महर्षी शिंदे यांच्या विचारकार्याचा वेध घेताना डॉ. धसकटे म्हणाले, शिंदे लोकांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहात. त्यांनी जातिव्यवस्थेतील अन्यायाला विवेकशील आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आव्हान दिले. संस्थात्मक बांधणी आणि समाजघडणीचा स्पष्ट आराखडा त्यांच्या कार्यात दिसून येतो. संस्थात्मक कार्याचे महत्त्व ओळखल्यामुळेच महर्षी रचनात्मक कार्याची उभारणी करू शकले. विविध प्रकारच्या नोंदी वेळोवेळी ठेवण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आजघडीला भारताच्या सामाजिक इतिहासाचा मोठा दस्तावेज निर्माण झाला आहे. त्यांचा हाच वारसा प्रा. गो.मा. पवार यांनीही पुढे जोपासला. त्याचे प्रतिबिंब प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकामध्येही पाहावयास मिळते.

यावेळी डॉ. प्रकाश पवार यांनी पुस्तकाविषयी भाष्य केले. आपल्या भाषणात महर्षी शिंदे यांच्याकडे पाहण्याचा गो.मा. पवार यांचा आधुनिकतावादी दृष्टीकोन मांडला. ते म्हणाले, शिंदे यांनी ‘बहिष्कृत भारत’ ही संकल्पना मांडून भारताचा दुर्लक्षित आणि वंचित चेहरा जगासमोर आणला. वंचित समाजाचा प्रश्न हा केवळ नैतिकतेचा नसून मानवी हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले होते. महर्षी शिंदे यांच्या विचारांना समकालीन संदर्भ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गो.मा. पवार यांनी केले, याकडे डॉ. प्रकाश पवार यांनी लक्ष वेधले. उत्तर-आधुनिक कालखंडात शिंदे यांच्याविषयी लिहीत असताना आधुनिकतावादी कालखंडाच्या परिप्रेक्ष्यातून त्यांची मांडणी करण्याचे कार्य पवार यांनी केले. भारतीय आधुनिकतेच्या ऱ्हासपर्वाच्या काळात  लिहीण्याचे धाडस गो.मा. पवार यांनी केले. त्यामुळे शिंदे यांचे कार्य आजच्या काळाशी जोडले गेले.

डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्या भाषणात महर्षी शिंदे यांचे कार्य समजून घेताना संघर्ष आणि रचनात्मक कार्य यांचा समतोल महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर डॉ. गो.मा. पवार यांच्यासमवेतच्या स्नेहबंधालाही उजाळा दिला. ते म्हणाले, समाजातील विषमता, अस्वस्थता आणि बहिष्कार समजून घेण्यासाठी शिंदे यांचे विचार अधिकच उपयुक्त ठरतात. गो.मा. पवार यांच्या लेखनामुळे शिंदे यांचा आधुनिक, चिकित्सक आणि परिवर्तनवादी पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, अस्पृश्यता निवारण, मुरळी प्रथा प्रतिबंध तसेच शेतकरी मेळावे इत्यादींच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी महर्षी शिंदे यांनी तळमळीने काम केले. जे जे काम त्यांनी हाती घेतले, ते अत्यंत मनापासून केले. शिंदे यांचे कार्य आणि त्या कार्याच्या स्मृती समाजापर्यंत पोहोचवत राहणे ही सजग नागरिकांची जबाबदारी आहे.

कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेता विद्यार्थी अक्षय जहागीरदार आणि गुणवंत विद्यार्थिनी अनुराधा गुरव यांचा डॉ. साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरवातीला ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ आणि हिंदी साहित्यिक ज्ञानरंजन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास राहुल पवार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. संदीप भुयेकर (वाराणसी), डॉ. भारतभूषण माळी, डॉ. दीपक भादले, डॉ. युवराज देवाळे, दत्ता जाधव यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 7 January 2026

गजेंद्र प्रतिष्ठानकडून विद्यापीठास

आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ देणगी

कै. आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ पारितोषिकासाठी एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द करताना डॉ. स्नेहल जोशी. सोबत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि डॉ. राजाराम गुरव. 


कोल्हापूर, दि. ७ जानेवारी: येथील गजेंद्र प्रतिष्ठानकडून प्रसिद्ध उद्योजक कै. अरविंद गजानन तथा आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी शिवाजी विद्यापीठास देण्यात आली.

देशपांडे यांच्या भगिनी तथा मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्नेहल श्रीकांत जोशी (पूर्वाश्रमीच्या रेखा देशपांडे) यांनी हा धनादेश प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

डॉ. जोशी या शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. आबा देशपांडे यांच्या पर्यावरण प्रेमास अनुसरून त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी विद्यापीठास दिली. या देणगीच्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून वनस्पतीशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रसिद्ध केलेल्या उत्कृष्ट संशोधन लेखास बेस्ट रिसर्च पेपर पारितोषिक देण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सदर पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्याने विभागाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमध्ये किमान एक रोप लावून त्याचे संवर्धन करणे बंधनकारक असेल, अशी महत्त्वाची अटही त्यांनी घातलेली आहे.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, अधिविभागाचे प्रमुख डॉ. निखिल गायकवाड यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, संशोधक उपस्थित होते.

वंचितांच्या जगण्याचा इतिहास सामोरा यावा: प्रा. ज्ञानेंद्र पांडेय

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ प्रा. ज्ञानेंद्र पांडेय. मंचावर (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अवनीश पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ प्रा. ज्ञानेंद्र पांडेय.


कोल्हापूर, दि. ७ जानेवारी: वंचित, उपेक्षितांच्या जगण्याचा आणि अनुभवाचा इतिहास लिहीणे अत्यंत कठीण असते, पण तोच खरा दुर्लक्षित इतिहास आहे. तो सामोरा आणण्याचे काम नव्या पिढीतील इतिहास अभ्यासक, संशोधकांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन अटलांटा (अमेरिका) येथील एमोरी विद्यापीठाचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ प्रा. ज्ञानेंद्र पांडेय यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात सोमवारी (दि. ५) इतिहास, इंग्रजी, मराठी, हिंदी आणि विदेशी भाषा अधिविभागांच्या संयुक्त विद्यमाने दुर्लक्षित इतिहास: लपलेल्या इतिहासाची पुनर्प्राप्ती या विषयावर आयोजित विशेष शैक्षणिक व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते, तर डॉ. माया पंडित प्रमुख उपस्थित होत्या.

इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर क्रांतीची प्रक्रिया सतत कार्यरत असल्याचे सांगून प्रा. ज्ञानेंद्र पांडेय म्हणाले, समाज, राजकारण, संस्कृती आणि विचारप्रवाह यांमध्ये होणारे बदल हे क्रांतीचेच स्वरूप असून आजच्या काळातील डिजिटल क्रांतीने इतिहास लेखन व संशोधनाच्या पद्धतींमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. इतिहासामध्ये केवळ काही निवडक नेत्यांचाच नव्हे, तर सर्वसामान्य जनता, उपेक्षित वर्ग, स्त्रिया यांच्यासह विविध सामाजिक घटकांचाही सक्रिय सहभाग असतो. इतिहास लेखनात या घटकांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिल्याने इतिहासाचा समग्र आशय समोर येत नाही. भविष्यातील इतिहास मात्र केवळ मोठ्या लढायांचा किंवा नेत्यांचा नसावा. तो इतिहास अशा सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित योगदानकर्त्याचा असावा आणि तो त्याच्या नजरेतून, अनुभवातून लिहीला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्त्रिया आणि कृष्णवर्णीय समाजाचा इतिहास मोठ्या प्रमाणावर 'अनार्काइव्हड' म्हणजेच अलिखित व दडपलेला राहिला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या समाजघटकांचे अनुभव, स्मृती व संघर्ष इतिहासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आजच्या इतिहासकारांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. यावेळी डॉ. गोपाळ गुरू, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. शरद नावरे, डॉ. शरद भुथाडिया यांच्यासह विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tuesday, 6 January 2026

पत्रकारांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा सजग वापर आवश्यक: डॉ. सदानंद मोरे

मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील दहा विद्यापीठांचे विशेष ऑनलाइन व्याख्यान

मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सहभागी झालेले डॉ. अंबादास भासके, डॉ. मीरा देसाई, प्रा. योगेश बोराटे, डॉ. विश्राम ढोले, डॉ. तेजस्विनी कांबळे आदी.


कोल्हापूर, दि.६ जानेवारी: मुद्रणकलेनंतर जर कोणती मोठी क्रांती झाली असेल, तर ती कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची आहे. पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग झाले असले, तरी मानवी मेंदूला टक्कर देण्याची क्षमता असलेली कृत्रिम बुद्धीमत्ता ही अत्यंत संवेदनशील बाब असून, याचा  वापर पत्रकारांनी अधिक सजगता आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांतर्फे आज  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ऑनलाईन व्याख्यानाचे हे सहावे वर्ष आहे. या संयुक्त कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपूर), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (सोलापूर), मुंबई विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (मुंबई) सहभागी झाले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले आणि प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. मोरे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेचा शोध अनेक वर्षांपूर्वी लागला असला, तरी सध्या तिचा वापर सर्वच क्षेत्रांत झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाला जसे सकारात्मक व नकारात्मक पैलू असतात, तसेच एआयचेही आहेत. त्यामुळे पत्रकारांनी एआय-साक्षर होत या तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले यांनी एआयमुळे बातम्यांमध्ये साचेबद्धता वाढण्याचा धोका असल्याचे नमूद केले. वृत्तपत्रांच्या मांडणीसाठी, मुद्रित शोधासाठी तसेच आकर्षक हेडींगसाठी एआयचा वापर होत असला, तरी चुकीची माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढल्याने फॅक्ट-चेकिंगला अधिक महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. योगेश बोराटे यांनी माध्यमांमध्ये एआयचा उपयोग केवळ मजकूरनिर्मितीपुरता न ठेवता बहुआयामी पद्धतीने शोधपत्रकारितेसाठीही प्रभावीपणे करता येऊ शकतो, असे  नमूद केले.
ऑनलाइन व्याख्यानात, डॉ. निशा मुडे-पवार (विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),  डॉ. राम भावसार (प्र-संचालक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), . डॉ.संजय तांबट (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे),  डॉ. माधवी रेड्डी (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे),  डॉ. दिनकर माने  (विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर),  डॉ. सुहास पाठक (संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड),  डॉ. प्रभाकर कोळेकर (प्र-विभागप्रमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर),  डॉ. प्रबास साहु (प्र-विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर),  डॉ. सुंदर राजदिप (विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई), . मीरा देसाई (विभागप्रमुख, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई) आणि प्रा. डॉ. सरफराज अन्सारी (विभागप्रमुख, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) यांनी मनोगत केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तांबट यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. डॉ. गोपी सोरडे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी डॉ. वृषाली बर्गे, डॉ. मनीषा मोहोड, रोहित देशमुख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात राज्यातील विविध विद्यापीठांतील  विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग  नोंदविला.

शिवाजी विद्यापीठात आकर्षक शोभायात्रेने ‘शिवस्पंदन’ सुरू

छत्रपती शिवरायांसह शाहू महाराज, फुले दांपत्य, राज कपूर अवतीर्ण; विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित शिवस्पंदन महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवाला आकर्षक शोभायात्रेने प्रारंभ झाला. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव  आणि संयोजन समिती सदस्य यांच्यासमवेत शोभायात्रेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे सादरीकरण


शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत शेतकऱ्यांप्रती आदर व सहानुभूतीची अपेक्षा बाळगत सहभागी झालेले विद्यार्थी

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत विविध कलाकारांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रा

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत विविध महामानव आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पेहराव्यातील विद्यार्थी







कोल्हापूर, दि. ६ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला आज सकाळी अत्यंत आकर्षक व दिमाखदार शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आहे.

या शोभायात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह राज कपूर, नर्गीस, दादा कोंडके, उषा चव्हाण, व्ही. शांताराम, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सिमी गरेवाल आदी कलाकारांच्या व्यक्तीरेखाही विद्यापीठाच्या प्रांगणात अवतरल्या. त्याखेरीज सहभागी अधिविभागांच्या संघांनी अतिशय कल्पकतेने प्रबोधनपर विषयांचे सादरीकरण शोभायात्रेद्वारे केले. शेतकरी, महाराष्ट्राची लोकसंस्कृती, सण व परंपरा, भारताच्या विविध प्रांतांमधील नागरिकांच्या वेशभूषा, आजची मल्टिटास्किंग महिला इत्यादींचेही दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ वेशभूषेवरच समाधान मानता शेतकरी आत्महत्या, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षण, मतदार जागृती व लोकशाही, वास्तव आणि आभासी जगातील फरक इत्यादींविषयीही सादरीकरण करून लक्ष वेधून घेतले. विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनीही शोभायात्रेत आवर्जून सहभाग घेतला.

आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. मीना पोतदार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार आणि डॉ. प्रमोद कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य इमारतीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घालून हलगी व ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य इमारतीसमोर सहभागी संघांनी आपापल्या विषयाच्या अनुषंगाने अत्यंत देखणे सादरीकरण केले.

शिक्षणापलिकडे विचारांची सौहार्दपूर्ण देवाणघेवाण अपेक्षित: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव

शोभायात्रेनंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शिवस्पंदन महोत्सवाचे प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी विद्यापीठात शिक्षण घेणे आवश्यकच आहे. तथापि, त्यापलिकडे जाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी विचारांची सौहार्दपूर्ण देवाणघेवाण करावी, हाच हेतू शिवस्पंदनच्या आयोजनामागे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरकर्त्यांबरोबरच प्रेक्षकांनाही प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आपल्या सादरीकरणातून प्रबोधनपर संदेश देणारे विद्यार्थी एक प्रकारे शिक्षकाचेच काम करतात, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत केलेले सादरीकरण हे त्यांचे समाजभान जागृत असल्याचे निदर्शक आहे. निरोगी मन आणि शरीर यासाठी कला ही महत्त्वाची ठरते. समोरच्या सादरकर्त्याला दाद देणे ही सुद्धा एक कला आहे. ती सुद्धा मनापासून जोपासली पाहिजे.

यावेळी डॉ. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद कसबे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. यावेळी डॉ. मदनलाल शर्मा, संग्राम भालकर, सुरेखा अडके आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वच स्पर्धांना उत्तम प्रतिसाद

उद्घाटन समारंभानंतर राजर्षी शाहू सभागृहात दिवसभर सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन, समूहगीत स्पर्धा आणि लोकवाद्य वादन ताल उत्सव झाला. त्याचप्रमाणे रांगोळी आणि स्थळचित्रण स्पर्धा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात पार पडल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

महोत्सवात उद्या...

उद्या, बुधवारी (दि. २४) राजर्षी शाहू सभागृह येथे मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका या स्पर्धा होतील. रसिकांनी त्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Monday, 5 January 2026

सावित्रीबाई फुले वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आद्य महिला सुधारक: डॉ. माणिकराव साळुंखे

शिवाजी विद्यापीठात महिला शास्त्रज्ञांविषयी एकदिवसीय कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. भारती पाटील, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. चेतना सोनकांबळे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे..

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.


(कार्यशाळेची लघुचित्रफीत)






कोल्हापूर, दि. ५ जानेवारी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आद्य महिला समाजसुधारक होत्या, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे स्त्री अभ्यास केंद्र, शिक्षणशास्त्र अधिविभाग, विद्यार्थिनी वसतिगृह, बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठातील महिला शास्त्रज्ञ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा आज राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या.

डॉ. साळुंखे म्हणाले, सावित्रीबाई फुले या बुद्धीवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत होत्या. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आजच्या महिलांमध्ये आत्माभिमान जागृत झाल्याचे दिसते. त्यांच्याविषयी प्रत्येक महिलेने कृतज्ञ असले पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात आज कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक प्रश्न निर्माण केले असले तरी मानवी प्रज्ञेला पर्याय नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला पर्याय ठरू शकत नाही. मात्र त्यासाठी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. त्यासाठी ग्रंथालयांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. विकसित भारत साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना काय विचार करावा याऐवजी कसा विचार करावा, हे शिकविण्याची नितांत गरज आहे.

महिलांच्या जागतिक योगदानाचा वेध घेताना डॉ. साळुंखे यांनी मेरी क्युरी, कमला सोहोनी आणि डॉ. कृष्णाबाई केळवकर यांची उदाहरणे दिली.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिकाच नव्हत्या, तर कवयित्री, शास्त्रज्ञ, प्लेगच्या साथीत लोकांना आधार देणाऱ्या सेवाभावी परिचारिकाही होत्या. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रेरणेतूनच व्यक्तीगत पातळीवर माझ्यात शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करण्याची ऊर्मी निर्माण झाली. आज शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. असे असूनही राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये त्यांचा वाटा अवघा १७ टक्केच का आणि कसा, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महिलांनी मातृत्व आणि कर्तृत्व यांचा समतोल साधून राष्ट्रीय योगदान देण्यास सिद्ध झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यापीठातील आघाडीच्या महिला संशोधक डॉ. ज्योती जाधव, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. वर्षा जाधव, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. कविता ओझा आणि डॉ. आसावरी जाधव यांचा डॉ. साळुंखे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रात या संशोधकांनी उपस्थित महिलांसमवेत मुक्त संवाद साधला.

सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रोपास पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भारती पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. तानाजी चौगुले, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह विविध अधिविभागांतील महिला अध्यापक, संशोधक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.