शिवाजी
विद्यापीठात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.बी. ओगले. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.बी. ओगले. समोर देशविदेशांतून उपस्थित असणारे संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी |
कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: ज्येष्ठ संशोधक डॉ.
प्रमोद तथा पी.एस. पाटील म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवून टाकणारे शिक्षक
आहेत, असे गौरवोद्गार पुण्याच्या ‘आयसर’चे इमॅरिटस प्राध्यापक व कोलकता येथील ‘राइज’चे संचालक डॉ. एस.बी. ओगले यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा
जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ
त्यांच्या शैक्षणिक, संशोधकीय आणि संस्थात्मक विकास क्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या
सन्मानार्थ विद्यापीठात 'पायोनियरिंग सायन्स
अँड प्रोग्रेस: नॅनो टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (आयसीपीएसपी-एनएसडी २०२५) या विषयावरील
तीनदिवसीय परिषदेला आज प्रारंभ झाला. तिच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे
म्हणून डॉ. ओगले बोलत होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.
डॉ. पाटील यांच्या समग्र वाटचालीचे आपण
साक्षीदार असल्याचे सांगून डॉ. ओगले म्हणाले, डॉ. पाटील हे अत्यंत शांत, निगर्वी,
स्थितप्रज्ञ आणि हसतमुख व्यक्तीमत्त्वाचे धनी आहेत. मितभाषी आणि विद्यार्थीभिमुख
असे ते शिक्षक आहेत. ते मृदू स्वभावाचे असले तरी त्यांच्या संशोधनकार्याच्या
बाबतीत ते धडाडीचे आहेत. जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटी या गुणांमधून त्यांनी
आपली संपूर्ण कारकीर्द साकारली आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
सामग्रीने सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांच्या नावावर जमा
आहे.
दक्षिण कोरियाच्या नॅशनल चोन्नम
युनिव्हर्सिटीचे प्रा. जे.एच. कीम म्हणाले, डॉ. पाटील यांच्या अत्यंत लक्षणीय
कारकीर्दीच्या गौरव समारंभामध्ये सहभागी होताना मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्यासमवेत
शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांसाठी संशोधनकार्य करता आले. त्याचप्रमाणे
वीसहून अधिक विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करता आले, ही
माझ्यासाठी मोठी संधी ठरली. डॉ. पाटील यांचे शैक्षणिक आणि संशोधनाच्या बाबतीत
सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले; त्यांची स्नेहपूर्ण मैत्री अनेक
वर्षांपासून लाभली, याचा आनंद वाटतो. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या संशोधकीय
कारकीर्दीची एक नवी सुरवात होते आहे. त्यातही ते जागतिक दर्जाची कामगिरी बजावतील,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तैवानच्या नॅशनल ड्वांग ह्वा
युनिव्हर्सिटीचे प्रा. वाय.आर. मा म्हणाले, प्रा. पाटील हे जागतिक संशोधन
क्षेत्रातले ‘कोल्हापूरचे खरे पाणी’ आहे. शिवाजी
विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर उंचावणारे आणि विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून
देण्यासाठी अहोरात्र झटणारे हे व्यक्तीमत्त्व आहे. अशा ध्येयनिष्ठ
व्यक्तीमत्त्वाचे सान्निध्य आम्हाला लाभले, याचा अभिमान वाटतो.
डॉ. पाटील हे
एक उत्तम माणूस असल्याचे सांगून अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले,
डॉ. प्रमोद पाटील यांनी केवळ शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रांतच नव्हे, तर शैक्षणिक
प्रशासक म्हणूनही अत्युच्च दर्जाची कामगिरी बजावली आहे. अधिविभाग प्रमुख, स्कूल ऑफ
नॅनोसायन्सचे संस्थापक संचालक, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि
पुढे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू अशा सर्वच पदांवर काम करीत असताना त्यांनी आपला
स्वतंत्र ठसा उमटवला. शिवाजी विद्यापीठाचे जागतिक आणि राष्ट्रीय शैक्षणिक,
संशोधकीय समुदायांसह व्यवसाय-उद्योगांसमवेत बंध निर्माण करण्याची अतिशय मोलाची
कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पटलावरील वावराचा
विद्यापीठाला, येथील संशोधकांना मोठा लाभ झाला आहे. व्यक्तीगत आकांक्षांपलिकडे
जाऊन त्यांनी विद्यापीठाला संस्थात्मक लाभ मिळवून देण्यासाठी केलेले कार्य
महत्त्वाचे आहे. व्यक्तीगत माझ्यासाठी ते एक उत्तम मित्र आहेत आणि यापुढेही
राहतील, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर परिषदेच्या स्मरणिकेचेही मान्यवरांनी प्रकाशन केले. परिषदेचे समन्वयक तथा
स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी
स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तुकाराम डोंगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय
करून दिला. सुभाष माने यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. के.डी. पवार यांनी आभार
मानले. परिषदेला ज्येष्ठ संशोधक डॉ. एस.एच. पवार यांच्यासह डॉ. प्रकाश वडगांवकर,
डॉ. सी.डी. लोखंडे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. सागर डेळेकर यांच्यासह
देशविदेशांतील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामंजस्य करार आणि टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर
या
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ आणि दक्षण कोरियातील चोन्नम
नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये असलेल्या सामंजस्य कराराला मुदतवाढ देण्यात आली.
या नूतनीकृत कराराचे आज कुलगुरू डॉ. शिर्के आणि डॉ. कीम यांच्या उपस्थितीत
हस्तांतरण करण्यात आले. कोरियाच्या प्रा.एस.डब्ल्यू. शीन, प्रा. एस.एच. कांग
यावेळी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ आणि सेराफ्लक्स इंडिया
प्रा.लि. यांच्या दरम्यान टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरच्या अनुषंगानेही यावेळी करार
करण्यात आला. कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव तुंगतकर यावेळी
उपस्थित होते.
विविध आधुनिक संशोधनाबाबत चर्चा
दरम्यान, दिवसभरात विविध
सत्रांत ‘एनर्जी, सस्टेनेबिलिटी अँड मटेरियल्स इनोव्हेशन’, ‘रिसेंट प्रोग्रेस इन अर्थ-एबन्डन्ट इलेमेंट्स-बेस्ड फोटोकेमिकल अँड
इलेक्ट्रोकेमिकल वॉटर स्पिटींग’, ‘इंटरफेस कन्ट्रोल्ड स्ट्रॅटेजीस इनॅबलिंग स्टॅबिलिटी इन
फोटोइलेक्ट्रोकेमिकल सोलार फ्युएल डिव्हाईसेस’ आणि ‘फोटोकॅटॅलिटिक बिहेवियर ऑफ २-डी
नॅनोकम्पोझिट्स फॉर व्हिजिबल लाइट ड्रिव्हन फोटोकॅटॅलिटिक डिटॉक्सिफिकेशन ऑफ
ऑर्गेनिक पोल्युटंट्स’ इत्यादी आधुनिक संशोधन विषयांबाबत अनुक्रमे डॉ. एस.बी. ओगले, प्रा. जे.एच.
कीम, प्रा. एस.एच. कांग आणि डॉ. पंकज कोईनकर यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या
सत्रात राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पोस्टर सादरीकरण सत्राचे
उद्घाटन करण्यात आले.




No comments:
Post a Comment