![]() |
| शिवाजी विद्यापीठात संविधान दूत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. श्रीकृष्ण महाजन |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात संविधान दूत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. श्रीकृष्ण महाजन. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे |
कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: संविधानातील मूल्ये समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असून
त्या दृष्टीने संविधान दूतांनी काम करणे अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन शिवाजी
विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन
यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित ‘संविधान दूत’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास
शिंदे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. महाजन म्हणाले, तरुणाईला योग्य दिशा
मिळाली, तर त्यांचे जीवन योग्यरीत्या घडते आणि पर्यायाने देश घडतो. वादाने प्रश्न
वाढत जातात, मात्र समंजसपणा व चर्चेच्या मार्गाने प्रश्न सुटतात. तेव्हा संविधान
दूतांनी सामंजस्याच्या मार्गाने संविधानातील मूल्यतत्त्वे समाजातील तळागाळापर्यंत
पोहचविण्याचे काम करावे.
ते म्हणाले, भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
आणि धर्मनिरपेक्षता यांसारखी उदात्त मानवी मूल्ये समाजात दृढपणे रुजावीत व भारतीय
संविधानाबद्दल व्यापक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवाजी
विद्यापीठाच्यावतीने भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “संविधानदूत” ही
महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक
महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील एका विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीची
संविधानदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे
म्हणाले, विद्यार्थ्यांनी
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या जीवनामध्ये केला
पाहिजे. शिक्षणाने आयुष्य बदलते. आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक असून या
कार्यशाळेमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपण राष्ट्र उभारणीसाठी केला पाहिजे.
यावेळी डॉ. तानाजी चौगुले यांनी स्वागत
व प्रास्ताविक केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. किशोर
खिलारे यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या ‘भारतीय
संविधानाची ओळख’ या
पहिल्या सत्रात प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी ‘संविधान
व त्याचे महत्त्व’ आणि ‘भारतीय संविधानाची प्रस्तावना व संवैधानिक मूल्ये’ या विषयावर तर प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी ‘लोकशाही, समता आणि न्याय’ आणि ‘मूलभूत हक्क व कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘संविधान
मूल्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व’ या दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. अविनाश भाले यांनी
संविधान दूत म्हणून समाजामध्ये प्रत्यक्ष कसे काम करावे, यासबंधी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. भारती पाटील, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ.
दत्ता जाधव, डॉ.
लखन भोगम, जॉर्ज
क्रुझ आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment