शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रातून बुधाच्या अधिक्रमणाची घेतलेली छायाचित्रे. सूर्याच्या समोर वर्तुळामध्ये दिसणारा बुध आहे. तर अन्यत्र दिसणारा काळा ठिपका म्हणजे सौरडाग आहे. |
कोल्हापूर, दि. १०
मे: शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रातर्फे काल पन्हाळा येथून बुधाच्या
अधिक्रमणाची डॉ. ए.के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षणे घेण्यात आली. बुधाचे
पुढील अधिक्रमण सन २०१९मध्ये होणार असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.
निरभ्र आकाशामुळे पन्हाळा
येथून बुधाचे सूर्यासमोरून अधिक्रमण अतिशय उत्तम प्रकारे पाहता आले. काल सायंकाळी
४.४० वाजल्यापासून ते ६.४५ वाजेपर्यंत या अधिक्रमणाची विविध टप्प्यांवरील
निरीक्षणे घेण्यात आली. पाच इंची CS+ टेलिस्कोपच्या साह्याने ही निरीक्षणे घेण्यात आली.
बुधाचे संक्रमण शंभर
वर्षातून साधारण १३ वेळा पाह्यला मिळते. किमान चार वर्षांतून एकदा किंवा १० ते १२
वर्षांतून एकदा असा त्याचा कालावधी असतो. बुध हा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह
आहे. काही ठराविक वर्षांनी हा ग्रह सूर्याच्या व पृथ्वीच्या मध्ये येतो, याला
बुधाचे अधिक्रमण म्हणतात. तो सूर्यासमोरून सरकत जात असताना सूर्याच्या
पृष्ठभागावरून काळसर ठिपका सरकल्याप्रमाणे दिसतो. यापूर्वीचे अधिक्रमण ८ नोव्हेंबर
२००६ रोजी झाले होते. पुढील संक्रमण ११ नोव्हेंबर २०१९ रोजी होईल, अशी माहिती डॉ.
शर्मा यांनी यावेळी दिली.
या वेळी अवकाश संशोधकांसह
हौशी निरीक्षक व पर्यटकांनीही हे अधिक्रमण पाहण्याचा आनंद घेतला.
No comments:
Post a Comment