Friday, 2 January 2026

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ प्राप्त करून देऊ या: आनंद पेंटर

शिवाजी विद्यापीठात पर्यावरणविषयक स्पार्क चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. अनमोल कोठडिया, आनंद पेंटर, हरिष सायवे, रमेश चव्हाण, शरद आजगेकर, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. बापू चंदनशिवे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लेखक-दिग्दर्शक आनंद पेंटर. मंचावर (डावीकडून) डॉ. शिवाजी जाधव, रमेश चव्हाण, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, हरिष सायवे आणि शरद आजगेकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लेखक-दिग्दर्शक आनंद पेंटर

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.


(स्पार्क फिल्म फेस्टीव्हल उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २ जानेवारी: कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला पुन्हा सुवर्णकाळ प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. नवोेदित चित्रपटकर्मीमध्ये पर्यावरणविषयक जाणीवानिर्मितीच्या दृष्टीने स्पार्क चित्रपट महोत्सव हा महत्त्वाची नांदी ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक आनंद पेंटर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा बी.ए. फिल्म मेकिंग विभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. आणि लक्ष्मी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हल- राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट/ माहितीपट स्पर्धा-२०२५च्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी रमेश चव्हाण, हरिष सायवे आणि शरद आजगेकर प्रमुख उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्यभरातून आलेले एकूण २६ लघुपट आणि माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

आनंद पेंटर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांच्या प्रेरणेतून कोल्हापूर हे कलापूर म्हणून प्रसिद्धीला आले. अनेक नामवंत कलाकारांची देणगी या शहराने जगाला दिली. चित्रपटसृष्टीचे मधयवर्ती केंद्र म्हणून कार्य करताना ते प्रयोगशीलतेचे कोल्हापूर स्कूल ठरले. आता चित्रपटसृष्टी राज्यभरात पसरली असताना कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी नव्या पिढीने घ्यायला हवी. चित्रपट उद्योगाला चांगल्या, कुशल आणि प्रतिभावान कलाकारांची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाचा बी.ए. फिल्म मेकिंग विभाग मोठे काम करीत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भोवतालाकडे संवेदनशीलतेने पाहायला हवे आणि समर्पणशील वृत्तीने या क्षेत्रात काम करायला हवे, तरच यशाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य आहे.

रमेश चव्हाण यांनी स्पार्क फिल्म फेस्टीव्हलमधील सर्वोत्कृष्ट लघुपटांना किर्लोस्करच्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येईल, असे सांगितले. तर, हरिष सायवे यांनी किर्लोस्करतर्फे घेण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर पर्यावरणपूरक उपक्रमांना शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आवश्यक अशा सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या सुविधांचा वापर विद्यार्थी त्यांच्या व्यक्तीगत ऊर्जेने कितपत वापरतात, हा भाग फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे क्षमतावर्धन करीत असताना उपलब्ध सुविधांचा पुरेपूर लाभ घेत आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात आणि चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. जाधव यांनी आपल्या कुटुंबियांचा मा. विनायक, बेबी नंदा यांच्याशी असलेल्या स्नेहबंधांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जान्हवी लायकर यांनी परिचय करून दिला. साक्षी वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्मित कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. बापू चंदनशिवे, डॉ. अनमोल कोठडिया, लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. जयप्रकाश पाटील, डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह राज्यभरातून आलेले लघुपट-माहितीपट दिग्दर्शक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment