Wednesday, 17 September 2025

धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद

हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटील

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. टी.एस. पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. रामचंद्र पवार आणि यशोधन बोकील



शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. टी.एस. पाटील. 



कोल्हापूर, दि. १७ सप्टेंबर: धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान आहे, आपण ते अंगिकारले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान उद्देशिकाया विषयावतील विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. भारतीय संविधान अमृतमहोत्सव वर्षानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

डॉ. पाटील म्हणाले, भारतीय संविधानाबद्दल देशात साक्षरता निर्माण होणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाची उद्देशिका आम्हांला आमचा देश कसा निर्माण करायचा आहे, हे सांगते. विषमता तत्त्वाला नकार देऊन समतातत्त्वाचा अंगिकार करण्याची गरज ती व्यक्त करते. या देशात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारतीय संविधानात अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. राज्यघटनेतील मुलभूत अधिकार हा महत्त्वाचा घटक आहे. मुलभूत कर्तव्यांचे आपण पालन केले पाहिजे. सार्वजनिक संपत्ती व मालमत्तांचे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. संविधानाने प्रत्येकाला व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. या संविधानाचे पालन व रक्षण सर्व भारतीयांनी प्राणपणाने केले पाहिजे.

यावेळी डॉ. रामचंद्र पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. यशोधन बोकील यांनी परिचय करून दिला. श्री. रविंद्र खैरे यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानास अविनाश भाले, उदय घाटे, सुधाकर भोसले, वसंत सिंघन, डॉ. किशोर खिलारे, डॉ. अनमोल कोठडिया, आर. एम. जाधव, यश आंबोळे, दत्ता घुटूकडे आदी उपस्थित होते. 




No comments:

Post a Comment