कोल्हापूर, दि. २०
मे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
केवळ दलितांचे नेते म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय असून त्यांचे भारतीय समाजाप्रती
एकूण राष्ट्रीय योगदान पाहता ते सर्वश्रेष्ठ भारतीय होते, असेच म्हणावे लागेल, असे
प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे
केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या 'पुढारीकार पद्मश्री कै. डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमाले'त 'महामानव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे राष्ट्रीय कार्य' या विषयावर ते बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात
झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
यावेळी व्यासपीठावर बिहार
व त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, 'दै. पुढारी'चे संपादक पद्मश्री डॉ.
प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र जाधव
म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत की, मी प्रथमतः भारतीय आहे, नंतरही
भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. स्वतःच्या भारतीयत्वाविषयी इतक्या
निसंदिग्धपणे आणि अभिमानपूर्वक प्रतिपादन करणारा नेता या देशात दुसरा झाला नाही. या
तीव्रतर भारतीयत्वाच्या जाणीवेतून भारतीय राज्यघटनेची अमोल देणगी त्यांनी भारतीय
समाजाला प्रदान केली, हे त्यांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत, याची जाणीव आपण
बाळगली पाहिजे. डॉ. आंबेडकर हे दलितांचे नेते, कैवारी होतेच, राज्यघटनेचे
शिल्पकारही होते; पण, त्यापुढे जाऊन ते एक थोर विधिज्ञ आणि महत्त्वाचे म्हणजे
सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञही होते. बाबासाहेबांनी
कायद्याचा अभ्यास केला असला तरी त्यांचे सर्व प्रबंध आणि पदव्या अर्थशास्त्रातील
आहेत. त्यामुळेच ते भारताचे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असल्याच्या
बैठकीला एक ठोस परिमाण आहे. भारतीय स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरही
त्यांच्या प्रत्येक संसदीय पदाला त्यांनी न्याय देताना सर्वसामान्य माणूस
हाच समोर ठेवला होता. त्याच्या विकासाचे धोरण डोळ्यासमोर ठेवले होते.
डॉ. जाधव म्हणाले, जोपर्यंत अस्पृश्यता मानणार नाही, तोपर्यंत काँग्रेसमध्ये
प्रवेश मिळणार नाही, अशी काँग्रेसचे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना अट
घाला, अशी थेट मागणी महात्मा गांधी यांच्यासमोर बाणेदारपणे ठेवून अस्पृश्यतेच्या
प्रश्नाची तीव्रता त्यांना पटवून देणारे बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात अस्पृश्यता
निवारणाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भातील भूमिकांमुळे वेळोवेळी राजकीय आणि
तात्विक मतभेद उद्भवले. तरीही बाबासाहेबांचा भारतीय मंत्रीमंडळातील प्रवेश हा
महात्मा गांधी यांच्या आग्रहामुळेच होऊ शकला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
दोघांमधील संबंध कटुतेचे असले तरी, व्यक्तीपेक्षा देश मोठा हा संदेश देणारी कृती
गांधीजींची राहिली, हे लक्षात घेतले पाहिजे.
डॉ. जाधव पुढे म्हणाले, १९२४ साली सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यापासून पुढे
१९३५ पर्यंत हिंदू धर्माच्या चौकटीत राहून त्यात बदल घडविण्यासाठी बाबासाहेबांनी
कसोशीने प्रयत्न केले. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर
प्रवेश सत्याग्रह ही त्याची काही उदाहरणे. पण, तरीही अस्पृश्यांविषयी सवर्ण
हिंदूंच्या काळजाला पाझर फुटत नाही, हे लक्षात आल्यानंतर मात्र बाबासाहेबांनी १९३५
साली येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. पण, त्यानंतरही पुढे २१ वर्षे त्यांचे या
विषयावरील चिंतन सुरूच राहिले. या कालावधीत त्यांनी जगातील जवळजवळ सर्व धर्मांचा चिकित्सक
अभ्यास केला आणि १९५६मध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी
मृत्यूपूर्वी केवळ ५० दिवस आधी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आपल्या पाच लाख
अनुयायांनाही नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली. जगामध्ये झालेली धर्मांतरे ही एक तर तलवारीच्या धाकावर किंवा आमिषाच्या बळावर
झाली आहेत. मात्र भारतात झालेले धर्मांतर
केवळ बाबासाहेबांच्या एका शब्दावर शांतता व
अहिंसेच्या मार्गाने झालेले जगातील एकमेव धर्मांतर असल्याचे त्यांनी
सांगितले.
डॉ. जाधव पुढे
म्हणाले, १९४२ साली एकीकडे महात्मा गांधी ब्रिटीशांना 'चले जाव'चा इशारा देत असताना
दुसरीकडे बाबासाहेब ब्रिटीशांच्या मंत्रीमंडळात समाविष्ट होऊन स्वतंत्र भारताच्या
विकासाची पायाभरणी करीत होते. कामगार, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाटबंधारे या
महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी बाबासाहेबांवर होती. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील पंधरा धरणांच्या कामांची सुरुवात केली. देशातील मोठ्या नद्या
एकमेकींना जोडण्याची योजना
त्यांचीच. देशातील जनतेला पिण्यासाठी, शेतीसाठी,
उद्योगधंदे आणि जलप्रवास व जलपर्यटन यासाठी
मुबलक पाणी मिळण्यासाठी त्यांनी योजना
आखल्या. जलसाक्षरता मोहीम चालवली. वीजनिर्मितीशिवाय उद्योगधंदे वाढू शकत नाहीत आणि शेती उत्पादनही वाढू शकत
नाही, म्हणून
ऊर्जेच्या निर्मितीवर त्यांनी
भर दिला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या
मंत्रीमंडळात कायदेमंत्री म्हणूनही त्यांनी राज्यघटना निर्मितीच्या कार्यात अमूल्य
योगदान दिले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अक्षरशः एकहाती कामकाज पार
पाडले. या काळात हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार
प्रदान करण्यासाठी ते आग्रही होते. मात्र, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या
विरोधामुळे हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होत नसल्याचे पाहून बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा
राजीनामा दिली. स्त्री-पुरूष समतेसाठी मंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे
एकमेव व्यक्ती होते, असेही त्यांनी सांगितले.
निवडक २५ व्याख्यानांचा ग्रंथ प्रकाशित करणार: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी
विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये कै. ग.गो. जाधव यांनी अत्यंत कळीची भूमिका बजावल्याचे
सांगून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महात्मा गांधी, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास ग.गो. जाधव यांना लाभला. त्यामुळे साहजिकच सामाजिक
जाणीवेचे संस्कार त्यांच्यावर झाले. ही जाणीव त्यांच्या पत्रकारितेतून पदोपदी
झळकताना दिसते. विद्यापीठाच्या निर्मितीसाठीच्या प्रयत्नांसह या परिसरावर डॉ.
ग.गो. जाधव यांचे मोठे ऋण आहेत. त्यांच्या या उपकाराचे स्मरण राखण्यासाठी
विद्यापीठाने ही व्याख्यानमाला सुरू केली. गेली २८ वर्षे नियमितपणे सुरू असलेल्या
या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आपले मौलिक विचार प्रकट केले
आहेत. यामधील निवडक २५ व्याख्यानांचा समावेश असणारा ग्रंथ शिवाजी विद्यापीठाच्या
वतीने प्रकाशित करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
कै. ग.गो. जाधव यांच्या
सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. योगेश जाधव
यांनी सक्षमपणे पुढे चालविला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
विद्यापीठाचे
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रभारी
कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. रसिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन
केले.
No comments:
Post a Comment