Showing posts with label AISHE. Show all posts
Showing posts with label AISHE. Show all posts

Tuesday, 16 September 2025

उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षणात वस्तुनिष्ठ माहितीला महत्त्व: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

विद्यापीठात अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) सुभाष माने, अभिजीत रेडेकर आणि डॉ. उत्तम सकट

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. 


कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ (लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षणामध्ये (ए.आय.एस.एच.ई.) वस्तुनिष्ठ माहितीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी या संदर्भातील माहिती जबाबदारीने भरावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा सांख्यिकी कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज एआयएसएचईच्या महाविद्यालयीन नोडल अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

ते म्हणाले, आज राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षण अहवाल हाच अधिकृत माहितीचा स्रोत, दस्तावेज उपलब्ध आहे. त्यामुळे महाविद्यालये जितक्या जबाबदारीने वस्तुनिष्ठ माहिती येथे भरतील, तितका विश्वासार्ह डेटा देशपातळीवर उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारेच राष्ट्रीय पातळीवर उच्चशिक्षणविषयक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. केंद्रीय स्तरावर परवानगी घेऊन आपल्याला राज्यस्तरीय अहवाल प्रकाशित करता येईल का, या दृष्टीनेही नजीकच्या काळात विचार केला जावा. तसेच, पुढे विद्यापीठस्तरीय अहवाल निर्मिती करून या माहितीचा विद्यापीठ स्तरावरील विविध धोरणे, योजना आखण्यासाठी विनियोग करता येईल का, या दृष्टीनेही विचार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या संगणक केंद्राचे संचालक तथा सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर यांनी, शिवाजी विद्यापीठ एआयएसएचई पोर्टलवर गेल्या १३ वर्षांपासून सलगपणे १०० टक्के माहिती भरणारे विद्यापीठ असून या कामी महाविद्यालयांनी केलेले सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे सांगितले.

कार्यशाळेत दुपारच्या सत्रात राज्य शासनाच्या उच्चशिक्षण संचालनालयाचे सांख्यिकी अधिकारी स्वप्नील कोरडे आणि श्री. रेडेकर यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थितांचे शंकासमाधान केले. उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांनी स्वागत केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर गुणवत्ता अधिकारी सुभाष माने यांनी आभार मानले. कार्यशाळेस २२१ संलग्नित महाविद्यालयांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

Friday, 13 May 2016

एआयएसएचई, एमआयएस सर्वेक्षणांत विद्यापीठाची सातत्याने १०० टक्के नोंदणी




केंद्र व राज्य शासनाकडून विशेष अभिनंदन

Abhijeet Redekar
कोल्हापूर, दि. ११ मे: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या महत्त्वाच्या 'ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन' (ए.आय.एस.एच.ई.) या सर्वेक्षणात सलग चौथ्या वर्षी आणि राज्य शासनाच्या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एम.आय.एस.) या प्रणालीअंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के माहिती अपलोड करण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाने बजावली आहे. याबद्दल केंद्रीय तसेच राज्य स्तरीय शिक्षण विभागाकडून विशेष पत्राद्वारे विद्यापीठ यंत्रणेचे अभिनंदन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे सन २०१०-११पासून ए.आय.एस.एच.ई. सर्वे७ण कार्यक्रम हाती घेण्यात आला. सुरवातीला केवळ पथदर्शी उपक्रम म्हणून हाती घेतलेल्या या उपक्रमाला लाभलेले यश आणि त्याची उपयुक्तता पाहून सरकारने हा उपक्रम कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला. शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी प्रवेश, शै७णिक उपक्रम, परीक्षा निकाल, शिक्षणासाठी वित्तसाह्य, पायाभूत सुविधांची उपलब्धता आदी विविध निकषांवर अत्यंत विश्वासार्ह व अधिकृत माहिती उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे केंद्रीय स्तरावर अतिशय महत्त्व देण्यात असलेल्या या सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालये यांनी सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के नोंदणी पूर्ण केली आहे. याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव श्री. अशोक ठाकूर यांनी विशेष पत्र पाठवून विद्यापीठाचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय माहिती संकलनासाठी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एम.आय.एस.) ही ऑनलाइन यंत्रणा विकसित केली. सन २०१३-१४पासून ती कार्यान्वित करण्यात आली. ए.आय.सी.टी.ई. अभ्यासक्रम वगळता कला, वाणिज्य, विधी, शिक्षणशास्त्र अशा संलग्नित १९६ महाविद्यालयांना याअंतर्गत ऑनलाइन माहिती भरावी लागते. या सिस्टीममध्येही शिवाजी विद्यापीठाने सुरवातीपासूनच सलग तीन वर्षे शंभर टक्के माहिती नोंदवून विक्रमी कामगिरी केली आहे. याबद्दल राज्याचे शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. धनराज माने यांनी विशेष प्रशस्ती पत्र पाठवून विद्यापीठाचे अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, ए.आय.एस.एच.ई. आणि एम.आय.एस. या दोन्ही प्रणालींमुळे केंद्र व राज्य सरकारला देशातील विद्यापीठे व महाविद्यालये यांच्याशी निगडित शैक्षणिक माहिती तत्काळ ऑनलाइन उपलब्ध होत असल्याने शैक्षणिक धोरणे निश्चित करण्यासाठी या माहितीचा अतिशय चांगला उपयोग होतो. शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालये यांनी या सुविधेचे महत्त्व जाणून त्यासाठी सातत्याने आणि वेळेत माहिती भरून दिली आहे. या कामगिरीबद्दल बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उपकुलसचिव संजय कुबल, नोडल अधिकारी अभिजीत रेडेकर यांच्यासह महाविद्यालयांचे प्राचार्य व नोडल अधिकारी हे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत. यापुढील काळातही शासनाच्या उपक्रमांना त्यांनी असाच सकारात्मक प्रतिसाद देऊन यशस्वी करावे, असे आवाहन या निमित्ताने कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.