विद्यापीठाच्या उद्योजकता विकास कार्यशाळेस
उत्साही प्रतिसाद
Shri. Ashok More |
Vice Chancellor Dr. Devanand Shinde |
Workshop received huge response from Students |
कोल्हापूर, दि. ६ मे: गुणवत्ता, कौशल्य, आत्मविश्वास, बाजाराचा शोध आणि उपलब्ध संधी या पंचसूत्रीच्या जोरावर यशस्वी उद्योजक होणे शक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र
शासनाच्या आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उप-सरव्यवस्थापक अशोक मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, युवक कल्याण कक्ष आणि विद्यापीठ कौशल्य विकास
व रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त
विद्यमाने आज उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
या कार्यशाळेस युवक-युवतींचा अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद लाभला. सुमारे २१९ जण
या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी झाले.
अशोक मोरे म्हणाले, बँकांच्या माध्यमातून निधी, पतपुरवठा करण्यात
तांत्रिक अडचणी उद्भवतात. अशा इच्छुक,
गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करण्याचे काम महामंडळ करते. महामंडळाचा मुख्य उद्देश तळागाळातील सर्व लोकांना समान हक्क प्रदान करण्याचे आहे. बाजारामध्ये कोणत्या वस्तूची मागणी अधिक आहे पण उपलब्धता कमी आहे, याचा शोध नवउद्योजकांनी घेणे आवश्यक असल्याचे
त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महात्मा फुले महामंडळ, ओबीसी महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ यांच्याकडून दिले जाणारे सूक्ष्म, लघु, दीर्घ मुदतीचे कर्ज तसेच विविध योजना याची माहिती दिली. तसेच गृह उद्योग, लघु उद्योग, शैक्षणिक कर्ज यांची उपलब्धता कशी होते, त्यासाठीची अर्ज प्रक्रिया, कालावधी व उपलब्ध होणारे निधी यांची उपयुक्त माहिती दिली.
Mr. M.I. Garodia |
करिअर मार्गदर्शक एम.आय. गरोदीया म्हणाले, अत्यंत परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांमधूनच यशाचा जन्म होतो. प्रत्येकाच्या वेदनांचा विचार करणाराच जीवनात यशस्वी उद्योजक होतो. भारतात इंग्रज दाखल होण्यापूर्वी भारतीय बाजारपेठेतील वस्तूंची जगभर निर्यात होत असे. त्यावेळी भारतातील साठ टक्के लोक उद्योजक होते. हे प्रमाण त्यावेळी शेजारील चीनपेक्षा अधिक होते. उत्पादन, वित्त, ग्राहक, मार्केट यांचा प्रथम विचार करावा. त्यानंतर केलेले नियोजन लिहून काढावे. केलेल्या लिखाणावर चर्चा करावी आणि अंमलबजावणीसाठी सज्ज व्हावे. छोट्या छोट्या प्रयोगांतून प्रथम प्रयत्न करावे. त्यानंतर मोठी झेप घेण्यास सज्ज व्हावे, असा उपदेश त्यांनी केला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या जोडीनेच आता उद्योजकीय धडे गिरवण्याची गरज
आहे. प्रत्येकामध्ये क्षमता असते. त्या क्षमतेचा उपयोग कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी करावा. काही
दिवसांपूर्वी विद्यापीठाने आयोजित केलेल्या जॉब फेअरचा दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. एकाच दिवसात ८०० तरुणांना रोजगार उपलब्ध झाले, ही लक्षणीय बाब आहे. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील युवकांचा एम्प्लॉएबिलीटी रेशो
वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. त्यांचा
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे संचालक सचिन जाधव यांनी आभार मानले.
दरम्यान, दिवसभरात बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक एम.जी.
कुलकर्णी, उद्योजक संग्राम पाटील, डीआयसीचे सरव्यवस्थापक एस.डी. शेळके, एमसीईडीचे
प्रकल्प संचालक वनिता पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment