Friday 13 May 2016

एआयएसएचई, एमआयएस सर्वेक्षणांत विद्यापीठाची सातत्याने १०० टक्के नोंदणी




केंद्र व राज्य शासनाकडून विशेष अभिनंदन

Abhijeet Redekar
कोल्हापूर, दि. ११ मे: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या महत्त्वाच्या 'ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन' (ए.आय.एस.एच.ई.) या सर्वेक्षणात सलग चौथ्या वर्षी आणि राज्य शासनाच्या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एम.आय.एस.) या प्रणालीअंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के माहिती अपलोड करण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाने बजावली आहे. याबद्दल केंद्रीय तसेच राज्य स्तरीय शिक्षण विभागाकडून विशेष पत्राद्वारे विद्यापीठ यंत्रणेचे अभिनंदन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे सन २०१०-११पासून ए.आय.एस.एच.ई. सर्वे७ण कार्यक्रम हाती घेण्यात आला. सुरवातीला केवळ पथदर्शी उपक्रम म्हणून हाती घेतलेल्या या उपक्रमाला लाभलेले यश आणि त्याची उपयुक्तता पाहून सरकारने हा उपक्रम कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला. शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी प्रवेश, शै७णिक उपक्रम, परीक्षा निकाल, शिक्षणासाठी वित्तसाह्य, पायाभूत सुविधांची उपलब्धता आदी विविध निकषांवर अत्यंत विश्वासार्ह व अधिकृत माहिती उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे केंद्रीय स्तरावर अतिशय महत्त्व देण्यात असलेल्या या सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालये यांनी सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के नोंदणी पूर्ण केली आहे. याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव श्री. अशोक ठाकूर यांनी विशेष पत्र पाठवून विद्यापीठाचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय माहिती संकलनासाठी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एम.आय.एस.) ही ऑनलाइन यंत्रणा विकसित केली. सन २०१३-१४पासून ती कार्यान्वित करण्यात आली. ए.आय.सी.टी.ई. अभ्यासक्रम वगळता कला, वाणिज्य, विधी, शिक्षणशास्त्र अशा संलग्नित १९६ महाविद्यालयांना याअंतर्गत ऑनलाइन माहिती भरावी लागते. या सिस्टीममध्येही शिवाजी विद्यापीठाने सुरवातीपासूनच सलग तीन वर्षे शंभर टक्के माहिती नोंदवून विक्रमी कामगिरी केली आहे. याबद्दल राज्याचे शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. धनराज माने यांनी विशेष प्रशस्ती पत्र पाठवून विद्यापीठाचे अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, ए.आय.एस.एच.ई. आणि एम.आय.एस. या दोन्ही प्रणालींमुळे केंद्र व राज्य सरकारला देशातील विद्यापीठे व महाविद्यालये यांच्याशी निगडित शैक्षणिक माहिती तत्काळ ऑनलाइन उपलब्ध होत असल्याने शैक्षणिक धोरणे निश्चित करण्यासाठी या माहितीचा अतिशय चांगला उपयोग होतो. शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालये यांनी या सुविधेचे महत्त्व जाणून त्यासाठी सातत्याने आणि वेळेत माहिती भरून दिली आहे. या कामगिरीबद्दल बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उपकुलसचिव संजय कुबल, नोडल अधिकारी अभिजीत रेडेकर यांच्यासह महाविद्यालयांचे प्राचार्य व नोडल अधिकारी हे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत. यापुढील काळातही शासनाच्या उपक्रमांना त्यांनी असाच सकारात्मक प्रतिसाद देऊन यशस्वी करावे, असे आवाहन या निमित्ताने कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment