VC Dr. Devanand Shinde felicitating Dattatray Nivrutti Savade |
VC Dr. Devanand Shinde felicitating Aasma Ahmed Sayyad |
Dr. Arun Bhosale |
कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाचे पहिले
कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली असता ते 'मॅन ऑफ क्रायसिस' अर्थात कोणत्याही पेचप्रसंगातून
मार्ग काढण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत डॉ.
अरुण भोसले यांनी त्यांचा गौरव केला.
डॉ. पवार यांच्या ११०व्या
जयंतीनिमित्त आज डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनीच्या वतीने आयोजित
विद्यार्थी भवनमधून 'कमवा व शिका' योजनेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
व पुरस्कार वितरण समारंभ अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. आप्पासाहेब पवार
यांचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे सांगून डॉ. भोसले
म्हणाले, एक शिक्षक, प्राध्यापक म्हणून आप्पासाहेबांचे व्यक्तीमत्त्व प्रभावी
होतेच, पण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे प्रशासक म्हणूनही
त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी मुंबई प्रांताचे
शिक्षण संचालक म्हणून त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ही त्यांची
कारकीर्द खरे तर शिक्षण क्षेत्राचे सुवर्णयुगच म्हणायला हवे. या काळात त्यांनी
पाचवीपासून ऐच्छिक इंग्रजी अभ्यासक्रमाची सुरवात केली. शैक्षणिकदृष्ट्या मागास
विदर्भ-मराठवाड्याला या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले.
विदर्भातील सुमारे ३५० तर मराठवाड्यातील १३१ गावांना झंझावाती भेटी देऊन लोकांना
शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या विभागाच्या शैक्षणिक विकासासाठी पश्चिम
महाराष्ट्रातील शिक्षित लोकांनी पुढाकार घ्यावा, अशी त्यांची तळमळ होती. त्यातूनच
मराठवाड्यात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. शिवाजी
विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे याच महाविद्यालयाचे
विद्यार्थी आहेत, हा या दोन कुलगुरूंना जोडणारा एक महत्त्वाचा धागा आहे.
महाराष्ट्राच्या
निर्मितीनंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई आणि
शिक्षण संचालक डॉ. आप्प्साहेब पवार या त्रिकूटाने महाराष्ट्राच्या शिक्षण
क्षेत्राला दिशा देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या तिघांच्या प्रयत्नानेच शिवाजी
विद्यापीठ स्थापनेच्या प्रयत्नांना मूर्त रुप मिळाले. आणि त्याला दिशा देण्याची
जबाबदारीही आप्पासाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली, हे त्यांचे या विद्यापीठावर
थोर उपकार आहेत, अशी कृतज्ञताही डॉ. भोसले यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थी हा राष्ट्राचा ठेवा आहे, या भावनेतून आप्पासाहेबांनी
शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीची दिशा त्यांच्याच कार्यातून आखून दिलेली आहे. आज
शिवाजी विद्यापीठ नॅक रँकिंगमध्ये राज्यात पहिले, एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात २८वे
तर राज्यात पहिले, ऑनलाइन संदर्भ पाहण्यात देशात दुसरे अशी यशाची अनेक शिखरे काबीज
करत आहे, या मागे आप्पासाहेबांनी केलेली पायाभरणीच कारणीभूत आहे, याची कृतज्ञ
जाणीव आपण सदोदित मनी बाळगली पाहिजे. त्यांच्या विचारांचा वारसा, श्रमसंस्कारांची
शिदोरी घेऊन वाटचाल करणारा कोणताही विद्यार्थी आयुष्यात कधीही अयशस्वी होणार नाही.
यावेळी विद्यार्थी
भवनच्या आदर्श व गुणवतं विद्यार्थी-विद्यार्थिनींना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या
हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये दत्तात्रय निवृत्ती सवदे (एम.कॉम.
भाग-२) आदर्श विद्यार्थी ठरले, तर आसमा अहमद सय्यद (एम.ए. भाग-२) आदर्श
विद्यार्थिनी ठरल्या.
अन्य गुणवंत विद्यार्थ्यांची
नावे पुढीलप्रमाणे: भाषा विभाग: नमिता तुकाराम गावडे, समाधान सोन्याबापू गायकवाड, सामाजिक शास्त्र: आसमा अहमद सय्यद, संभाजी
संपतराव करडे, विज्ञान: रेश्मा माणिक बाबर, भगवान विलास पाटील, वाणिज्य: रेवणनाथ सदाशिव नवले, राहुल
नारायण बेळंके.
कार्यक्रमाच्या
सुरवातीला प्राचार्य भैरव कुंभार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी
प्राचार्य डॉ. बी.एल. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. टी.के. सरगर
यांनी परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. एस.जे. नाईक यांनी आभार मानले. अमित कांबळे
यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास डॉ. बी.एल. पाटील, प्राचार्य डॉ. संभाजीराव
कणसे यांच्यासह विद्यार्थी भवनचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि डॉ. पवार
यांच्यावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment