Tuesday, 23 September 2025

महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक: खासदार सुप्रिया सुळे

शिवाजी विद्यापीठात कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२ पुस्तकाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात डॉ. भारती पाटील संपादित 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना खासदार सुप्रिया सुळे. 

शिवाजी विद्यापीठात डॉ. भारती पाटील संपादित 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना खासदार सुप्रिया सुळे. मंचावर (डावीकडून) डॉ. भारती पाटील, सरोज पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.  

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २३ सप्टेंबर: महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद देणे यातून त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनातर्फे आयोजित कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२ या डॉ. भारती पाटील संपादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री सक्षमीकरण: आव्हाने व संधी या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सरोज (माई) पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी महिला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक आघाड्यांवर आत्मनिर्भर बनल्या पाहिजेत. राज्याची, देशाची आर्थिक घडी बसविण्यामध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. धोरणात्मक निर्णयप्रक्रियेमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात समावेशन होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुली-महिलांनी आपले निर्णयस्वातंत्र्य अबाधित राखून आपल्या मताशी ठाम राहायला हवे. तसेच वेळप्रसंगी ठामपणे नाही म्हणायलाही शिकायला हवे. स्त्री सन्मानाची सुरवात आपल्या घरापासून केली पाहिजे. स्त्री मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना पुरूषांचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही. किंबहुना, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांमुळे या देशात स्त्री-पुरूष समतेचे आणि स्त्री सन्मानाचे वारे निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रवासात आपण पुरूषांना सोबत घेऊन वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सुळे यांनी आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक दाखले देत आपल्याला कधीही लिंगभेदाचा सामना करावा लागला नसल्याचे सांगितले. प्रत्येक मुलीला, महिलेला या प्रकारचे पर्यावरण उपलब्ध करून देण्यासाठी समाजाने प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.

यावेळी सरोज पाटील म्हणाल्या, कोणतेही मूल विद्वत्ता घेऊनच जन्मते. त्याची गुणवत्ता पाहून त्याला योग्य पैलू पाडणे गरजेचे असते. सुप्रिया सुळे यांनी केलेली प्रगती अभिमानास्पद असून त्यापाठी तिच्या आईवडिलांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या जीवनसंघर्षाबद्दलही त्यांनी उपस्थितांना अवगत केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शारदाबाई पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर, ऊर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

पुस्तकाविषयी थोडक्यात...

डॉ. भारती पाटील यांनी कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२ हे पुस्तक संपादित केलेले असून कोल्हापुरातील स्वातंत्र्य चळवळीसह शैक्षणिक, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या ३४ स्त्रियांच्या कार्याचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे. यातील बहुतांश कर्तृत्ववान महिलांसह त्यांच्याविषयी लिहीणाऱ्या लेखिकाही आजच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या. पुस्तकाची पृष्ठसंख्या ४०० आहे. 

No comments:

Post a Comment