Thursday, 5 May 2016

विद्यापीठात पथदर्शी जैव ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे विद्यापीठात जैव-ऊर्जाविषयक एकदिवसीय चर्चासत्र उत्साहात
Mr. Ranjeet Shetty of CIPL, Mumbai addressing at Seminar

Mr. Rajesh Date of PRIMOVE, Pune

Mr. Santosh Gondhalekar of Gangotri, Pune

कोल्हापूर, दि. ५ मे: आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारावर पर्यावरण सुसंगत व प्रदूषणविरहित प्रकल्पांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठातही जैव-ऊर्जा व कचरा व्यवस्थापनावर आधारित आधुनिक पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) आणि चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशीप (सीआयपीएल, मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठात आज 'जैव-ऊर्जा व कचरा व्यवस्थापन' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, स्थानिक उद्योगांना अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञान यांच्यासंदर्भात अवगत करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. उद्योगांना अत्यंत उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीचे सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यापीठात असावे, या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. इनक्युबेशन सेंटरच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने अशी अनेक छोटी छोटी पावले उचलण्यात येणार असून त्याचा विद्यापीठ परिक्षेत्रातील स्थानिक उद्योगांना लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सीआयपीएलचे संचालक रणजीत शेट्टी यांचे 'ग्रीन वेस्ट टू सॉलिड फ्युएल टू पॉवर' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सीआयपीएलच्या माध्यमातून सुप्रशासनाशी संबंधित मार्गदर्शन करण्याबरोबरच कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती करण्याचे ध्येय बाळगून अनेक प्रकारचे संशोधन करण्यात येत आहे. विशेषतः खेड्यांमध्ये चुलीच्या धुरामुळे महिलांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी प्रदूषणविरहित आणि किफायती तंत्रज्ञान निर्माण करण्यात येत आहे. यासाठी त्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता, आर्थिकदृष्ट्या किफायती, पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्हता या चार गोष्टी पायाभूत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
यावेळी पुण्याच्या प्रायमोव्ह इंजिनिअरिंगच्या राजेश दाते यांचे 'ॲग्रो रेसिड्यू टू बायो-सीएनजी' या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी शेतीमधील टाकाऊ कचऱ्यापासूनही जैव-इंधन निर्मिती करता येणे शक्य असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करता येऊ शकते, असे सांगितले. देशातील एकूण जमिनीवर उपलब्ध लँडमासपैकी २५ ते ३० टक्के जरी आपण वापरात आणू शकलो, तर क्रूड ऑईलची शंभर टक्के आयात बंद करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
पुण्याच्या गंगोत्री इको टेक्नॉलॉजीजच्या संतोष गोंधळेकर यांनी 'वेट वेस्ट टू सीएनजी लिक्विड फर्टिलायझर अँड ब्रिक्वेट्स' या विषयावर मार्गदर्शन केले. घनकचऱ्याबरोबरच ओल्या कचऱ्याची समस्या ही आता सर्वच शहरांची समस्या होऊ पाहते आहे. त्यावरही संशोधनाच्या साह्याने प्रक्रिया करून शंभर टक्के पर्यावरणपूरक व प्रदूषणविरहित तंत्रज्ञान विकसित केले असून देशाला कचऱ्याच्या समस्येपासून मुक्ती देण्याची त्याची निश्चित क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
 कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा. ज्योती जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. या चर्चासत्रास सचिन मेनन, एस.पी. सुतार, अजय मस्के, एन.एम. शिंदे, अनिल काळे, मेधा कुलकर्णी, कुलदीप पाटील, कुशल गोस्वामी, पल्लवी कोरगावकर आदी मान्यवर उद्योजकांसह कोल्हापूर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष एस.बी. पवार, विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment