विद्यापीठाच्या अवकाश
संशोधनाच्या दृष्टीने सुवर्णदिन: कुलगुरू डॉ. शिंदे
कोल्हापूर, दि. ५
मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रात भारतीय अवकाश
संशोधन संस्थेच्या (इस्रो) इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (आय.आर.एन.एस.एस.)
या उपग्रह कार्यक्रमांतर्गत एक रिसिव्हर बसविण्यात आला असून त्याच्यामार्फत अत्यंत
उत्तम पद्धतीने संदेश (सिग्नल) ग्रहण केले जात आहेत. या रिसिव्हरमुळे शिवाजी
विद्यापीठाचे अवकाश केंद्र इस्रोच्या नकाशावर दाखल झाले असून विद्यापीठाच्या अवकाश
संशोधनाच्या दृष्टीने आजचा सुवर्णदिन असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाने
पन्हाळा येथे अवकाश संशोधन केंद्राची उभारणी केली आहे. पन्हाळा समुद्रसपाटीपासून
९६८ मीटर इतक्या उंचीवर असल्याने कोल्हापूर शहरापेक्षा येथे आकाश सहा पटीने निरभ्र
आढळते. अवकाश निरीक्षणाबरोबरच या क्षेत्राशी निगडित विविध प्रकारचे संशोधन या
ठिकाणाहून करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. त्यानुसार या केंद्राच्या ठिकाणी
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) इंडियन रिजनल नेव्हीगेशन सॅटेलाइट सिस्टीम
(आय.आर.एन.एस.एस.) या उपग्रह कार्यक्रमांतर्गत काल एक रिसिव्हर बसविण्यात आला. या
रिसिव्हरने तातडीने सिग्नल ग्रहण करण्यास सुरवातही केली. विद्यापीठाच्या दृष्टीने
अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची घटना असल्याने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी
आज सदर केंद्रास भेट देऊन या संपूर्ण यंत्रणेची आवर्जून पाहणी केली व माहिती घेतली. विद्यापीठाच्या इतिहासात अवकाश
संशोधनाच्या दृष्टीने ही एका नव्या पर्वाची सुरवात असल्याची भावना त्यांनी या
प्रसंगी व्यक्त केली.
इस्रोच्या
आय.आर.एन.एस.एस. या उपग्रह कार्यक्रमांतर्गत सात उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार
आहेत. त्यापैकी पाच उपग्रह प्रक्षेपित झाले असून उर्वरित दोनही लवकरच सोडले जाणार आहेत. या सात उपग्रहांच्या सहाय्याने भारत आता
स्वतःची स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणाली बनवित आहे. उपग्रहांकडून येणारे सिग्नल ग्रहण
करण्यासाठी देशभरात सुमारे १०५ रिसिव्हर बसविण्यात येत आहेत. त्यापैकी २३वा
रिसिव्हर शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रात काल (दि. ४ मार्च) समन्वयक
डॉ. ए.के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित करण्यात आला. ॲकॉर्ड कंपनीच्या
सिस्टीम इंजिनिअर्समार्फत सर्व प्राथमिक सिग्नल टेस्टिंग करण्यात आले.
त्याचप्रमाणे डाटा रेकॉर्डिंगही सुरळीतपणे सुरू झाले.
आज कुलगुरू डॉ.
शिंदे यांनी सदर अवकाश केंद्रास भेट दिली असता आय.आर.एन.एस.एस. मालिकेमधील
आतापर्यंत प्रक्षेपित करण्यात आलेल्या पाचही (१-ए ते १-ई) उपग्रहांकडून येणाऱ्या सिग्नलची पातळी या
रिसिव्हरमध्ये उत्तमरित्या नोंद होत असल्याचे दिसून आले. या रिसिव्हरमुळे
विद्यापीठाचे अवकाश केंद्र इस्रोच्या पर्यायाने भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या नकाशावर दाखल झाले आहे, ही अत्यंत
महत्त्वाची बाब आहे.
या केंद्रातून
प्राप्त होणारा डाटा हा भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा
आहे, तितकाच विद्यापीठात अवकाश संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खूप मोलाचा
ठरणार आहे. याद्वारे मिळणाऱ्या माहितीचे वेगवेगळ्या प्रकारे संशोधन, विश्लेषण करून
त्यांना अभ्यास करता येणार आहे, अशी माहिती डॉ. शर्मा यांनी यावेळी दिली.
यावेळी विद्यापीठाचे
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. सी.डी.
लोखंडे यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
भारताच्या स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणालीचे महत्त्व
सध्या माहिती
तंत्रज्ञानाच्या युगात आपण बहुतांशी अमेरिकेच्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग
सिस्टीम) किंवा रशियाच्या ग्लोनॅस (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम) या
यंत्रणांवर अवलंबून असतो. तथापि, या सेवा खंडित झाल्या तर त्यांवर अवलंबून
असणाऱ्या अनेक गोष्टी कोलमडून पडतील. ही बाब लक्षात घेऊन इस्रोने स्वतःची स्वतंत्र
जीपीएस प्रणाली निर्माण करण्याचे ठरविले. ही प्रणाली म्हणजेच इंडियन रिजनल
नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (आय.आर.एन.एस.एस.) होय. या माध्यमातून भारत आणि
त्याभोवतीच्या सुमारे १५०० किलोमीटरच्या परिसरात वीस मीटरपेक्षा अधिक पोझिशनल
अचूकता प्रदान करण्याइतकी क्षमता प्राप्त होणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्याला
स्टँडर्ड पोझिशनिंग सिस्टीम (एस.पी.एस.) उपलब्ध करून देईल. भारताच्या या स्वतंत्र
नेव्हीगेशन सिस्टीममुळे जमीन व सागरी पृष्ठभागाची उपग्रहाद्वारे पाहणी करता येईल.
त्याचप्रमाणे रस्ते मार्ग, भूमापन व मोबाईल ट्रॅकिंग सुद्धा अधिक सोयीस्कर होणार
आहे.
Its a golden day in university research work..
ReplyDeleteIndeed it is Sir.. Thank you!
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete