Thursday 26 May 2016

कोल्हापूरचे पोलंडशी शैक्षणिक संबंध दृढ व्हावेत: कॉन्सुल जनरल लेझिक ब्रेंडा यांची अपेक्षा



Vice Chancellor Dr. Devanand Shinde welcomed Hon. Leszek Brenda,
Consul General of the Republic of Poland in Mumbai by offering a memento of Shivaji Univerity, Kolhapur


कोल्हापूर, दि. २६ मे: पोलंडचे कोल्हापूरशी सांस्कृतिक बंध जुळलेले आहेतच; ते आता शैक्षणिकदृष्ट्याही अधिक दृढ व्हावेत, यासाठी अवश्य प्रयत्न करू, अशी ग्वाही पोलंडचे भारतातील (मुंबई) कॉन्सुल जनरल लेझिक ब्रेंडा यांनी आज येथे दिली.
श्री. ब्रेंडा हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सपत्निक भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. ब्रेंडा म्हणाले, दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात कोल्हापूरच्या भूमीने अनेक पोलिश बांधवांना आसरा दिला. आमच्या अनेक पूर्वजांनी या भूमीवरच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या समाधीचे दर्शन घेत असताना केवळ कोल्हापूरवासीयच नव्हे, तर संपूर्ण भारतीय बंधूंविषयी अपार कृतज्ञतेची भावना मनी दाटून येते. कोल्हापूरशी असलेले हे जिव्हाळ्याचे संबंध शैक्षणिकदृष्ट्या अधिक दृढ करण्यासाठी विद्यापीठीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेषतः इचलकरंजी येथील डीकेटीई अभियांत्रिकी महाविद्यालयातील वस्त्रोद्योगविषयक इनक्युबेशन केंद्राशी सहकार्यवृद्धीबाबत श्री. ब्रेंडा यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडून अधिक जाणून घेतले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, पोलंडमधील महत्त्वाचे विद्यापीठ निवडून त्यांच्याशी कॉन्सुल जनरल यांनी संवाद घडवून आणण्यासाठी सहकार्य करावे. जेणे करून उभय देशांमध्ये शैक्षणिक बंध प्रस्थापित करणे सोयीचे जाईल. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
या प्रसंगी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे समन्वयक डॉ. ए.व्ही. घुले, विजय गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment