शिवाजी विद्यापीठात महिला शास्त्रज्ञांविषयी
एकदिवसीय कार्यशाळा
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे.. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. |
कोल्हापूर, दि. ५ जानेवारी: क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आद्य महिला समाजसुधारक होत्या, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे स्त्री अभ्यास केंद्र,
शिक्षणशास्त्र अधिविभाग, विद्यार्थिनी वसतिगृह, बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी
विकास विभाग, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि श्रीमती शारदाबाई
गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीच्या
निमित्ताने ‘शिवाजी विद्यापीठातील महिला शास्त्रज्ञ’ या विषयावरील
एकदिवसीय कार्यशाळा आज राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी बीजभाषण
करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या.
डॉ. साळुंखे म्हणाले, सावित्रीबाई फुले या
बुद्धीवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत होत्या. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच
आजच्या महिलांमध्ये आत्माभिमान जागृत झाल्याचे दिसते. त्यांच्याविषयी प्रत्येक
महिलेने कृतज्ञ असले पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात आज कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक
प्रश्न निर्माण केले असले तरी मानवी प्रज्ञेला पर्याय नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता
माणसाला पर्याय ठरू शकत नाही. मात्र त्यासाठी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला
हवे. त्यासाठी ग्रंथालयांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. विकसित भारत
साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘काय विचार करावा’ याऐवजी ‘कसा विचार करावा’, हे शिकविण्याची
नितांत गरज आहे.
महिलांच्या जागतिक योगदानाचा वेध घेताना डॉ.
साळुंखे यांनी मेरी क्युरी, कमला सोहोनी आणि डॉ. कृष्णाबाई केळवकर यांची उदाहरणे
दिली.
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.
ज्योती जाधव म्हणाल्या, सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिकाच नव्हत्या, तर
कवयित्री, शास्त्रज्ञ, प्लेगच्या साथीत लोकांना आधार देणाऱ्या सेवाभावी परिचारिकाही
होत्या. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रेरणेतूनच व्यक्तीगत पातळीवर माझ्यात
शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करण्याची ऊर्मी निर्माण झाली. आज शिक्षणाच्या क्षेत्रात
मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. असे असूनही राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये
त्यांचा वाटा अवघा १७ टक्केच का आणि कसा, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली
आहे. महिलांनी मातृत्व आणि कर्तृत्व यांचा समतोल साधून राष्ट्रीय योगदान देण्यास
सिद्ध झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात विद्यापीठातील आघाडीच्या महिला संशोधक
डॉ. ज्योती जाधव, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. वर्षा जाधव, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ.
कविता ओझा आणि डॉ. आसावरी जाधव यांचा डॉ. साळुंखे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ
देऊन गौरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रात या संशोधकांनी उपस्थित महिलांसमवेत मुक्त
संवाद साधला.
सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर
रोपास पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. निशा मुडे-पवार यांनी
स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भारती पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डॉ. तानाजी चौगुले, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह विविध अधिविभागांतील महिला अध्यापक, संशोधक, प्रशासकीय सेवक आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment