विद्यापीठात अखिल
भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा
| शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) सुभाष माने, अभिजीत रेडेकर आणि डॉ. उत्तम सकट |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक
सर्वेक्षणामध्ये (ए.आय.एस.एच.ई.) वस्तुनिष्ठ माहितीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे
महाविद्यालयांनी या संदर्भातील माहिती जबाबदारीने भरावी, असे आवाहन शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा
सांख्यिकी कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज एआयएसएचईच्या
महाविद्यालयीन नोडल अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात
आली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ.
शिर्के बोलत होते.
ते म्हणाले, आज
राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षण अहवाल हाच अधिकृत
माहितीचा स्रोत, दस्तावेज उपलब्ध आहे. त्यामुळे महाविद्यालये जितक्या जबाबदारीने
वस्तुनिष्ठ माहिती येथे भरतील, तितका विश्वासार्ह डेटा देशपातळीवर उपलब्ध होईल. या
माहितीच्या आधारेच राष्ट्रीय पातळीवर उच्चशिक्षणविषयक धोरणात्मक निर्णय घेतले
जातात. केंद्रीय स्तरावर परवानगी घेऊन आपल्याला राज्यस्तरीय अहवाल प्रकाशित करता
येईल का, या दृष्टीनेही नजीकच्या काळात विचार केला जावा. तसेच, पुढे
विद्यापीठस्तरीय अहवाल निर्मिती करून या माहितीचा विद्यापीठ स्तरावरील विविध
धोरणे, योजना आखण्यासाठी विनियोग करता येईल का, या दृष्टीनेही विचार करण्याची
आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या संगणक
केंद्राचे संचालक तथा सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर यांनी, शिवाजी विद्यापीठ
एआयएसएचई पोर्टलवर गेल्या १३ वर्षांपासून सलगपणे १०० टक्के माहिती भरणारे
विद्यापीठ असून या कामी महाविद्यालयांनी केलेले सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे
सांगितले.
कार्यशाळेत दुपारच्या
सत्रात राज्य शासनाच्या उच्चशिक्षण संचालनालयाचे सांख्यिकी अधिकारी स्वप्नील कोरडे
आणि श्री. रेडेकर यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थितांचे शंकासमाधान केले. उपकुलसचिव
डॉ. उत्तम सकट यांनी स्वागत केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर
गुणवत्ता अधिकारी सुभाष माने यांनी आभार मानले. कार्यशाळेस २२१ संलग्नित
महाविद्यालयांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment