अमेरिकेतील
स्टॅनफोर्ड विद्यापीठाची सन २०२५ साठीची क्रमवारी जाहीर
कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: जगभरातील आघाडीच्या दोन टक्के
संशोधकांची सन २०२५ साठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर
केली आहे. यात शिवाजी विद्यापीठाच्या २० संशोधकांनी स्थान प्राप्त केले आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक
आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा ज्येष्ठ
संशोधक डॉ. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान) यांच्यासह निवृत्त प्रा. ए. व्ही. राव
(पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. सी. एच. भोसले
(पदार्थविज्ञान), डॉ. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. विठोबा पाटील (पदार्थविज्ञान), निवृत्त डॉ. संजय
गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ.
अण्णासाहेब मोहोळकर (पदार्थविज्ञान), डॉ.
सागर डेळेकर (रसायनशास्त्र), डॉ. कल्याणराव गरडकर (रसायनशास्त्र), डॉ.
तुकाराम डोंगळे (नॅनोसायन्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनोसायन्स), डॉ.
हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. संजय लठ्ठे (पदार्थविज्ञान), डॉ. के. के. पवार (जैवतंत्रज्ञान),
सचिन ओतारी (जैवतंत्रज्ञान), डॉ. अनिल घुले (रसायनशास्त्र), डॉ. शरदराव व्हनाळकर
(पदार्थविज्ञान), डॉ. तेजस्विनी भट (पदार्थविज्ञान) आणि डॉ. मानसिंग टाकळे (पदार्थविज्ञान)
यांचा समावेश आहे. गत वर्षभरातील संशोधकीय कामगिरीच्या आधारे स्टॅनफोर्ड
विद्यापीठाने ही निवड केली आहे. या २० संशोधकांव्यतिरिक्त राज्यासह जगभरात अन्य
शिक्षण संस्था, विद्यापीठांत कार्यरत असणारे शिवाजी विद्यापीठाचे अनेक माजी
विद्यार्थीही या दोन टक्के संशोधकांत समाविष्ट आहेत.
सार्वकालिक कामगिरीच्या आधारेही
संशोधकांची एक यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्यासह डॉ. ए.व्ही. राव, डॉ. केशव राजपुरे, डॉ. ज्योती जाधव आणि डॉ. सी.एच.
भोसले या पाच संशोधकांचा समावेश आहे.
गेली सहा वर्षे सातत्याने शिवाजी
विद्यापीठाचे संशोधकीय महत्त्व जगाच्या नकाशावर हे संशोधक अधोरेखित करीत आहेत, ही
अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे, अशी भावना व्यक्त करीत कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के यांनी या सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी म्हटले
आहे की, या संशोधकांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळण्यामागे त्यांनी गेल्या तीन
दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे केलेले संशोधन कारणीभूत आहे. या सर्वांनी विद्यापीठात
एक संशोधन शिस्त निर्माण केली. त्यामुळे
विद्यापीठात उत्तम संशोधन परंपरा निर्माण झाली आहे. हा वारसा पुढे घेऊन जाण्यास नवसंशोधकांनी
सिद्ध व्हायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्टॅनफोर्ड
विद्यापीठाची रँकिंग प्रक्रिया
संशोधनाची गुणवत्ता निर्धारित
करण्यासाठी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने शोधनिबंधाला मिळणारी सायटेशन्स, एच
निर्देशांक, सहलेखकत्व, संशोधन लेखकाची
नेमकी भूमिका या घटकांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक आणि सर्वमान्य अशी
संयुक्त सूचक (सी स्कोर) निर्देशांक काढून ही जागतिक आघाडीच्या २ टक्के संशोधकांची
क्रमवारी प्रसिद्ध केली जाते. ही प्रणाली ‘आयसीएसआर’ लॅबद्वारे ‘एल्सव्हियर’ने प्रदान केलेल्या स्कोपस डेटाचा वापर करते.
दरवर्षी ही प्रमाणित क्रमवारी जाहीर करण्यात येते. या रँकिंगमुळे केवळ एका विषयातीलच
नव्हे, तर सर्व विषयांमधील गुणवत्तेची तुलना करणे शक्य झाले. स्कोपस' डेटाबेसवर
आधारित 'एल्सव्हिअर'ने
तयार केलेल्या यादीसाठी १९६० ते २०२५ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणार्या
संशोधकांची सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर निवड करण्यात
आली आहे.
२२ विज्ञान विषय आणि १७४ उपविषयांमधील संशोधनाची यात दखल घेतली गेली. जागतिक
आघाडीच्या २% शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवणे हीच एक मोठी उपलब्धी असते.
गेल्या पाच वर्षात या यादीत शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी स्थान टिकवून ठेवले
आहे, ही बाब महत्त्वाची आहे.
No comments:
Post a Comment