Tuesday, 16 September 2025

'विकसित भारत २०४७' उपक्रमांतर्गत उद्यापासून विशेष व्याख्यानमालेसह विविध कार्यक्रम







कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: विकसित भारत २०४७ या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ही माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, विकसित भारत २०४७ हा भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापूर्वी विकसित राष्ट्र बनण्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक उपक्रम आहे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या जवळ येत असताना, हा उपक्रम व्यापक आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रात प्रयत्नांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. ही संकल्पना भारताला एक आघाडीची जागतिक शक्ती म्हणून जगासमोर आणण्याची क्षमता दर्शवितो. तरुणांमध्ये हा विचार पुढे नेण्यासाठी "विकसित भारत राजदूत - युवा कनेक्ट" कार्यक्रम भारत सरकार तर्फे आयोजित केला जाणार असून, याचा उद्देश भारताच्या विकासात्मक परिवर्तनात तरुणांचा सहभाग आणि नेतृत्व वाढवणे हा आहे. या अनुषंगाने राज्यामध्ये या संदर्भात विविध उपक्रम / कार्यक्रम आयोजित करून मा. पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाला जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान दुपारी ५ वाजता "विकसित भारत संवाद online व्याख्यानमाला" आयोजित करण्यात येणार असून या व्याख्यानमालेत राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता), सेवानिवृत्त राजदूत श्रीमती लक्ष्मी पुरी (भारतातील लोकशाहीचे पुनर्जागरण : मोदी युगाची क्रांती), प्रा. डॉ. मनीष दाभाडे, जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ, नवी दिल्ली (परराष्ट्र धोरण आणि विकसित भारत),  श्री. आशिष चांदोरकर, प्रथितयश लेखक व अर्थकारणाचे अभ्यासक, जिनिव्हा, ऑस्ट्रिया (मोदी कालखंडातील आर्थिक सुधारणा आणि विकसित भारत) आणि डॉ. शान्तिश्री पंडित, कुलगुरु, जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ, नवी दिल्ली (शिक्षणातून कौशल्य विकास : विकसित भारताचा आधार) यांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी आणि संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही व्याख्याने होणार आहेत.

तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रक्तदान अमृतमहोत्सवाअंतर्गत रक्तदान शिबिरे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छयोत्सव उपक्रम, सफाई मित्र सुरक्षा शिबिर अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे, क्लीन, ग्रीन उत्सवाअंतर्गत शून्य कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक भांडी व साधनांचा वापर, विकसित भारत @ २०४७ मध्ये युवकांचा सहभाग याबाबत व्याख्यान, राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस (२४ सप्टेंबर, २०२५) यानिमित्त मा. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती व पुढीला वाटचाल या संदर्भात युवकांशी संवाद कार्यक्रम, "एक दिन, एक घंटा, एक साथ" राष्ट्र स्वच्छता अभियान, जागतिक पर्यावरण आरोग्य दिवसानिमित्त जनजागृती, विश्व पर्यटन दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबाबत व त्यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याबाबत व्याख्यान, शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त युवकांमध्ये देशभक्ती, साहस व त्यांच्या आदर्शाचे स्मरण करण्यासाठी व्याख्यान, जागतिक हृदय दिवस निमित्त पोषण आहार / अनेमिया / हृदयरोग / मधुमेह / उच्च रक्तदाब या बद्दल कार्यशाळा / निबंध / पथनाट्य आदी उपक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार याच कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे संपूर्ण राज्यभरामध्ये "स्वच्छता ही सेवा" अभियान २०२५ हा उपक्रम विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबीर, Clean Green उत्सव, स्वच्छ सुजल गाव, स्वच्छ आरोग्यदायी स्ट्रीट फूड इत्यादी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व नागरिकांना हाताची साखळी करून संपूर्ण देशभरात आणि राज्यातही श्रमदान अंतर्गत "एक दिन, एक घंटा, एक साथ" हे एक तासाचे अभियान राबविले जाणार आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) च्या मार्गदर्शक तत्वानुसार पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी AEDP संदर्भात सर्व विद्यापीठांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी, विद्यापीठासह सर्व संलग्नित महाविद्यालयांनी सदरचे उपक्रमांचे नियोजन करून यशस्वीरित्या राबवावेत, त्याचप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेमध्येही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment