Tuesday, 9 September 2025

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या गौरवार्थ

विद्यापीठात ११ सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय परिषद

Prof. P.S. Patil 


कोल्हापूर, दि. ९ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ त्यांच्या शैक्षणिक, संशोधकीय आणि संस्थात्मक विकास क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल विद्यापीठात येत्या ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संचालक तथा परिषदेचे समन्वयक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी दिली आहे.

'पायोनियरिंग सायन्स अँड प्रोग्रेस: नॅनो टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (आयसीपीएसपी-एनएसडी २०२५) असा परिषदेचा विषय असून पुणे येथील आयसरचे इमॅरिटस प्रोफेसर तथा कोलकता येथील राईजचे संचालक डॉ. एस.बी. ओगले यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. उद्घाटन समारंभाला दक्षिण कोरियाच्या चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. जिन ह्योक कीम, तैवानच्या फो ग्वांग युनिव्हर्सिटीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रा. युआन-रॉन मा, सोलापूरच्या सिंहगड इन्स्टिट्यूट्सचे रिसर्च डायरेक्टर डॉ. एस.एच. पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील.

या परिषदेच्या माध्यमातून आरोग्य, ऊर्जा, शेती, पर्यावरण व औद्योगिक क्षेत्रात शाश्वत विकास साधण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाच्या भूमिकेच्या अनुषंगाने चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्वान, संशोधक व शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. यात दक्षिण कोरिया, जपान तसेच तैवान आदी देशांतील शास्त्रज्ञांसह भारतातील आयसर, जेएनसीएसएआर, सीईएनएस, डीआरडीओ, आयसीटी तसेच आयआयटी आदी अग्रगण्य शैक्षणिक व संशोधन संकुलांतील शास्त्रज्ञांचा समावेश आहे. परिषदेत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांसह आमंत्रित व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण व संशोधकीय पोस्टर्सची सादरीकरणे होणार आहेत.

No comments:

Post a Comment