Tuesday, 3 May 2016

शिवाजी विद्यापीठाच्या दोन संशोधकांची ६६व्या नोबेल लॉरेट परिषदेसाठी निवड




Dr. Jasmin Shaikh
कोल्हापूर, दि. ३ मे: जर्मनीमध्ये येत्या २६ जून ते १ जुलै २०१६ या कालावधीत होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ६६व्या लिंडेऊ नोबेल लॉरेट परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या दोन तरुण संशोधक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
नोबेल लॉरेट परिषदेसाठी विद्यापीठातील महिला संशोधक डॉ. जस्मीन शमशुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे 'इन्स्पायर फेलोशीप' मिळविणारे व सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करणारे डॉ. संजय सुभाष लठ्ठे यांचीही या परिषदेसाठी निवड झाली आहे. कौन्सिल फॉर दि नोबेल लॉरेट मिटींग या संस्थेकडून नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. सी.डी. लोखंडे व मार्गदर्शक प्रा. पी.एस. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नोबेल लॉरेट परिषदेमध्ये पदार्थविज्ञान विषयातील नोबेल पुरस्कार विजेते तरुण संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्याशी चर्चेची संधी या तरुणांना उपलब्ध होते. महान शास्त्रज्ञांसमोर पोस्टर व मौखिक सादरीकरणाची संधीही त्यांना मिळते. परिषदेसाठी जगभरातील साधारण ४०० तरुण संशोधकांची निवड केली जाते. यंदा या परिषदेसाठी भारतातून २१ संशोधकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या दोन तरुण संशोधकांचा समावेश आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. या संशोधकांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकही अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
डॉ. जस्मीन शेख या सध्या पदार्थविज्ञान अधिविभागात प्रा. पी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संशोधक-अ या पदावर कार्यरत आहेत. मूळ वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील असलेल्या डॉ. शेख यांचे वडील शमशुद्दीन शेख कृषी सहायक अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. सबावी येथील मोहसीन मराठी विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण तर पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पुढील शिक्षण झाले. शिवाजी विद्यापीठात एम.एस्सी. व पीएच.डी. पदवी त्यांनी मिळविली. त्यानंतर सन २०११मध्ये त्यांना दक्षिण कोरियातील हॅनयांग विद्यापीठात एक वर्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. तसेच, पुणे विद्यापीठातही प्रा. एस.आय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्ष संशोधन कार्य केले. सन २०१५पासून शिवाजी विद्यापीठात 'डीएसटी'अंतर्गत महिला संशोधक-अ या पदावर त्या कार्यरत आहेत. डॉ. शेख यांचे १८ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांना पुरस्कार मिळाले आहे. नॅनो-मटेरियलसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित आहे. सौरघट व सुपर-कपॅसिटर हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. मुख्यतः मेटल ऑक्साईड व कार्बन मटेरियलवर त्यांनी संशोधन केले आहे.
Dr. Sanjay Latthe
डॉ. संजय लठ्ठे यांनीही अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन संशोधनाच्या क्षेत्रात भरारी मारली आहे. आठवडा बाजार, किराणा मालाचे दुकान आणि अगदी मंगल कार्यालयात वाढप्याचेही काम करत शिक्षण घेणाऱ्या डॉ. लठ्ठे यांची गतवर्षी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी (डीएसटी) तर्फे 'इन्स्पायर फॅकल्टी ॲवॉर्ड'साठी निवड करण्यात आली. त्या अंतर्गत त्यांना पाच वर्षांसाठी ८३ लाख रुपयांचे संशोधन अनुदान मंजूर झाले. त्यासाठी ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करीत आहेत.
डॉ. संजय लठ्ठे यांचे पितृछत्र वयाच्या सातव्या वर्षीच हरपले. तेव्हापासून त्यांनी स्वकष्टातून आपले शिक्षण सुरू ठेवले. मूळचे सांगोला (जि. सोलापूर) येथील असलेल्या संजय यांनी प्राथमिक शाळेत असताना सांगोल्याच्या आठवडा बाजारासह डिपार्टमेंटल स्टोअर, मंगल कार्यालय अशा ठिकाणी पडेल ती कामे केली, मात्र शि७ण सोडले नाही. पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाच्या 'डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन'मध्ये त्यांना 'कमवा व शिका' योजनेअंतर्गत प्रवेश मिळाला. एम.एस्सी. (पदार्थविज्ञान) विषयात त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली. विद्यापीठात त्यांनी पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून पाण्याला अवरोध करणारे कोटिंग तयार करण्याचे संशोधन त्यांनी प्रा. ए.व्ही. राव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले. पीएच.डी. दरम्यान त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग आणि वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती देण्यात आली. पीएच.डी.पर्यंतचे सर्व शिक्षण त्यांनी कुटुंबाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता पूर्ण केले.
पीएच.डी.मधील संशोधनाच्या आधारे त्यांची इस्तंबूल (तुर्की) येथील कोच विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरेटसाठी (ऑक्टोबर २०१० ते सप्टेंबर २०१२) निवड झाली. त्यानंतर से (दक्षिण कोरिया) येथील कोरिया विद्यापीठात (ऑक्टोबर २०१२ ते मे २०१३) हायड्रोजन वायू निर्मितीवरील संशोधनासाठी तसेच पाण्या मिसळलेल्या विषारी घटकांना वेगळे करण्यासाठी मेम्ब्रेन तयार करण्याच्या संशोधनासाठी निवड झाली. त्यांना जपान सरकार पुरस्कृत "जपान सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायन्स"ची प्रतिष्ठेची शिष्यवृत्तीही मिळाली. जगभरातील हजारो संशोधकामधून १२० संशोधकांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आणि या संशोधकांमध्ये डॉ. ठ्ठे महाराष्ट्रातून निवड झालेले एकमेव संशोधक होते. टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सचे कुलगुरू नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झालेले जागतिक कीर्तीचे संशोधक प्रा. अकिरा फुजीशिमा यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉ. लठ्ठे यांचे ४४ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, विविध राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी १५ शोधनिबंध सादर केले आहे. त्यांच्या शोधनिबंधांचा संदर्भ जगभरातील १०००हून अधिक संशोधकांनी त्यांच्या संशोधनामध्ये दिला आहे. यावरून त्यांच्या संशोधनाचा सर्वोत्तम दर्जा स्पष्ट होतो.

1 comment:

  1. सामान्य कुटुंबातील मुलांचे यश पाहून यश पाहून प्रेरणा मिळते.

    ReplyDelete