| प्रा. चंद्रकांत पाटील |
कोल्हापूर,
दि. २७ जानेवारी: शिवाजी
विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. म. सु. पाटील
समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व
समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख
रक्कम ५१ हजार रुपये व सन्मान चिन्ह असे आहे. ज्येष्ठ लेखक प्रा.राजन गवस यांच्या
हस्ते २४ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. समारंभाच्या
अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ). सुरेश गोसावी असतील.
या
संदर्भात अधिक माहिती देताना मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी
सांगितले की, प्रा. चंद्रकांत पाटील यांची समीक्षा ही मराठीतील महत्त्वाची समीक्षा
आहे. सर्जनशील लेखनाबरोबरच त्यांनी अनुवाद व समीक्षा या प्रकारात महत्त्वपूर्ण लेखन
केले आहे. त्यांच्या लेखनाचे स्वरूप हे द्वैभाषिक आहे. मराठी कविता भारतीय स्तरावर
नेण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मराठी हिंदीतील सांस्कृतिक अनुबंध अधिक
विकसित करण्यामध्ये प्रा. पाटील यांचे लेखन महत्त्वाचे ठरले आहे. "आणि
म्हणूनच",
"आणि तोपर्यंत" व "कवितेसमक्ष" हे
त्यांचे महत्त्वाचे समीक्षा ग्रंथ होत. विश्लेषक स्वरूपाची समीक्षा
असे पाटील यांच्या समीक्षेचे स्वरूप आहे. १९६० नंतरच्या आधुनिक मराठी साहित्याचा
पुरस्कार करण्यामध्ये प्रा.पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते साठोत्तरी काळातील
मराठी-हिंदी साहित्याचे विशेषतः कवितेचे महत्त्वाचे टीकाकार
आणि समीक्षक असून भीष्म साहनी यांच्या "तमस" या कादंबरीचा त्यांनी केलेला
मराठी अनुवाद विशेष गाजला. १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी
लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमातून केलेले लेखन त्यांचे महत्त्वाचे योगदान
आहे. आजवरच्या त्यांच्या एकूणच समीक्षा कारकीर्दीचा सन्मान
म्हणून या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्काराच्या निवड
समितीचे सदस्य म्हणून प्रा. एकनाथ पगार (देवळा), प्राचार्य गोविंद काजरेकर (बांदा) व प्रा. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment