Friday, 26 September 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात: मंत्री शंभुराज देसाई

विचारधनग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात 'विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधीमंडळातील भाषणे भाग-१' या ग्रंथाचे प्रकाशन करताना महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, डॉ. विजय चोरमारे, अशोकराव पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


शिवाजी विद्यापीठातील ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मंत्री शंभुराज देसाई.

शिवाजी विद्यापीठातील ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर


(ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तळमळीमुळेच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ होऊ शकले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधीमंडळातील भाषणे भाग-१ या डॉ. विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे असावे की सातारा येथे, याविषयी दुविधा त्यावेळी होती. मंत्रीमंडळासमोर याविषयीचा प्रस्ताव येणार असल्याचे समजताच प्रकृतीअस्वास्थ्य असतानाही बाळासाहेब देसाई त्या बैठकीसाठी पोहोचले आणि स्वतः साताऱ्याचे असूनही कोल्हापूर येथेच विद्यापीठ होण्यासाठी आग्रह लावून धरला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर या तीन बाबी त्यांच्या हृदयाच्या जवळच्या होत्या. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियापासून ते राज्यभरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी उभारले. तसेच अखेरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. गोरगरीबांच्या मुलांच्या कल्याणाचा विचार करून त्यांच्या हितासाठी, शेतकरी हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे विचार आणि वारसा यांची जाणीव ठेवून वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यापीठातील देसाई अध्यासनाला अधिक चांगले स्वरुप देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने विविध महान व्यक्तीमत्त्वांच्या नावे अध्यासने उभारून त्यांच्या विचार व कार्याचा अभ्यास व संशोधन करण्याचा उपक्रम महत्त्वाचा आहे. आजच्या कालखंडात समाजापेक्षा व्यक्तीगत स्वार्थ मोठा होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब देसाईंसारखे निस्वार्थ सामाजिक भावनेतून कार्य करणारे आदर्श आपल्याला मार्गदर्शक ठरतात. मंत्री शंभुराज देसाई हे बाळासाहेबांचे आदर्श नातू म्हणून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत, याचा अभिमान वाटतो. माझे चुलते खटाव येथे होते, ते बाळासाहेब देसाई यांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या आठवणी ते आम्हाला सांगायचे. आज मी त्यांच्या नातवासमवेत काम करतो आहे, याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

एक महत्त्वाची कार्यपूर्ती साध्य केल्याचा हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगून संपादकीय मनोगतामध्ये डॉ. विजय चोरमारे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या नेतृत्वाच्या विचारांचे दस्तावेजीकरण या निमित्ताने संकलित करता आले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई आणि शरद पवार या चार नेत्यांप्रती महाराष्ट्राने सदैव कृतज्ञ राहायला हवे, इतके त्यांचे ऋण आहेत. देसाई यांच्या शैक्षणिक धोरणामुळे महाराष्ट्राची पहिली पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली. प्रशासनात त्यांचा मोठा दरारा होता. अत्यंत अभ्यासू, संयमी आणि प्रगल्भ व्यक्तीमत्त्वाच्या देसाई यांनी आपल्या विरोधकांचाही सदैव आदरच राखला. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी आदर्शवत स्वरुपाचे आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापुरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. ही कृतज्ञता त्यांच्या मनी सदैव असावी, त्यामुळेच कदाचित ते शिवाजी विद्यापीठ येथे होण्याविषयी आग्रही राहिले असावेत. डॉ. विजय चोरमारे यांनी देसाई यांच्या भाषणांचे संकलन करून मोठे काम केले आहे. तथापि, त्यांच्या कार्याचे बरेचसे संकलन अद्यापही बाकी आहे. त्यामुळे पुढील भागांच्या कामालाही त्यांनी सुरवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते यावेळी ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण भोसले, डॉ. भारती पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विश्वनाथ पानस्कर, अशोकराव पाटील, जयराज देसाई, राजेंद्र देसाई, पृथ्वीराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबातील सदस्य, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment