Showing posts with label Dr. C.D. Lokhande. Show all posts
Showing posts with label Dr. C.D. Lokhande. Show all posts

Tuesday, 3 May 2016

शिवाजी विद्यापीठाच्या दोन संशोधकांची ६६व्या नोबेल लॉरेट परिषदेसाठी निवड




Dr. Jasmin Shaikh
कोल्हापूर, दि. ३ मे: जर्मनीमध्ये येत्या २६ जून ते १ जुलै २०१६ या कालावधीत होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ६६व्या लिंडेऊ नोबेल लॉरेट परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या दोन तरुण संशोधक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
नोबेल लॉरेट परिषदेसाठी विद्यापीठातील महिला संशोधक डॉ. जस्मीन शमशुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे 'इन्स्पायर फेलोशीप' मिळविणारे व सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करणारे डॉ. संजय सुभाष लठ्ठे यांचीही या परिषदेसाठी निवड झाली आहे. कौन्सिल फॉर दि नोबेल लॉरेट मिटींग या संस्थेकडून नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. सी.डी. लोखंडे व मार्गदर्शक प्रा. पी.एस. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नोबेल लॉरेट परिषदेमध्ये पदार्थविज्ञान विषयातील नोबेल पुरस्कार विजेते तरुण संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्याशी चर्चेची संधी या तरुणांना उपलब्ध होते. महान शास्त्रज्ञांसमोर पोस्टर व मौखिक सादरीकरणाची संधीही त्यांना मिळते. परिषदेसाठी जगभरातील साधारण ४०० तरुण संशोधकांची निवड केली जाते. यंदा या परिषदेसाठी भारतातून २१ संशोधकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या दोन तरुण संशोधकांचा समावेश आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. या संशोधकांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकही अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
डॉ. जस्मीन शेख या सध्या पदार्थविज्ञान अधिविभागात प्रा. पी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संशोधक-अ या पदावर कार्यरत आहेत. मूळ वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील असलेल्या डॉ. शेख यांचे वडील शमशुद्दीन शेख कृषी सहायक अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. सबावी येथील मोहसीन मराठी विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण तर पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पुढील शिक्षण झाले. शिवाजी विद्यापीठात एम.एस्सी. व पीएच.डी. पदवी त्यांनी मिळविली. त्यानंतर सन २०११मध्ये त्यांना दक्षिण कोरियातील हॅनयांग विद्यापीठात एक वर्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. तसेच, पुणे विद्यापीठातही प्रा. एस.आय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्ष संशोधन कार्य केले. सन २०१५पासून शिवाजी विद्यापीठात 'डीएसटी'अंतर्गत महिला संशोधक-अ या पदावर त्या कार्यरत आहेत. डॉ. शेख यांचे १८ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांना पुरस्कार मिळाले आहे. नॅनो-मटेरियलसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित आहे. सौरघट व सुपर-कपॅसिटर हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. मुख्यतः मेटल ऑक्साईड व कार्बन मटेरियलवर त्यांनी संशोधन केले आहे.
Dr. Sanjay Latthe
डॉ. संजय लठ्ठे यांनीही अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन संशोधनाच्या क्षेत्रात भरारी मारली आहे. आठवडा बाजार, किराणा मालाचे दुकान आणि अगदी मंगल कार्यालयात वाढप्याचेही काम करत शिक्षण घेणाऱ्या डॉ. लठ्ठे यांची गतवर्षी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी (डीएसटी) तर्फे 'इन्स्पायर फॅकल्टी ॲवॉर्ड'साठी निवड करण्यात आली. त्या अंतर्गत त्यांना पाच वर्षांसाठी ८३ लाख रुपयांचे संशोधन अनुदान मंजूर झाले. त्यासाठी ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करीत आहेत.
डॉ. संजय लठ्ठे यांचे पितृछत्र वयाच्या सातव्या वर्षीच हरपले. तेव्हापासून त्यांनी स्वकष्टातून आपले शिक्षण सुरू ठेवले. मूळचे सांगोला (जि. सोलापूर) येथील असलेल्या संजय यांनी प्राथमिक शाळेत असताना सांगोल्याच्या आठवडा बाजारासह डिपार्टमेंटल स्टोअर, मंगल कार्यालय अशा ठिकाणी पडेल ती कामे केली, मात्र शि७ण सोडले नाही. पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाच्या 'डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन'मध्ये त्यांना 'कमवा व शिका' योजनेअंतर्गत प्रवेश मिळाला. एम.एस्सी. (पदार्थविज्ञान) विषयात त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली. विद्यापीठात त्यांनी पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून पाण्याला अवरोध करणारे कोटिंग तयार करण्याचे संशोधन त्यांनी प्रा. ए.व्ही. राव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले. पीएच.डी. दरम्यान त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग आणि वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती देण्यात आली. पीएच.डी.पर्यंतचे सर्व शिक्षण त्यांनी कुटुंबाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता पूर्ण केले.
पीएच.डी.मधील संशोधनाच्या आधारे त्यांची इस्तंबूल (तुर्की) येथील कोच विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरेटसाठी (ऑक्टोबर २०१० ते सप्टेंबर २०१२) निवड झाली. त्यानंतर से (दक्षिण कोरिया) येथील कोरिया विद्यापीठात (ऑक्टोबर २०१२ ते मे २०१३) हायड्रोजन वायू निर्मितीवरील संशोधनासाठी तसेच पाण्या मिसळलेल्या विषारी घटकांना वेगळे करण्यासाठी मेम्ब्रेन तयार करण्याच्या संशोधनासाठी निवड झाली. त्यांना जपान सरकार पुरस्कृत "जपान सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायन्स"ची प्रतिष्ठेची शिष्यवृत्तीही मिळाली. जगभरातील हजारो संशोधकामधून १२० संशोधकांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आणि या संशोधकांमध्ये डॉ. ठ्ठे महाराष्ट्रातून निवड झालेले एकमेव संशोधक होते. टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सचे कुलगुरू नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झालेले जागतिक कीर्तीचे संशोधक प्रा. अकिरा फुजीशिमा यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉ. लठ्ठे यांचे ४४ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, विविध राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी १५ शोधनिबंध सादर केले आहे. त्यांच्या शोधनिबंधांचा संदर्भ जगभरातील १०००हून अधिक संशोधकांनी त्यांच्या संशोधनामध्ये दिला आहे. यावरून त्यांच्या संशोधनाचा सर्वोत्तम दर्जा स्पष्ट होतो.

Saturday, 5 March 2016

शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश केंद्रात इस्रोचा रिसिव्हर स्थापित; संदेश ग्रहणास सुरवात



विद्यापीठाच्या अवकाश संशोधनाच्या दृष्टीने सुवर्णदिन: कुलगुरू डॉ. शिंदे


कोल्हापूर, दि. ५ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (आय.आर.एन.एस.एस.) या उपग्रह कार्यक्रमांतर्गत एक रिसिव्हर बसविण्यात आला असून त्याच्यामार्फत अत्यंत उत्तम पद्धतीने संदेश (सिग्नल) ग्रहण केले जात आहेत. या रिसिव्हरमुळे शिवाजी विद्यापीठाचे अवकाश केंद्र इस्रोच्या नकाशावर दाखल झाले असून विद्यापीठाच्या अवकाश संशोधनाच्या दृष्टीने आजचा सुवर्णदिन असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाने पन्हाळा येथे अवकाश संशोधन केंद्राची उभारणी केली आहे. पन्हाळा समुद्रसपाटीपासून ९६८ मीटर इतक्या उंचीवर असल्याने कोल्हापूर शहरापेक्षा येथे आकाश सहा पटीने निरभ्र आढळते. अवकाश निरीक्षणाबरोबरच या क्षेत्राशी निगडित विविध प्रकारचे संशोधन या ठिकाणाहून करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. त्यानुसार या केंद्राच्या ठिकाणी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) इंडियन रिजनल नेव्हीगेशन सॅटेलाइट सिस्टीम (आय.आर.एन.एस.एस.) या उपग्रह कार्यक्रमांतर्गत काल एक रिसिव्हर बसविण्यात आला. या रिसिव्हरने तातडीने सिग्नल ग्रहण करण्यास सुरवातही केली. विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची घटना असल्याने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सदर केंद्रास भेट देऊन या संपूर्ण यंत्रणेची आवर्जून पाहणी केली व माहिती घेतली. विद्यापीठाच्या इतिहासात अवकाश संशोधनाच्या दृष्टीने ही एका नव्या पर्वाची सुरवात असल्याची भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
इस्रोच्या आय.आर.एन.एस.एस. या उपग्रह कार्यक्रमांतर्गत सात उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच उपग्रह प्रक्षेपित झाले असून उर्वरित दोनही लवकरच सोडले जाणार आहेत. या सात उपग्रहांच्या सहाय्याने भारत आता स्वतःची स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणाली बनवित आहे. उपग्रहांकडून येणारे सिग्नल ग्रहण करण्यासाठी देशभरात सुमारे १०५ रिसिव्हर बसविण्यात येत आहेत. त्यापैकी २३वा रिसिव्हर शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रात काल (दि. ४ मार्च) समन्वयक डॉ. ए.के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित करण्यात आला. ॲकॉर्ड कंपनीच्या सिस्टीम इंजिनिअर्समार्फत सर्व प्राथमिक सिग्नल टेस्टिंग करण्यात आले. त्याचप्रमाणे डाटा रेकॉर्डिंगही सुरळीतपणे सुरू झाले.
आज कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सदर अवकाश केंद्रास भेट दिली असता आय.आर.एन.एस.एस. मालिकेमधील आतापर्यंत प्रक्षेपित करण्यात आलेल्या पाचही (१-ए ते १-ई) उपग्रहांकडून येणाऱ्या सिग्नलची पातळी या रिसिव्हरमध्ये उत्तमरित्या नोंद होत असल्याचे दिसून आले. या रिसिव्हरमुळे विद्यापीठाचे अवकाश केंद्र इस्रोच्या पर्यायाने भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या नकाशावर दाखल झाले आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
या केंद्रातून प्राप्त होणारा डाटा हा भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा आहे, तितकाच विद्यापीठात अवकाश संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खूप मोलाचा ठरणार आहे. याद्वारे मिळणाऱ्या माहितीचे वेगवेगळ्या प्रकारे संशोधन, विश्लेषण करून त्यांना अभ्यास करता येणार आहे, अशी माहिती डॉ. शर्मा यांनी यावेळी दिली.
यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. सी.डी. लोखंडे यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
भारताच्या स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणालीचे महत्त्व
 सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण बहुतांशी अमेरिकेच्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) किंवा रशियाच्या ग्लोनॅस (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम) या यंत्रणांवर अवलंबून असतो. तथापि, या सेवा खंडित झाल्या तर त्यांवर अवलंबून असणाऱ्या अनेक गोष्टी कोलमडून पडतील. ही बाब लक्षात घेऊन इस्रोने स्वतःची स्वतंत्र जीपीएस प्रणाली निर्माण करण्याचे ठरविले. ही प्रणाली म्हणजेच इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (आय.आर.एन.एस.एस.) होय. या माध्यमातून भारत आणि त्याभोवतीच्या सुमारे १५०० किलोमीटरच्या परिसरात वीस मीटरपेक्षा अधिक पोझिशनल अचूकता प्रदान करण्याइतकी क्षमता प्राप्त होणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्याला स्टँडर्ड पोझिशनिंग सिस्टीम (एस.पी.एस.) उपलब्ध करून देईल. भारताच्या या स्वतंत्र नेव्हीगेशन सिस्टीममुळे जमीन व सागरी पृष्ठभागाची उपग्रहाद्वारे पाहणी करता येईल. त्याचप्रमाणे रस्ते मार्ग, भूमापन व मोबाईल ट्रॅकिंग सुद्धा अधिक सोयीस्कर होणार आहे.