Tuesday 10 May 2016

विद्यापीठाच्या जलसंधारणाच्या कामात शारीरिक शिक्षकांचाही सहभाग




कोल्हापूर, दि. १० मे: शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कालपासून सुरू करण्यात आलेल्या जलसंधारण निर्मिती उपक्रमाला आज विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शारीरिक शिक्षकांच्या सहभागाचे आयाम लाभले. या अभियानामध्ये हे सर्व शिक्षक दोन दिवस सक्रिय सहभाग देणार आहेत. आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठात कालपासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून शेततळे जलसंधारण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. दि. १३ मे पर्यंत हे श्रमदान शिबीर सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांचे श्रमदान सुरू असतानाच वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण शिक्षक संघ यांच्या वतीनेही या 'पाणी अडवा पाणी जिरवा' अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या बाभूळवन परिसरात श्रमदानातून शेततळे साकारण्याच्या कार्यात योगदान देण्यासाठी विद्यापीठाशी संलग्नित तिन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालयीन शारिरिक शिक्षक एकत्र आले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढण्याबरोबरच प्रस्तावित शेततळ्याच्या चोहो बाजूंनी बंधारा तयार करण्याचे काम या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. यासाठी होणारा खर्च तिन्ही जिल्ह्यांतील शारीरिक शिक्षण संचालकांमार्फत करण्यात येणार आहे.



या वेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह शारीरिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामी महादेव सुर्यवंशी (जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर), दीपक डांगे (पाटण कॉलेज, पाटण), संजय पाटील, (रेठरे बुद्रुक), राजू बनसोडे (नाईट कॉलेज, सांगली), गणेश सिंहासने (महिला महाविद्यालय, तासगांव), शिवराज गायकवाड (रहिमतपूर महाविद्यालय, रहिमतपूर), संदीप पाटील, बाजीराव पाटील तसेच अन्य शिक्षण संचालकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. 

No comments:

Post a Comment